आषाढ पौर्णिमेच्या रात्री राजकुमार सिद्धार्थाने गृहत्याग केला. कपिलवस्तु सोडल्यानंतर ज्या ठिकाणी त्यांनी घोडा थांबिविला व कपिलवस्तुकडे घोडा वळवून,अनिमिष नेत्रांनी या नगरीचे शेवटचे दर्शन घेतले, त्या ठिकाणी नंतर “कंथक निवत्तन चेतिय” बांधण्यात आले. हे चैत्य फाहियान या चिनी बौद्ध भिक्खूने इ.स. ५व्या शतकात पाहिल्याची नोंद केली आहे.
कन्नीन्घम यांनी या चैत्याचे स्थान सध्याच्या गोरखपूर पासून दक्षिणेकडे दहा मैल अंतरावर, औमी नदीच्या काठी असलेल्या चंदावली गावात असल्याचे दर्शविले आहे. सिद्धार्थ नंतर पुढे निघाला असता, पुढे नदी लागली. छन्नाला विचारला असता, त्याने ती “अनोमा” नदी असल्याचे सांगितले. यावर राजकुमा सिद्धार्थ उत्तरला, ” माझी प्रवज्जा देखील अनोमा असेल”. (अनोमा म्हणजे सुविख्यात, नामांकित). तेथे घोड्याला व छन्नाला सोडून सिद्धार्थाने अनोमा नदीत उडी घेतली व पार केली.
नदीतीरी सिद्धार्थाने आपले केस कापले. या ठिकाणी नंतर “चुडामणी चैत्य” बांधण्यात आले (चुडा = केशसंभार). कन्नीन्घम यांनी हे स्थळ सध्याचे चुरेय नावाचे गाव असल्याचे नमूद केले आहे जे चंदावली गावाच्या उत्तरेकडे तीन मैलावर आहे. पुढे चालत जाऊन, ज्या ठिकाणी त्यांनी राजसी वस्त्रे काढून काषाय वस्त्रे परिधान केली तेथे “काषाय ग्रहण चैत्य” बांधण्यात आले. हे स्थान कन्नीन्घमनुसार सध्याचे कसेयर गाव आहे जे चंदावलीच्या दक्षिण पूर्वेला साडेतीन मैलावर आहे.
रात्रभर चालत सिद्धार्थाने मल्लांच्या प्रदेशातील अनुपिया या नगरातील आम्रवनात ध्यान करत सात दिवस मुक्काम केला. नंतर चालत जाऊन वैशाली नगरी मार्गे मगध राज्याची राजधानी राजगृह (आत्ताचे राजगीर) येथील रत्नागिरी डोंगरावर मुक्काम केला. येथेच मगध नरेश बिम्बिसार याने त्यांची भेट घेतली. पालि त्रिपिटक अनुसार कपिलवस्तु ते राजगृह हे अंतर ६० योजन आहे. राजकुमार सिद्धार्थाने ज्या मार्गाने प्रवास केल्याचे पालि त्रिपिटकात सांगितले आहे त्या मार्गाचे google map च्या साह्याने मार्गक्रमण दाखविले आहे.(आत्ताचे ५२२ किमी) आहे.
अतुल भोसेकर (लेखक – इतिहास आणि लेणी अभ्यासक)
संदर्भ: Ancient Geography of India
पब्बज्जा सुत्त, सुत्तनिपात
जातक कथा
बुद्धकालीन भारतीय भूगोल
The Life of Buddha
महावस्तु
Mast