बुद्ध तत्वज्ञान

धम्म धारण करणे म्हणजेच बुद्ध उपदेशांना प्रज्ञेने पारखणे

मज्झिम निकाय या त्रिपिटकातील ग्रंथातील वत्थ सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी उपदेश केला आहे की जर एखादे मळलेले, डागाळलेले वस्त्र असेल आणि रंगाऱ्याने त्याला घेऊन कोणत्याही रंगात ते बुडविले तरीही त्याच्यावर चांगला रंग चढणार नाही. ते डागाळलेलेच राहील. कारण काय तर वस्त्र मलिन असल्याकारणाने त्यावरती पाहिजे तो रंग चढणार नाही. त्याचप्रमाणे चित्त जर विकारांने मलिन असल्यास त्याच्यावर सद्गुणांचा परिणाम होणार नाही. ते दुर्गतीलाच जाईल.

मात्र जर एखादे वस्त्र धुवून साफ आणि स्वच्छ केले असेल आणि मग रंगाऱ्याने त्याला घेऊन कोणत्याही रंगात बुडविले तर त्याच्यावर सुंदर रंग चढेल. शुद्ध आणि गडद रंगाने ते भरून जाईल. त्याचप्रमाणे शिलपालनाने आणि समाधी मार्गाने चित्त शुद्ध केले तर प्रज्ञेचा रंग त्याच्यावर पक्का चढेल. नाम-रूपाच्या अनित्यतेचे आकलन होऊन समतेची भावना प्रबळ होईल. प्रज्ञेचा रंग पक्का बसल्याने मन विकारमूक्त होऊन स्रोतापन्न अवस्था प्राप्त होईल. म्हणून प्रॅक्टिकल महत्वाचे. नुसते चिंतन-मनन उपयोगी नाही.

काही अभ्यासक, साधक धम्मातील उपदेशाला त्याच्या खऱ्या अर्थाने जाणत नाहीत. प्रज्ञाने पारखत नाहीत. प्रज्ञेने जाणल्याशिवाय धम्माच्या आशयाचे आकलन होत नाही. जे साधक धम्म-उपदेशांना धारण करतात ते त्यांच्या अर्थाला प्रज्ञाने पारखतात. नंतरच धम्माच्या अर्थाला समजू शकतात.

वाद-विवादासाठी, दुसऱ्यांना जिंकून घेण्याच्या इराद्याने ते धम्माचे अध्ययन करत नाहीत किंवा गप्पा मारण्यात व हुशारी दाखविण्यासाठी धम्माचे पाठांतर करीत नाहीत. धम्माचे अध्ययन हे सुयोग्य अर्थाचा अनुभव घेऊन करतात. असा चांगल्या तर्हेने धारण केलेला धम्म चिरकालपर्यंत हितकारक आणि सुखकारक होतो.

धम्माच्या खऱ्या अर्थाला न जाणल्यामुळे अडाणी मनुष्य ध्यानमार्गावर टीका-टिप्पणी करतो. स्वतःचे आणि इतरांचे ही नुकसान करतो. तरी मिळालेला दुर्लभ मानव जन्म सुयोग्य कार्यात, शिल-समाधी-प्रज्ञा यांना धारण करून व्यतीत केल्यास त्याचे निश्चित योग्य फळ प्राप्त होईल. Right understanding of the truth is the aim and object of Buddhism.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहासाचे अभ्यासक)