ब्लॉग

भारतीय लेखकांची ‘ही’ तीन हिंदी पुस्तके इतिहासाचे सत्य स्वरूप आपल्यापुढे मांडतात

भारतीय इतिहासाचे प्रामाणिकपणे आणि डोळसपणे अवलोकन केल्यास एका ठराविक संस्कृतीचा उदोउदो केल्याचे दिसून येते. काही लोकांनी स्वतःचे वर्चस्व अबाधित राहण्यासाठी इथल्या श्रमण संस्कृतीला नष्ट करण्याचा प्रयत्न केला. प्राचीन साहित्यात, महाकाव्यात आणि इतिहासात काल्पनिक गोष्टींचा अंतर्भाव केला. दैदिप्यमान असलेल्या भारतीय इतिहासाच्या पानात घुसखोरी करून खोटी प्रकरणे घुसडली. वर्षानुवर्षे ती वाचून भारतीय जनमनावर त्याचेच संस्कार झाले. त्यातील अनेकांनी आंधळेपणाने त्यावर संशोधन देखील केले.

म्हणूनच आपले आदर्श, आपल्या जीवनाचे मार्गदर्शन, आपल्या जगण्याबद्दलच्या धारणा यांच्या आधारशिला ठरवायला हव्यात. इतिहासातील काल्पनिक गोष्टींच्या, कथांच्या, त्यातल्या व्यक्तिरेखांच्या किती प्रेमात पडायचे याचा सारासार बुध्दीने पुनर्विचार करायला हवा. वर्तमान काळात उभे राहून भविष्यकाळाचा वेध घेत असताना आपण सर्वांनीच भुतकाळा संदर्भातल्या सर्व प्रकारच्या समजूती तपासून घ्यायला हव्यात. आजच्या आणि यापुढच्या काळात जिज्ञासू वृत्ती, व्यक्तिस्वातंत्र्य, समता, न्याय, विज्ञानवाद, बुद्धिप्रामाण्यवादी धारणा यामुळेच आपण आणि आपला एकूणच समाज सुखी संपन्न होणार आहे ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. यामुळे या जीवनावश्यक मूल्यांशी सुसंगत काही असेल तर तेवढेच या कथा-कादंबरी-काव्य-महाकाव्य यातून शिकणे आणि तेवढ्याच प्रमाणात कृतज्ञ राहून मोकळे होणे, अशी वृत्ती अंगिकारायला हवी.

याच प्रमाणे इतिहासातील अनेक बाबींची अत्यंत विवेकी, समंजसपणाने, साक्षेपी पद्धतीने आणि मुख्य म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाने चर्चा करायला हवी. प्राचीन काळात वैज्ञानिक दृष्टिकोन आजच्या इतका नीट विकसित झाला नव्हता, त्या काळात डोळे झाकून, अंधपणाने या गोष्टी जशाच्या तशा मान्य करणे एक वेळ समजू शकते, पण आजच्या विज्ञानवादी दृष्टी अत्यंत विकसित झालेल्या काळातही आपण जर भाबडेपणाने किंवा अट्टाहासाने या सर्व गोष्टींकडे पाहणार असू तर मग आपण या विज्ञानयुगात व ज्ञानयुगात राहायला नालायक आहोत असे समजायला हवे ! आता इतिहासातील दिसत असलेल्या या खोट्या प्रकरणांचा मागोवा संशोधक करीत असून काही भारतीय लेखकांची त्याबाबत पुस्तके देखील प्रसिद्ध झाली आहेत. नुकतीच यासंदर्भात तीन हिंदी पुस्तके वाचनात आली. त्यांची माहिती खालील प्रमाणे आहे.

१) पुस्तकाचे नाव : भ्रम का पुलिंदा
लेखक : राजीव पटेल
सह लेखक : संजय कुमार सिंह
सम्यक प्रकाशन, नवी दिल्ली
किंमत : रू. २५०/-
या पुस्तकात भारताची मूळ सभ्यता आणि संस्कृती पासून ते ऐतिहासिक काळ, बुद्ध काळ, पाणिनी, चाणक्य, सातवाहन, भारहुत स्तूप, कालिदास, गुप्तकाळ, भाषा-लिपी, ईश्वर, अध्यात्म, आत्मा, आर्य आणि अनार्य आणि ब्राह्मणवाद या सगळ्यांची माहिती असून असत्य गोष्टींचा सडेतोड पुराव्यानिशी समाचार घेतलेला आढळतो.

२) पुस्तकाचे नाव : इतिहास का मुआयना
लेखक : राजेंद्र प्रसाद सिंह
सम्यक प्रकाशन, नवी दिल्ली
किंमत : रू. १५०/-
राजेंद्र प्रसाद सिंह एक प्रथितयश लेखक आहेत. या पुस्तकात सिंधु संस्कृती, बौद्ध संस्कृती, मौर्यकाळ, वैदिक काळ, शुंग-गुप्तकाळ, आधुनिक काळ आणि भाषांचा खरा इतिहास याबद्दल पुराव्यानिशी सज्जड, परखड आणि अभ्यासात्मक लिहिल्याचे दिसून येते.

३) पुस्तकाचे नाव : वैदिक युग का घालमेल
लेखक : राजीव पटेल
सह लेखक : संजय कुमार सिंह
सम्यक प्रकाशन, नवी दिल्ली
किंमत : रू. १७५/-
या पुस्तकात सुरुवातीलाच वैदिक युगांचे पुरावे उत्खननात प्राप्त झाले आहेत काय ? असा प्रश्न विचारून इतिहासात सहा काल्पनिक प्रकरणांची कशी घुसखोरी झाली आहे याचे दाखले दिले आहेत. अनेक प्रकरणातून सत्य दिसून आल्यावर वाचक दृढमूढ होऊन जातो.

वरील तीनही पुस्तके भारतीय इतिहासाचे सत्य स्वरूप आपल्यापुढे मांडतात. आजपर्यंत आपण कसे फसवले गेलो आहोत याचा यामुळे बोध होतो. तरी ज्या कुणाला डोळसपणे इतिहासाचे सत्य अध्ययन करायचं असेल तर त्यांनी वरील विचार प्रवृत्तक पुस्तके जरूर वाचावीत.

-संजय सावंत, नवी मुंबई, (लेखक- ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)