ब्लॉग

कोवळ्या भीमसैनिकाची ‘डरकाळी’ आजही स्मरणात

आज नामांतर शहीद गौतम वाघमारेंचा २८ वा बलिदान दिवस

नांदेड : तो दिवस होता २५ नोव्हेंबरचा, वेळ चारची, अचानक जयभीमनगरातून धूर बाहरे येत होता आणि जयभीम.. जयभीमचा आवाज सर्वत्र घुमत होता. तो आवाज होता गौतम वाघमारे यांचा. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या मागणीसाठी २५ नोव्हेंबरला आत्मदहन करून संपूर्ण महाराष्ट्रात नामांतरासाठी रान पेटवले होते. शहीद वाघमारेंच्या आत्मदहनाने सरकारने विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासंदर्भात निर्णयाच्या अंतिम टप्यावर आणले आणि ताे निर्णय १४ जानेवारी १९९४ ला घ्यावा लागला. असे नामांतर शहीद गौतम वाघमारे यांचे लहान भाऊ शशिकांत वाघमारे यांनी त्यांच्या भावाच्या 28 व्या बलिदान दिनानिमित्त आपल्या भावाचे नामांतरातील योगदानाबद्दल ‘धम्मचक्र’शी बोलताना सांगितले.

शशिकांत वाघमारे यांनी सांगितले, की माझ्या मोठ्या भावाने बलिदान दिलेल्या दिवशी दरवर्षी २५ नोव्हेंबरला बलिदान दिवस साजरा केला जातो. त्यामुळे आजही जयभीमनगरात नामांतराच्या घोषणा एेकू येतात. त्यावेळच्या घटनेबाबत असे झाले होते की, मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात येईल, असा ठराव २७ जुलै १९७८ रोजी दोन्ही सभागृहांत संमत झाला आणि मराठवाड्यात आंदोलनाला तोंड फुटले. राज्यात ३४० गावांतील दलितांच्या घरावर हल्ले झाले. अडीच हजार दलितांची कुटुंबे उद्‌ध्वस्त झाली. एक हजार आठशे घरे बेचिराख झाली होती.

विधीमंडळात नामांतराचा ठराव मंजूर करूनही त्याची अंमलबजावणी मात्र सरकार टाळत होते. म्हणून नांदेड येथील बी.ए.एल.एल.बी.चे शिक्षण घेत असलेले तसेच भारतीय दलित पॅंथरचे जिल्हाध्यक्ष गौतम वाघमारे यांनी २० नोव्हेंबरला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना आत्मदहन करण्याच्या निवेदनाद्वारे इशारा दिला होता. त्यांनी या निवेदनात सरकार नामांतरच्या निर्णयावर वेळ मारून नेत आहे असे म्हटले होते. नामांतरावर त्वरित निर्णय घ्यावा अथवा ३० नोव्हेंबरपर्यंत आत्मदहन करणार असा इशारा दिला होता. त्यानुसार काहीच हालचाली होत नसल्याचे पाहून गौतम वाघमारे यांनी आत्मदहन करण्याचे ठरवले २५ नोव्हेंबरच्या दिवशी एका महिलेला रक्ताची गरज होती. म्हणून सकाळी अकरा वाजता रक्तदान केले. त्यांनतर दिवसभर मित्रांच्या भेटी घेतल्या. सर्वांना सांगितले, की मी आत्मदहन करणार आहे. अनेकांनी वाघमारे यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा निर्णय ठाम होता.

आत्मदहनाचा इशारा दिल्यामुळे त्यांच्यावर पोलिसांची पाळत होती मात्र ते भूमीगत असल्यामुळे भेटले नाहीत. दुपारी चार वाजता काब्दे हॉस्पिटल जवळ भारतीय दलित पॅंथरच्या फलकाजवळ त्यांनी आत्मदहन केले. आत्मदहन करताना एका डायरीमध्ये स्केच पेनने सरकारचा निषेध केला. तसेच जयभीमच्या घोषणा देत शेवटी प्राण सोडले त्यांनतर ही वार्ता शहरभर पसरली रात्री उशिरापर्यंत जयभीमनगरात लोकांची गर्दी होती. दुसऱ्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातून नामांतराची मागणी जोर धरली. शेवटी गौतम वाघमारेंच्या आत्मदहनाने सरकारला निर्णयाच्या अंतिम टप्प्यावर आणले. मराठवाडा विद्यापीठाला डाॅ. बाबासाहेब आंबेडकर नाव देण्यात आले. असे शहीद गौतम वाघमारे यांचे नामांतरासाठी बलिदान दिल्याचे लहान भाऊ शशिकांत वाघमारे यांनी ‘धम्मचक्र’शी बोलताना सांगितले.