जगभरातील बुद्ध धम्म

‘पोसन फेस्टिव्हल’ हा श्रीलंकन बौद्धांचा वार्षिक उत्सव; भारत आणि श्रीलंका संबंधाचा ऐतिहासिक दिवस

श्रीलंकेतील पोसन पोया या नावाने ओळखल्या जाणारा ‘पोसन फेस्टिव्हल’ हा इसवीसन पूर्व तिसऱ्या शतकात बौद्ध धर्माची ओळख झाली म्हणून साजरा केला जातो. जूनमध्ये पौर्णिमेच्या दिवशी ‘पोसन’ हा सण साजरा केला जातो. पोसन फेस्टिव्हलमध्ये मिहिंतले येथील खडकाचे शिखर महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, कारण असे म्हटले जाते की, ते मिहिंताले येथे असलेल्या या ठिकाणी श्रीलंकेचा राजा देवानमपियातिस्सा यांना भारतातून आलेला सम्राट अशोकाचा मुलगा अर्हत महिंदाने बौद्ध धम्माची शिकवण सांगून बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती.

त्यामुळे पोसन फेस्टिव्हल हा श्रीलंकन बौद्धांचा वार्षिक उत्सव आहे. पोसनच्या दिवशी बौद्ध लोक श्रीलंका देशाच्या प्राचीन राजधानी असलेल्या अनुराधापुरा येथे दाखल होतात. कारण तिथेच अर्हत महिंदाने तत्कालीन शासक, राजा देवानमपिया तिसा आणि त्याचे राज्य बौद्ध धर्मात बदलले होते. त्यानंतर श्रीलंका थेरवादी बौद्ध धम्माचे मुख्य स्थान बनले होते.

हा सण म्हणजे श्रीलंकेतील वर्षातील सर्वात महत्वाची पोया (पौर्णिमा) होय. तसेच या दिवशी संपूर्ण देशात शासकीय सुट्टी असते. बौद्धांसाठी, पोसनचा हा पवित्र दिवस वेसाक नंतर दुसर्‍या क्रमांकाचा आहे. संपूर्ण बेटावर पोसन साजरा केला जातो, ह्या उत्सवाचा सर्वात महत्वाचा समारंभ अनुराधापुरा आणि मिहिंतले येथे होतो. मिहिंतलेच्या डोंगरावर असलेला बौद्ध मठ हा धार्मिक उत्सवाचा केंद्रबिंदू आहे. कारण या ठिकाणी अर्हत महिंदा थेरोने श्रीलंकेचा राजा देवानमपिया तिसा याला बौद्ध धर्माचा उपदेश केला होता.

त्यासोबतच अनुराधपुरा मधील बौद्ध स्थळांच्या सभोवताल देखील हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. श्रीलंकेला बुद्धमय करण्यासाठी अनुराधपुरा शहरातूनच सुरुवात झाली होती. पोसन सणाच्या दरम्यान ही दोन बौद्ध स्थळ हजारो यात्रेकरूंना आकर्षित करतात. येथे येणारे यात्रेकरू पांढरी वस्त्रे परिधान करूनच येतात आणि आध्यात्मिक ठिकाणी पूजा करतात. ह्यासोबतच अनुराधापुरा आणि मिहिंतले शहरा बाहेरील बौद्ध लोक हा सण कथा, संगीत, नृत्य, विनामूल्य भोजन आणि चहा देऊन तसेच कागदी कंदील टांगून हा सण साजरा करतात. श्रीलंकेच्या काही भागांत ह्या सण-उत्सवा दरम्यान मांस आणि अल्कोहोलची विक्री करण्यास मनाई आहे.

पोसन फेस्टिव्हल

देशाच्या विविध भागात मिहिंदू पेरहेरस म्हणून ओळखल्या जाणार्‍या या कार्यक्रमाच्या स्मरणार्थ मिरवणुका आयोजित केल्या जातात. ईसापूर्व तिसर्‍या शतकात पोसन फेस्टिव्हलमध्ये श्रीलंकेचे बौद्ध धर्मात रूपांतर होण्याचे स्मरण केले जाते . देशभरात प्रकाश आणि मिरवणुका निघतात, पण महोत्सव पाहण्याची उत्तम जागा मिहिंतले येथे आहे.

पोसन फेस्टिव्हलमध्ये श्रीलंकेच्या कानाकोपऱ्यात बौद्ध धर्माभिमानी गाणी गायली जातात, तर ५५० जातक कथा किंवा भगवान बुद्धांच्या ५५० पूर्वीच्या जीवनातील कथांवरील रंगीबेरंगी चित्रण केलेल्या पोसन पंडाल देशातील प्रत्येक शहरात बऱ्यापैकी दिसतात.

मिहिंताले येथे असलेल्या या ठिकाणी श्रीलंकेचा राजा देवानमपियातिस्सा भारतातून आलेल्या अर्हत महिंदा यांची भेट झाली होती.

राजा देवानमपिया तिसा आणि अर्हत महिंदा यांची भेट

राजा देवानमपिया तिसा एकदा हरणांची शिकार करीत असताना अर्हत महिंदा त्याला एका खोबणीत दिसला त्या दोघांनीही भेट झाली. अर्हत महिंदाच्या भेटीने आणि बुद्धांच्या विचाराने प्रभावित होत राजाने बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन बौद्ध धम्माला राज्य धर्म घोषित केले. मिहिंतले शहराच्या वर एका खडकाचे शिखर आहे जिथे अंबास्थले दागोबा नावाचे एक बौद्ध मठ आहे. त्यावर जाण्यास 1840 पायऱ्या आहेत. याच ठिकाणी अर्हत महिंदा आणि राजाची भेट झाली असल्याचे सांगितले जाते.