बातम्या

घर बांधकामा दरम्यान सापडलेली १७०० वर्षे जुन्या बुद्धमूर्तीची तोडफोड; व्हिडिओ व्हायरल

पाकिस्तानातील मर्दान येथील तख्तभाई भागात एका घराचे बांधकामासाठी खोदकाम चालू असताना सापडलेल्या प्राचीन बुद्धमूर्तीची तोडफोड केल्याबद्दल खैबर पख्तूनख्वा पोलिसांनी शनिवारी चार जणांना अटक केली आहे. पुरातत्व विभागाच्या म्हणण्यानुसार हा परिसर प्राचीन काळी गांधार प्रांत होता. सापडलेली मूर्तीसुद्धा गांधार शैलीतील आहे.

आज शनिवारी पाकिस्तानमध्ये सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत होता. ज्यामध्ये एक व्यक्ती हातोडीने बुद्धाची प्राचीन मूर्ती फोडताना दिसत आहे. ह्या बाबत पाकिस्तानातील पुरात्तव विभागाने गंभीर दाखल घेत घटनास्थळी जाऊन ती जागा ताब्यात घेतली आहे.

घटनेची दखल घेत पाकिस्तान पर्यटन विभागाच्या अधिका्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर व्हिडिओ मध्ये मूर्ती फोडताना दिसणाऱ्या लोकांना तात्काळ अटक करण्यात आली. मूर्तीचे फोडलेले तुकडेही जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्यांमध्ये कमर जमान, अमजद, अलेम आणि सुलेमन यांचा समावेश आहे.

पुरातत्व विभागाचे संचालक ह्यांनी हा प्रकार म्हणजे मोठा गुन्हा असून “कोणत्याही धर्माचा अनादर करणे हे असह्य” असल्याचे म्हटले आहेत. तसेच पुरातत्व कायदा अंतर्गत त्यांच्याविरुद्ध (एफआयआर) नोंदविला गेला आहे. संशयितांना अटक करण्यात पोलिसांच्या तातडीने कारवाईबद्दल डॉ. समद यांनी कौतुक केले.

१७०० वर्षे जुनी बुद्ध मूर्ती :

बांधकाम करण्यासाठी खोदकाम करताना सापडलेली बुद्धमूर्ती ही प्राचीन गांधार शैलीतील होती. सुमारे १७०० वर्षे जुनी बुद्धमूर्ती असून हा परिसर आता पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.