भगवान बुद्ध एक कथा सांगत असत…एक ऐंशी वर्षाचा म्हातारा, वार्धक्यामुळे आंधळा झाला होता. त्याचे मित्र, शल्य विशारद वैद्य, त्याला सांगत होते, ‘तुझे डोळे ठिक होतील. तू उपचार कर. ‘परंतु तो म्हातारा तत्वज्ञ तसेच तर्कशास्त्रज्ञ होता. ज्ञानी होता. तो म्हणे, ‘मला डोळ्याची गरजच काय? मला बारा मुले आहेत, म्हणजे चोवीस डोळे. माझी बायको म्हणजे दोन डोळे अनेक नातवंडे म्हणजेच अनेक डोळे. मला सांगा काय जरूरी आहे डोळ्यांची? माझ्या घरात कमीत कमी शंभर डोळे आहेत. माझे दोन डोळे नाहीत म्हणून काही बिघडत नाही. मला डोळ्यांची गरजच वाटत नाही. त्याच्या म्हणण्यात देखील तथ्य होते.
परंतु एके दिवशी त्याच्या घराला आग लागली. जे त्याचे शंभर डोळे होते ते घर सोडून पळाले. त्या म्हाता-याला सर्व विसरले. होय! तो म्हातारा त्यांना आठवला, पण केव्हा? ते सुरक्षित जागेत पोहचले तेव्हा. तात्काळ त्यांच्या लक्षात आले, आपला म्हातारा घरात अडकला आहे. आता काय करायचे? घराला प्रचंड ज्वाळांनी घेरले होते. म्हातारा धडपडत होता. परंतु तो अग्नीच्या भक्षस्थानी पडला. तेंव्हा त्याला कळले की आपले तर्कशास्त्र, तत्वज्ञान मूर्खपणाचे होते. माणसाला स्वतःचे डोळे हवेत, इतरांचे नव्हे!
बुद्ध नमामी,धम्म नमामी,संघ नमामी