इतिहास

पिप्रहवा’ येथील तथागतांचा पवित्र अस्थिधातू कलश आणि स्तूपाचा इतिहास

‘पिप्रहवा’ हे गाव सांप्रत उत्तर प्रदेश मध्ये ‘सिद्धार्थ नगर’ या जिल्ह्यात आहे. तथागतांचे जन्मस्थान म्हणून जगद्विख्यात असलेल्या ‘लुंबिनी’ या ठिकाणापासून ‘पिप्रहवा’ हे गांव १२ मैल म्हणजेच २० कि. मी. अंतरावर आहे. या गांवामध्ये एक टेकडी होती. इ.स. १८९८ मध्ये ब्रिटिश अभियंता ‘विल्यम पेपे’ यांनी येथे सर्वप्रथम उत्खनन केले.

वरचा मातीचा ढिगारा काढल्यावर त्यांना तेथे पक्क्या विटांचे बांधकाम केलेला स्तूप आढळला. त्या स्तूपात काही मिळेल या अनुषंगाने त्यांनी तो खोदला असता, दहा फूट खोलीवर त्यांना एक दगडी मंजुषा आढळली. ती त्यांनी हळूवार पणे बाहेर काढली आणि उघडली असता, त्यात त्यांना पाच कलश मिळाले. त्यात दहन केलेल्या काही मानवी अस्थिंचे अवशेष व काही माणिक व इतर बहुमूल्य रत्ने होती. त्यापैकी एका अस्थिधातू कलशावर ‘ ब्राह्मी ‘ अर्थात् ‘ धम्मलिपी ‘त काहीतरी लिहिलेले होते.

उत्खननकर्ता ‘विल्यम पेपे’ यांनी प्रख्यात प्राच्यविद्या संशोधक ‘जॉर्ज ब्यूह्लर’ यांच्या करवी त्याचे वाचन पुढील प्रमाणे केले- ‘ शाक्य कुळाच्या ताब्यातील भगवान बुद्धांच्या अस्थी. ‘ अस्थिधातू कलश तथागत बुद्धांचा असल्याचे सिद्ध झाल्याने, तिथे उपस्थित असलेले सर्वचजण आश्चर्यचकितच झाले….

त्याचवेळी सयामचे (सध्याचा ‘ थायलंड ‘ हा देश) राजे ‘राम-५’ यांचा पुतण्या ‘ प्रिसदंग ‘ हा सिरिलंकेमधून भिक्खूची उपसंपदा घेऊन पिप्रहवा येथे आला होता. त्यांनी बघितले की येथे उत्खननात तथागत बुद्धांच्या पवित्र अस्थी मिळाल्या आहेत, तेव्हा त्यांनी तात्काळ ब्रिटिश सरकारकडे अर्ज केला की ,”त्या अस्थी सयाम देशाला द्याव्यात.

तो देश बौद्ध असल्याने तेथे त्या अस्थींची भक्तिभावाने पूजा होईल…” त्यांची मागणी मान्य करण्यात येऊन ‘पिप्रहवा’ येथे एक मोठा समारंभ होऊन, त्यात त्या पवित्र अस्थि ‘सयाम’ देशाचे राजे ‘राम-५’ यांना सुपूर्द करण्यात आल्या. पुढे ,नंतर त्या बँकॉक येथे नेल्यावर , तेथे मोठा समारंभ भरवून, राजाने त्या अस्थींचे मोठ्या भक्तीभावाने पूजन केले. आणि त्या अस्थिंचे पुन्हा काही भाग करून ते म्यानमार व सिरीलंका येथील पॅगोडे व विहारांना दिले. ब्रिटिशांनी रिकामा अस्थिधातू कलश व काही रत्ने कलकत्ता येथील म्युझियममध्ये ठेवली. व काही रत्ने विल्यम पेपे यांनासुद्धा दिली.

