ब्लॉग

चिवर उतरविण्याच्या निमित्ताने….भिक्खु संघाचे नियम आपण समजून घेतले पाहिजेत

पूजनीय भिक्खु संघाने विनय नियमांचा भंग झाला असल्यामुळे एका व्यक्तीला प्रव्रार्जनीय कर्म शिक्षा सुनावली आहे. अर्थात चिवर काढून संघातून हकालपट्टी केलीय. याबद्दल संघाचे पुण्यानुमोदन. पण, सदर व्यक्तीचा स्वभाव पाहता तो अब्भानकर्म वगैरेचा हकदार बनण्यासाठी स्वतःत सुधारणा करेल की नाही ? हे आम्हास माहीत नाही. पण तसे असेल तर नक्कीच स्वागतार्ह बाब असेल.

असे अनेक जण चिवर घालून फिरत असतील, अनेकांनी मालमत्ता कमावून प्रतिष्ठाणे, मठ इत्यादी बांधलीत अशी समाजात चर्चा असते. संघासोबत न राहता एकेकटे राहून हे नेमके काय करतात हे न कळे. मूळ मुद्दा असा की त्यांच्यावर पण पूजनीय भिक्खूसंघ प्रव्रार्जनीय शिक्षा ठोठावणार का ? हे जेंव्हा होईल तो सुदिनच.

मुदलात बहुसंख्य ‘विनय नियम’ तथागतांनी उपासक-उपासीका यांनी वेळोवेळी भिक्खुंच्या अचरणावर जे आक्षेप नोंदविले होते, त्यावर उपाय म्हणून दिलेले होते. सध्या विनय नियमांना ‘अभिव्यक्ती’ या मूल्याबद्दलच्या बावळट आणि खुळचट संकल्पनेमुळे फेकून देऊन, आम्ही कसे ‘आधुनिक’ वगैरे आहोत ही टूम फोफावली आहे. फोफावत आहे. विचारस्वातंत्र्य आणि आचारस्वातंत्र्य यात गल्लत होत आहे. एकदा का चिवर परिधान केले म्हणजे तो प्रतिज्ञाबद्ध झाला असे समजले जाते. प्रतिज्ञेचा भंग दण्डनियच असतो हे सर्वांना कबूल आहे.

उदाहरणार्थ एखादा नागरिक सैन्यात भरती झाला, सैन्याचा युनिफॉर्म परिधान केला, पण मग सैन्यासाठी असलेले नियम ‘अभिव्यक्ती’ च्या नावावर जर तो भंग करत असेल तर मग त्याचे कोर्ट मार्शल निश्चितच होते. तसेच एखादा नागरिक अभिव्यक्तीच्या नावावर आर्मी कर्नल चा युनिफॉर्म परिधान करून मिरवत असेल तर तो देखील दंडनीय अपराध आहे. फ्रॉड आहे.

अगदी तसेच पूजनीय भिक्खु संघाचे देखील नियम आपण समजून घेतले पाहिजेत.
भारतीय संविधान आणि विनय पिटक यांच्यात काहीतरी विसंगती आहे असे बळेच भासवून काही जण संविधानाचा आधार घेऊन वाट्टेल ते धम्माच्या नावावर खपवित आहेत ही देखील अतिशय खेदजनक बाब समोर येत आहे. लक्षात घ्या दोघांत विसंगती अजिबात नाही. जो कोणी संविधानातील मूलभूत हक्काचा उच्चार विनय नियमांना धाब्यावर बसवण्यासाठी करीत असेल तो व्यक्ती क्रमांक एकचा बदमाश आहे असे समजून घ्यावे.

भिक्खु आवश्यकच पण..

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबो यंग मेन्स बुद्धिस्ट असोसिएशनच्या विद्यार्थ्यांसमोर बौद्ध धर्माचा उदय आणि अस्त या विषयावर मार्गदर्शन केले होते. त्यांनी भिक्खूचे महत्व त्या ठिकाणी अधोरेखित करताना सांगितले, की ” कोणताही धर्म जिवंत राहण्यासाठी त्यातील धर्मगुरू व पुरोहित कायम राहणे आवश्यक असते. बौद्धधर्माचा लोप होण्याचे विशेष कारण म्हणजे बौद्ध भिक्षुंचा अभाव निर्माण झाला होता. भिक्षुंची कोणतीही जात नव्हती. कोणीही व्यक्ती बौद्धधर्माला शरण जाऊन उपासक श्रामणेर, भिक्षु किंवा स्थवीर-महास्थवीर होऊ शकत होता. भिक्षु लोक समाजापासून दूर विहारात राहत असत. ब्राह्मणवादामध्ये ही बाब नव्हती. तेथे केवळ ब्राह्मणाच्या घरी जन्म होण्यामुळेच नवीन ब्राह्मण निर्माण होत असे. या कारणामुळे हिंदूंची विशेष हानी झाली नाही. नंतरच्या काळात मागासवर्गीय लोकांना भिक्षू बनवून त्यांची परंपरा कायम राखण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु चांगल्याप्रकारे शिक्षित नसल्यामुळे हे भिक्षू ब्राह्मणांच्या युक्तिवादाला उत्तर देऊ शकले नाहीत व त्यामुळे त्यांची हार झाली…”

