ब्लॉग

प्रोफेसर पी एल नरसु: एक दुर्लक्षित बौद्ध नायक

ज्यावेळेस दक्षिण भारतात ख्रिश्चन मिशनरी धुमाकूळ घालत होते, ज्यावेळेस भारतातील बौद्ध धम्माचे अस्तित्व संपल्यागत जमा झाले होते,ज्यावेळेस ब्राम्हणवाद आणि जातीयतेने आपले अक्राळविक्राळ रूप धारण केले होते त्यावेळेस अनागरिक धर्मपाल श्रीलंकेहून भारतात आले आणि भारतातील बौद्ध धम्माच्या पुनरुज्जीवनासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले.

त्यांनी स्थापन केलेल्या महाबोधी सोसायटी ऑफ इंडियाच्या अंतर्गत मद्रास प्रांतात आयु टी सिंगारीवेलू, आयोथी थासर आणि प्रोफेसर पी एल नरसु यांनी शाक्य बुद्धिस्ट सोसायटीची स्थापना केली. यापैकी टी सिंगारीवेलू हे नंतर मार्क्सवादाच्या प्रभावाखाली आले तर पंडित आयोथी थासर हे बौद्ध धम्माला द्रविड विरुद्ध ब्राम्हणी संस्कृती या दृष्टिकोनातून बघत होते. आयोथी थासर यांच्या मृत्यूनंतर शाक्य बुद्धिस्ट सोसायटीची संपूर्ण धुरा प्रोफेसर पी एल नरसु यांचेवर आली. फिजिक्स या विषयाचे प्रोफेसर असलेले नरसु यांचे त्यांच्या विषयातील शोधनिबंध जगप्रसिद्ध विज्ञान पत्रिकेतून प्रकाशित होत असत. आपल्या विषयात त्यांचे अत्यंत प्रभुत्व होते आणि त्या विषयातील वादविवादात त्यांनी अनेक युरोपियन आणि ब्रिटिश विद्वानांना पराभूत केलेले होते.

1907 साली त्यांनी लिहिलेला The Essence of Buddhism हा ग्रंथ शाक्य बुद्धिस्ट सोसायटीचा प्रमाणग्रंथ होता.या ग्रंथाला जपानमध्ये खूप मागणी होती. त्यांनी लिहिलेला What is Buddhism हा ग्रंथ चेकोस्लोवाकियाच्या राष्ट्रपतींनी स्वत: अनुवादित करून त्या देशाचा मार्गदर्शक ग्रंथ मानला. त्यांनी त्याशिवाय ‘Buddhism in a Nutshell’, A Study of Caste हे सुद्धा ग्रंथ लिहिलेत. त्यांचे बौद्ध धम्माची मांडणी विज्ञानवादावर आधारित करणारे लेख The Religion of Modern Buddhist या अलोसियस यांनी संपादित केलेल्या ग्रंथात प्रकाशित झालेले आहेत.

आपल्या हयातीत त्यांनी चार बौद्ध परिषदांचे आयोजन मद्रास प्रांतात केले होते. प्रोफेसर पी एल नरसु यांचा जन्म 1861 मध्ये अत्यंत संपन्न अशा घरात झाला. त्यांचे वडील मद्रास हायकोर्टातील एक प्रसिद्ध वकील होते. प्रोफेसर पी एल नरसु यांना मात्र कौटुंबिक सुख लाभले नाही. त्यांचे काही भाऊ आणि मुले तरुण वयातच मरण पावले. तसेच त्यांच्या पत्नीचेही निधन झाले. प्रोफेसर पी एल नरसु यांनी श्रीलंकेत जाऊन जाहीरपणे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. त्यानंतर त्यांनी आपले संपूर्ण जीवन बौद्ध धम्माच्या प्रचार प्रसाराकरता खर्ची घातले.

प्रोफेसर पी एल नरसु हे आधुनिक काळातील Engaged Buddhism चे प्रवर्तक होते.त्यांचे इंग्रजी, फ्रेंच, तामिळ,तेलगू, जपानी, संस्कृत आणि पाली भाषेवर प्रभुत्व होते. अनेक प्रगतिशील संस्था आणि संघटनेत एक सक्रिय आणि सन्माननीय सभासद म्हणून ते कार्यरत होते.आधुनिक काळात धम्मक्रांती घडवून आणणारे महानायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रोफेसर पी एल नरसु यांच्या कार्याचा अतिशय गौरव केला. त्यांच्या प्रसिद्ध The Essence of Buddhism या पुस्तकाचे त्यांनी 1948 ला पुनरप्रकाशन करून त्याला प्रस्तावना लिहिली. ‘प्रोफेसर पी एल नरसु हे एकोणिसाव्या शतकातील भारतातील अत्यंत प्रतिभावान व्यक्ती होते’ असा त्यांनी त्यांचा यथोचित गौरवही केला.

बौद्ध धम्माच्या वाचकांसाठी उपलब्ध असलेले The Esssence of Buddhism हे अत्यंत मौलिक पुस्तक आहे असा अभिप्रायसुद्धा त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत दिला.वर्तमानकाळात बाबासाहेबांच्या चळवळीचा विचार करताना त्याला केवळ राजकारणाच्या परिप्रेक्षातून बघितले जाते. प्रभावशाली जातसमूह असलेल्या वर्गातील सुधारक व्यक्तिंना अतिमहत्व दिले जाते. तामिळनाडूतील पेरियार, केरळमधील नारायण गुरू, उत्तर प्रदेशातील अछूतानंद आणि महाराष्ट्रातील महात्मा फुले, शाहू महाराज आणि अन्य इतर जातीजमातीतील संतांना अतिशय सन्मानाने गौरविले जाते. परंतु बौद्ध धम्माच्या प्रचार प्रसारासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या आदरणीय प्रोफेसर नरसु यांच्या कार्याची उपेक्षा केली जाते.

या आधुनिक काळातील बौद्ध नायकाच्या विचार आणि कार्याचे स्मरण करणे म्हणजेच बौद्ध संस्कृतीला उजाळा देणे होय. दूरदर्शी आणि बुद्धिप्रामाण्यवादी बौद्ध नायक प्रोफेसर पी एल नरसु यांच्या कार्यास अभिवादन करताना बाबासाहेबांच्या खालील शब्दांचा आधार घ्यावा लागेल.

“प्रोफेसर नरसु–जे लढले युरोपियन उद्धटपणाविरुद्ध देशभक्तीपूर्ण उत्साहाने, सनातनी(रुढीप्रिय) हिंदुत्वाविरुद्ध मूर्तीभंजक आवेशाने,पाखंडी ब्राम्हणांसोबत राष्ट्रीय दृष्टीने आणि आक्रमक ख्रिस्ती धर्माविरुद्ध बुद्धिप्रामाण्यवादी दृष्टीकोनाने. हे सर्व कार्य त्यांनी महान तथागत सम्यक संबुद्धांच्या शिकवणूकीच्या प्रेरणादायी ध्वजाखाली(मार्गदर्शनाखाली) केले”.

– डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

सुनिल बौद्ध