आंबेडकर Live

आता भारतात आलेली बौद्धधम्माची लाट कदापीही परत जाणार नाही

“भारतात बौध्दम्माच्या वृक्षाची पाने वाळली असली तरी त्याची मुळे मात्र हिरवीगार आहेत. त्यांना खाडे पाणी मिळाले तर बौध्दम्माचा वृक्ष पुन्हा फोफावून आल्याशिवाय राहणार नाही” अशी खात्री बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वाटत होती. त्या वृक्षाला बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 ला पाच लाख अनुयायांच्या हातांनी जलसिंचन केले आणि आत्मविश्वासपूर्वक गर्जना केली की आता भारतात आलेली बौद्धधम्माची लाट कदापीही परत जाणार नाही.

त्याच आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी एक भीमप्रतिज्ञा उच्चारली, “जर मी काही काळ अधिक जगलो तर संपूर्ण भारत बौद्धमय करून दाखवीन” त्यासाठी त्यांनी दिल्ली, मुंबई, मद्राससारख्या महानगरात मोठमोठे बुद्धविहार उभारण्याची योजना बोलून दाखविली आणि श्रीलंकेतील पाली भाषेच्या जाणकारांकडून पालीतील त्रिरत्नवंदना, जयमंगल अष्टगाथा आणि त्रिशरण पंचशीलच्या रेकॉर्डस् तयार करून घेतल्या.

स्वतः बौद्धपूजापाठ नावाची छोटीसी पुस्तिका प्रकाशित केली. सामान्य जनतेला बौद्धधम्माचे आचार-विचार आणि तत्वज्ञानाबरोबरच तथागत बुद्धाचे चरित्र समजून घेता यावे म्हणून “बुद्ध आणि त्यांचा धम्म”  नावाचा आधुनिक बौद्धांचा बायबल शोभेल असा धम्म ग्रंथही लिहून ठेवला. मोझेसने आपल्या ज्यू लोकांना जशा टेन कमांडमेंट्स दिल्यात तशाच बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना बावीस प्रतिज्ञा दिल्यात. स्वाभाविकपणे त्यांचा आनंद गगनात मावेना आणि त्या आनंदाच्या भरात बाबासाहेब म्हणालेत, “आज माझा पुनर्जन्म झाला. माझी नरकातून मुक्ती झाली.”

परंतु आपल्या अनुयायांना बोट धरून चालायला शिकवण्याच्या आधीच बाबांचे महापरिनिर्वाण झाले आणि नवदीक्षित बौद्ध जनतेवर आकाशच कोसळले. आता त्या बुद्ध आणि त्यांचा धम्म शिवाय दुसरा गुरू उरला नाही. तथागत बुद्ध अंतिमसमयी आनंदाला म्हणाले होते. आनंदा ! माझ्या निर्वाणानंतर मी तुम्हाला उपदेशिलेला धम्मच तुमचा ‘गुरूशास्ता’ समजून आचरण करावे. बाबासाहेबांना अंतिम समयी असा संदेश देऊन जाण्याची संधी मिळाली नाही. 

अशा परिस्थितीत बौद्ध जनतेने सापडेल त्या माध्यमातून धम्म जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि साक्षात आचरणालाही सुरुवात केली.