नंतर, इ.स.१९७२ साली ‘भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागा’चे अधीक्षक ‘के. एम. श्रीवास्तव’ यांना काय वाटले कुणास ठाऊक, पण ”विल्यम पेपे यांनी हा स्तूप पूर्णपणे खणला नाही…” असेच त्यांचे मत पडले, आणि त्यांनी पुन्हा तेथे इ.स.१९७२ मध्ये उत्खनन चालू केले. विल्यम पेपे यांनी इ.स. १८९८ मध्ये या स्तूपाचे सुमारे १० फुटापर्यंत उत्खनन केले होते. त्याच्याही खाली आणखी ९ फुटांपर्यंत गेल्यावर मात्र सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. तेथे त्यांना विटांचे बांधकाम दिसले. आणि दोन अस्थिधातू कलश सापडले. एका कलशात २२ अस्थि-अवशेष मिळाले. दुसरा कलश मात्र रिकामा होता. यामुळे इ.स.१८९८ मधील विल्यम पेपे यांचे उत्खनन आणि इ.स.१९७२ मधील श्रीवास्तव यांचे उत्खनन यामुळे काही प्रश्न उपस्थित झाले.

दोघांनाही उत्खननात वेगवेगळ्या थरावर दगडी मंजुषा सापडल्या. त्यामुळे एकाच स्तूपात दोन वेगवेगळ्या थरांवर अस्थि का ठेवल्या गेल्या हे मोठे कोडे तयार झाले. त्यानंतर अनेकदा झालेल्या आतापर्यंतच्या संशोधनाने खालील गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत –

भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या पवित्र अस्थीधातूंवर आठ ठिकाणी ज्या स्तूपांची उभारणी झाली, त्यापैकीच एक हा ‘प्रिप्रहवा’चा स्तूप आहे आणि तो शाक्यकुळांचा आहे.

या स्तूपाची निर्मिती ही तथागतांच्या महापरिनिर्वाणानंतर लगेचच काही दिवसांनी करण्यात आली. म्हणजेच हा स्तूप व या स्तुपामधील तथागतांचे अस्थिधातू कलश हे इ.स. पूर्व ४८३ या वर्षातीलच आहेत.

या स्तूपामध्ये दोन अस्थिधातू कलश ठेवून शाक्यांनी या स्तूपाची उभारणी केलेली आहे.

हा स्तूप सुरुवातीला लहान व साधा होता. नंतरच्या राजवटीत मात्र वेळोवेळी तो मोठा करण्यात आला.

सम्राट अशोक यांच्या काळात इतर सात ठिकाणच्या स्तूपांबरोबरच शाक्यांचा हा पवित्र स्तूपही श्रद्धापूर्वक उघडला गेला. त्यातील एका कलशातील अस्थि काढल्या आणि रिकामा कलश तेथेच पुन्हा ठेवला गेला.

काढलेल्या अस्थींचे पुन्हा भाग करून त्याच्या ‘अस्थीकुप्या’ बनवून, सम्राट अशोक यांनी त्या भारतभर स्तुप उभारण्यासाठी पाठविल्या.

त्यानंतर दोनशे वर्षांनी, कुण्या अज्ञात राजाच्या राजवटीत पुन्हा हा शाक्यांचा स्तूप उघडून, तेथे १० फुटावर दगडी मंजुशेत पवित्र अस्थींचे ५ अस्थिधातू कलश ठेवले गेले, जे विल्यम पेपे याला त्याने केलेल्या येथील उत्खननात इ.स. १८९८ मध्ये सापडले.

खालील फोटोत ” पिप्रहवा ” येथील स्तुपाच्या उत्खननात मिळालेला , तथागत बुद्धांच्या अस्थिधातूंचा कलश, व त्यावर कोरलेल्या ‘ब्राह्मी’ अर्थात् ‘धम्मलिपी’ मधील लेखाचे मी स्वतः केलेले अक्षरांतर व लिप्यंतर दिले आहे-

या अस्थिधातू कलशावर कोरलेल्या पाली प्राकृतमधील ३७ अक्षरांच्या या ब्राह्मी लिपीमधील लेखाचे नागरी लिप्यंतर असे….

“यनं इय सलिलनिधने बुधस भगवत सकि सुकिति
भतिनंस भगिणिकनंस पुतदलनं”

भाषांतर- “शाक्य सुकिर्ती याने आपले शाक्य बंधू, भगिनी, पुत्र व भार्यांसह कमलनिधिष्ठित अशा भगवन् बुद्धाच्या पवित्र अशा शरिरधातूंवर हा स्तूप स्थापित केला ….”

परंतु, मध्यंतरी काही दिवसांपूर्वी मात्र ‘प्रो. राजेंद्रप्रसाद सिंह’ नावाच्या एका विद्वान अभ्यासकांनी या अस्थिधातू कलशावरील ब्राह्मी लिपीमधील लेखाचा आधार घेऊन, तथागत बुद्धाचे नांव हे ‘सिद्धार्थ’नसून, ते ‘सुकिर्ती’होते, अशा प्रकारचे विधान करून खळबळ उडवून दिली होती. त्यांचे ते मत मी वरील ब्राह्मी लेखाचे अतिशय सुयोग्य भाषांतर करून सप्रमाण खोडून काढलेले आहे.

‘पिप्रहवा’ येथील तथागत बुदधाच्या अस्थिधातू कलशावरील स्तूपाची निर्मिती ही तथागत बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर लगेचच, म्हणजे इ. स. पूर्व ४८३च्या सुमारास केली गेली. तथागत बुद्धाच्या शरीरान्तानंतर त्यांचे पार्थिव शरीर हे कुशिनारा येथेच चंदनाच्या सुगंधी लाकडाने जाळले गेले. आणि जळालेल्या अस्थिंचे ८ भाग करून , ते राजगृह , वैशाली, कपिलवस्तु, अल्लकप्प, रामग्राम, पावा, वेठ्ठदीप, आणि कुशिनारा येथील तथागत बुद्धाच्या अनुयायांनी नेऊन, मोठ्या पूज्यभावाने तथागतांच्या या अस्थिधातूंवर त्यांनी स्तूप उभारले. ‘कपिलवस्तु’ ही शाक्यांची राजधानी होती, आणि तथागत बुद्ध आपल्या गृहत्यागापूर्वीच्या पूर्वायुष्यात कपिलवस्तुचा शाक्यवंशीय राजा ‘शुद्धोधन’ याचा पुत्र, म्हणजेच शाक्यांचा ‘राजपुत्र’ होता. त्यांमुळे तेथील शाक्यांना तथागत बुद्धांविषयी पराकोटीचा आदर असल्याने , आपल्या वाट्यास आलेल्या तथागतांच्या अस्थिधातूंवर शाक्यांनी मोठ्या भक्तीभावाने स्तूपाची उभारणी केली. यात शाक्य ‘सुकिर्ती’ याने आपले इतर शाक्य बांधव, भगिनी, मुले व पत्नींसह कपिलवस्तूजवळ हा स्तूप बांधला.

‘विल्यम पेपे’ यांनी उत्खनीत केलेल्या या स्तूपातील अस्थिधातू कलशावरील ‘ब्राह्मी’ लिपीमधील मजकुराचे इ.स.१८९८ सालीच प्रख्यात प्राच्यविद्या संशोधक ‘जॉर्ज ब्यूह्लर’ यांनी संक्षिप्त भाषांतर करुन, “शाक्यांनी आपले बंधू, आपल्या भगिनी व मुले, तसेच बायकांसह या स्तूपाच्या निर्मितीसाठी मोलाचे योगदान दिले असल्याचे” म्हटले आहे.

परंतु, तथागत बुद्धाच्या या अस्थिधातू कलशावरील ब्राह्मी लेखाचा सखोल अभ्यास करूनच, ‘प्रो. राजेंद्रप्रसाद सिंह’ यांनी बुद्धाचे नांव ‘सिद्धार्थ’ असे नसून, ते ‘सुकिर्ती’ असे होते, असे जे विधान केले होते, त्याचे संपूर्णपणे खंडन मी या ब्राह्मी लेखाचे अतिशय यथायोग्य असे भाषांतर करून,जाहीर रित्या केले आहे. या अस्थिधातू कलशावरील ब्राह्मी लेखात आलेले ‘सुकिर्ती’ हे नांव तथागत बुद्धाचे नसून, ”पिप्रहवा” येथील स्तूप आपल्या शाक्य बंधू, भगिनी, पुत्र व भार्यांसह बांधणाऱ्या ‘शाक्य सुकिर्ती’ चेच आहे, असे अभ्यासाअंती माझे ठाम मत आहे.

-अशोक नगरे, पारनेर (लेखक – मोडी लिपी तज्ज्ञ, बौद्ध लेणी, बौद्ध स्थापत्य आणि बौद्ध इतिहास अभ्यासक)