औरंगाबाद: जागतिक बौध्द धम्म परिषदेच्या निमित्ताने शुक्रवारी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयात धम्मसेवकांची बैठक घेण्यात आली. रविवारी (दि.17) शहरातून निघणाऱ्या समता वाहन फेरीत सहभागी होतांना दुचाकी स्वारांनी पांढरे वस्त्र व हेल्मेट परिधान करावे, असे आवाहन डाॅ.अरविंद गायकवाड यांनी केले. या बैठकीस हजाराहून अधिक धम्मसेवक उपस्थित होते.
मंचावर प्राचार्य किशोर साळवे, डाॅ. वाल्मिक सरवदे, आयटीआयचे प्राचार्य मिलिंद बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. परिषदेच्या तीन दिवसाच्या जबाबदारीची माहिती यावेळी डाॅ. गायकवाड यांनी दिली. समता रॅलीसंदर्भात डाॅ. सरवदे यांनी माहिती दिली. ते म्हणाले ही रॅली सर्वार्थाने शहरवासीयांच्या कायम स्मरणात राहिल, याची दक्षता प्रत्येक धम्मसेवकाने घ्यायला हवी. पांढरे वस्त्र, डोक्यात हेल्मेट घालून वाहनाला पंचशील ध्वज लावावा. पंचशील ध्वज संयोजकातर्फे पुरविले जातील.
कोणताही गोंधळ व हाॅर्ण न वाजविता धम्म सेवक फक्त तथागताच्या व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष करतील.पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी उदय चौधरी व विशेष पोलीस महानिरीक्षक रविंदर सिंघल यांच्या हस्ते फेरीस निळा ध्वज दाखवून भडकलेट येथून प्रारंभ होईल. यावेळी हर्षदीप कांबळे, भारत कदम, डाॅ. गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती राहिल. उपासक व उपासिका, तरूण, तरूणींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. परिषदेतील महिलाच्या सहभागासाठी उपासिकांची स्वतंत्र बैठक शनिवारी दुपारी १ वाजता पीईएस मैदानात आयोजित करण्यात आली आहे.