पितळखोरा येथे १३ बौद्ध लेणी आहेत. औरंगाबाद पासून चाळीसगावकडे जाताना ६८ किलोमीटर अंतरावर पितळखोऱ्याची लेणी सातमल पर्वतात आहेत. लेण्यापर्यंत जाण्यास अजूनही रस्ता तयार झाला नाही. अजंठा सारख्याच अर्धवर्तुळाकार आकाराच्या दरीत ही लेणी खोदली गेली आहेत. दरीतून पाण्याचा ओढा वाहत जातो. एकेकाळी ही बौद्ध लेणी अत्यंत प्रेक्षणीय असली पाहीजेत. पण समोरचा बराचसा भाग पडल्यामुळे बहुतेक सर्व दर्शनी भाग आता नष्ट झाला आहे.

चैत्यगृहात बुद्धांची आणि बोधिसत्वांची सुंदर चित्रे काढली आहेत. येथे असलेल्या शिलालेखावरून ही लेणी इ.स. पूर्वी २०० साली खोदली गेली असली पाहीजेत. इसवी सनाच्या चौथ्या-पाचव्या शतकात येथे महायानी बौद्धांनी वास्तव्य केल्याचे दिसते. खडकात आझळून येणाऱ्या दोषामुळे येथे जास्त खोदकाम झाले नसावे असे वाटते.

पितळखोर्याच्या चैत्यगृहातील दागोबाच्या एका खोबणीत स्फटिकाच्या करंडकात रक्षा सापडल्या. ह्या शोधामुळे भाजे, कार्ले इत्यादी चैत्यगृहातील दागोबाच्या खोबण्यातही अशाच प्रकारचे करंडक असले पाहिजेत असे पुराणवस्तुशास्त्राज्ञांचे ठाम मत आहे. पितळखोर्याच्या चैत्यगृहातील खडक वरून खाली खोदतांना तांबड्या मातीचा थर लागला. त्यातून आत चैत्यगृहात पाणी येऊ नये म्हणून वरच्या भिंतीच्या खडकातून पाणी जाण्यासाठी वाट करून दिली आहे. नंतर त्या भिंतीची व्यवस्थित दुरूस्ती करून वरून गिलावा दिला आहे. हे पितळखोर्याच्या वास्तूशिल्पाचे एक वैशिष्ट्य आहे.

टोलेमीच्या ग्रंथातील “पेट्रिगला” आणि “महामायापुरी” ह्या बौद्ध ग्रंथातील “पीतंगल्य” म्हणजेच हल्लीचे पितळखोर होय. महामायपुरी संकरीन नावाचा यक्ष “पीतगंल्य” म्हणजेओ पितळखोर येथे राहत होता असे म्हटले आहे.