चांगल्या प्रकारचे शिक्षित व प्रशिक्षणाच्या अभावी भिक्खु हे ब्राह्मणासमोर टिकाव धरू शकले नाहीत. हे जे भिक्खुंचे शिक्षण होते ते नेमके कसे असे ? याबद्दल बाबासाहेबांनी १९५६ ला दिल्लीमध्ये सांगितले होते,

” भिक्खु विद्वान आणि तावून सुलाखून निघालेला असावा लागतो. भिक्खुंच्या शिक्षणाच्या निरनिराळ्या पायऱ्या असत. अठरा वर्षाचा विद्यार्थी ज्येष्ठ भिक्खुकडे पाच वर्षे उच्च धार्मिक विद्यार्जनासाठी पाठविण्यात येत असे. तेथे चांगला अभ्यास केल्यावर वयाच्या पंचविसाव्या वर्षी तो ‘ श्रामणेर ‘ होण्याची योग्यता संपादन करीत असे. ‘श्रामणेर’ पुढे पाच वर्षे धकाधकीच्या आयुष्यातून गेल्यावर त्याची भिक्खु म्हणून ‘उपसंपदा’ होत असे. म्हणजे साधारणतः पंचवीस वर्षे वयापर्यंत योग्य विद्याध्ययन करून, चांगले आचरण ठेवण्यास उतरलेलाच भिक्खु होऊ शकत असे.”

तब्बल 13 ते 14 वर्षे अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर भिक्खु बनता येत असे. प्रक्रिया एवढयावरच न थांबता, प्रशिक्षणावेळी आणि नंतर सुद्धा त्याचे आचरण कसे आहे यावर चिवराचा अधिकार ठरत असे.

धम्मपदात चिवराचा अधिकारास अपात्र कोण आशा आशयाची गाथा अलेली आहे,

अनिक्कसावो कासावं यो वत्थं परिदहेस्सति ।
अपेतो दमसच्चेन न सो कासावमरहति ।।

अर्थ– जो आपल्या मनाला शुद्ध, स्वच्छ केल्याशिवायच ‘काषाय वस्त्र’ धारण करतो, तो संयम आणि सत्यापासून दूर आहे. त्याला काषाय वस्त्र धारण करण्याचा अधिकार नाही. बाबासाहेबांनी ‘ भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या महाग्रंथात उपरोक्त गाथा उद्धृत केलेली आहे.

तीन महत्वपूर्ण बाबी समोर आल्या आहेत.

पूजनीय भिक्खु संघाच्या निर्णयामुळे तीन महत्वपूर्ण बाबी समोर आल्या आहेत.
पैकी पहिल्या दोन बाबासाहेब आंबेडकरांनी पूजनीय भन्ते नागसेन यांचा संदर्भ देऊन धम्माच्या ऱ्हासाची कारणे सांगताना अधोरेखित केले होते,

१) जर धर्मोपदेशक विद्वान नसतील आणि चर्चेच्या प्रसंगी ते आपल्या धर्माचे उत्तमरीत्या प्रतिपादन करून यशस्वी होऊ शकत नसतील, तर धर्म विलयाला जातो

२) जेंव्हा सर्वसाधारण माणूस खऱ्या धर्मावर विसंबून राहात नाही केवळ नक्कल करतो त्यामुळे धर्म विलयाला जातो. कारण नक्कल चिरंतन नसते.
(आज अनेक उपासक ‘विज्ञानाच्या’ वैचारिक स्वातंत्र्य वगैरे च्या चुकीच्या संकल्पनेमुळे धम्माचा अव्हेर करून उच्छेदवादी, एकांशवादी होत आहे.)

३) उपासक-उपासिका आणि पूजनीय भिक्खु-भिक्खुनी संघ यांच्यात वैचारिक भेदामुळे समन्वय नाही. संघाचे प्रतिमोक्ष होत नाही. विनय नियमांची पायमल्ली संघाकडून होत आहे हे अतिशय वाईट आहे. जर संघच विनय नियम स्वतःहून विसर्जित करीत असेल तर मग जगात कोण ते पाळणार ?

या तीन समस्यांवर उपाय केल्याशिवाय धम्म प्रचाराची प्रगती जी खुंटली आहे, ती वाढणार नाही. हे उघड आहे.

– पवनकुमार शिंदे, परभणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *