बातम्या

गुजरात मधील बुद्धमूर्ती प्रकल्पाची शून्य प्रगती

गुजरात मध्ये साबरकाठा जिल्ह्यात ‘देव नी मोरी’ या गावातील टेकडीवर १९५० मध्ये उत्खनन सुरू झाले. व १९६३ मध्ये येथील उत्खननात स्तुप सापडला. त्यात एक दगडी मंजुषा होती. त्या दगडी मंजुषेत छोटा नक्षीकाम केलेला करंडक मिळाला.आणि आश्चर्य म्हणजे त्या करंडकावर तथागतांच्या रक्षा असल्याचा स्पष्ट उल्लेख होता(दशबाला). अशा तर्हेने देव-नी-मोरी हे गाव बुद्धस्थळ म्हणून उदयास आले.

M.S.University, बडोदा येथील प्रोफेसर व्ही एच सोनवणे यांनी सांगितले की सध्यस्थितीत मेश्वो धरणामुळे हे स्थळ बाधित झाले आहे. यास्तव मिळालेला बुद्धधातू करंडक तलम कपड्यात गुंडाळून तो एका स्वर्णजडीत पेटीमध्ये ठेवण्यात आला असून ती पेटी बडोदा युनिव्हर्सिटी पुरातत्व विभागात सुरक्षित ठेवली आहे. प्रोफेसर सोनवणे यांनी पुढे सांगितले की चिनी प्रवासी भिक्खू हुएनत्संग यांच्या प्रवास वर्णनात वडनगर-विजयनगर येथील मोठ्या विहाराचा उल्लेख आलेला आहे. तेच हे देव-नी-मोरी ठिकाण असावे. त्याकाळी तेथे जवळजवळ १३०० भिक्खू रहात होते असे म्हटले आहे.

या पवित्र स्थळाची स्मृती म्हणून साबरकांठा जिल्ह्यात देव-नी-मोरी येथील दिल्ली-अहमदाबाद राष्ट्रीय हायवे जवळ गुजरात राज्य व International Buddhist Confederation यांच्या संयुक्त विद्यमाने ३५१ फुटांचा स्तूप उभारण्याचे काम मागील वर्षी सुरू झाले आहे. येथे उभारण्यात येणाऱ्या बुद्धमूर्तीची उंची १०८ मी.असणार आहे. स्प्रिंग टेम्पल बुद्धमूर्तींची उंची १५३ मी. आहे. त्यामुळे जगामध्ये बुद्धांचा दुसरा उंच पुतळा म्हणून त्याची नोंद होणार आहे. १०० एकर जागेत हा स्तूप विकासित केला जात आहे. नवीन स्तूपाचे बांधकाम झाल्यावर पवित्र बुद्धधातू करंडक दर्शनासाठी तेथे ठेवण्यात येईल असे जाणकारांनी सांगितले.

परंतू आता नवीन बातमीनुसार या स्थळासाठी गुजरात सरकारने अद्याप एक पैसा सुद्धा दिला नसल्याचे समोर आले आहे. त्याच्यामुळे देव-नी-मोरी या पवित्र स्थळाची स्मृती म्हणून होणारा भव्य बुद्धमूर्ती प्रकल्प भविष्यात होईल की नाही अशी शंका येऊ लागली आहे. संघकाया फाउंडेशनचे भन्ते प्रशील रत्न गौतम यांनी सांगितले की गुजरात सरकार कडून निधी उपलब्ध करून घेणे बाबत कार्यवाही चालू आहे.

सरदार पटेल यांचा पुतळा उभारण्यात आणि निधी उपलब्ध करून देण्यात जशी तत्परता आणि उत्साह दाखविला गेला तशी तत्परता आणि उत्साह आता बुद्धमूर्ती उभारणे बाबत दिसून येत नाही. कदाचित बुद्धमूर्तीचा प्रकल्प पूर्ण झाला तर Statue of Unity चे महत्व कमी होईल अशी अनाठायी भीती सरकारला वाटत असावी.

सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर जावे.
https://timesofindia.indiatimes.com/…/articles…/73217586.cms

संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)