इतिहास

या मंदिरातील शिवलिंग हा मूळ ‘अशोकस्तंभ’; १८१० मध्ये आढळलेल्या स्तंभांचा बराचसा भाग जमिनीत

पलटादेवी मंदिराचा पहिला उल्लेख चार्ल्स ऍलन लिखित “The Buddha and Dr. Fuhrer” या पुस्तकात आला आहे. त्यामध्ये असे लिहिले आहे की नेपाळच्या तराई भागामध्ये इ. स.१८१० मध्ये सर्वेक्षण करण्यात आले, तेव्हा हा क्षतिग्रस्त अशोक स्तंभ आढळला होता. आणि त्यास शिवलिंग म्हणून पलटादेवी मंदिरात पुजले जात होते. या स्तंभांचा बराचसा भाग जमिनीत खोलवर गाडला गेलेला आहे. पलटादेवी मंदिरापासून ८ कि. मी. अंतरावर बर्डपुर हे गाव आहे. येथे ब्रिटिश अभियंता विल्यम पेपे यांच्या मालकीच्या जागेवर बुद्धधातू मिळालेला पिप्रहवा स्तूप आहे. पेपे यांनी सुद्धा पलटा मंदिरातील शिवलिंग हा मूळ अशोकस्तंभ असल्याचे म्हटले होते.

गोथिहवाचा तुटलेल्या स्तंभांचा भाग प्राचीनकाळी इथे आणून रोवला असावा असा कयास आहे. पण आज येथे तो शिवलिंग म्हणून पुजला जातो हे सत्य आहे.

नोव्हेंबर २०१९ मध्ये पिप्रहवा येथे मी आलो असताना या मंदिरातील अशोकस्तंभाची माहिती मला मिळाली. तेव्हा वाकडी वाट करून मी मुद्दामहून पलटादेवी गावाला ते बघावयास गेलो. मी जेव्हा तेथे पोहोचलो तेव्हा मंदिराचा परिसर दीड एकर जागेचा असल्याचे आढळले. तेथे आजूबाजूला तीस दुकाने उभारलेली दिसली. त्यामध्ये पूजेसाठी लागणारे सामान तसेच खाण्याचे पदार्थ विक्रीला ठेवले होते. तेथील पुजाऱ्याला मी माहिती विचारली असता त्यांनी सांगितले की येथे मुंडन करण्यासाठी मंदिराच्या दीडशे कि.मी. परिघातील अनेक गावातील भक्तजन येतात. मुंडन करतात आणि भोजन बनवितात. त्यामध्ये काही नेपाळमधील सुद्धा लोक असतात.

पलटादेवी मंदिराच्या आजूबाजूला पसरलेली ही बाजारपेठ

त्यानंतर मी महंत श्री दिनानाथ गिरी यांच्या ऑफिसमध्ये गेलो. त्यांनी सांगितले की ही फारच पुरातन जागा आहे. येथे पांडवांचे वास्तव्य होते आणि नशीब पालटल्याने तेरा वर्षे त्यांनी येथे अज्ञातवासात घालविली. पुढे त्यांचा मोठा भाऊ युधिष्ठिर यांनी या मंदिराचे नूतनीकरण केले आणि शिवलिंग स्थापन केले. येथे भक्त येऊन तेल ओततात. जून-जुलैमध्ये येथे मोठी यात्रा भरते.

वालुकामय पाषाणाचा हा अशोकस्तंभ असल्याचे स्पष्ट दिसते.

नंतर मी मंदिरातील शिवलिंग बघितले. परंतु तो वालुकामय पाषाणाचा अशोकस्तंभ असल्याचे स्पष्ट दिसत होते. अनेक वर्षांपासून तेलाने स्नान झाल्याने बराच झीजला होता. त्याचा परिघ २ फूट असून उंची २.५ फूट होती. जमिनीत तो खूप खोलपर्यंत असल्याचे सांगण्यात आले. त्या अशोकस्तंभास नमन करून मी दुःखद अंतःकरणाने बाहेर पडलो. तेथील लोकांची, महंतांची आणि पुजाऱ्याची मला कीव वाटली. इतिहासाचा विपर्यास करून तेथील बहुजन समाजात दंतकथा रुजवीण्यात ते यशस्वी झाले होते.

( दिपक आनंद यांनी कथन केलेल्या सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर जावे.)
https://nalanda-insatiableinoffering.blogspot.com/2020/07/palta-devi-temple-and-ashokan-pillar.

संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *