ब्लॉग

मध्यप्रदेश पुरातत्व विभाग यांचा निषेध; पुरातन बौद्ध स्थळांचा नाचगाण्याच्या चित्रीकरणासाठी वापर

मध्यप्रदेशात सांची जवळ इ.स.पूर्व ३ ऱ्या शतकात सम्राट अशोकाने उभारलेला मोठा स्तूप आहे. तसेच विहार आणि अन्य छोटे स्तुप असून ते ठिकाण सांचीचा स्तूप म्हणून ओळखले जाते. त्याच बरोबर तिथे चेतीयागिरी नावाचा विहारसुद्धा श्रीलंकेच्या महाबोधी सोसायटीने ७० वर्षांपूर्वी बांधलेला आहे. आणि या विहारात भगवान बुद्धांचे दोन अग्रश्रावक सारिपुत्त आणि महामोग्गलान यांचे अस्थिकलश सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. महाबोधी सोसायटी दरवर्षी नोव्हेंबरमधील शेवटच्या रविवारी ‘महाबोधी महोत्सव’ भरवून ते पवित्र अस्थिकलश दर्शनार्थ ठेवते. त्यावेळी श्रीलंका, थायलँड, कंबोडिया, व्हिएतनाम, जपान, व भूतान येथून बरेच बौद्ध पर्यटक, अभ्यासक आणि भिक्खूसंघ महोत्सव यशस्वी करण्यासाठी येतात.

या महाबोधी महोत्सवासाठी सांचीच्या मुख्य रस्त्यापासून ते टेकडीवरील स्तुपापर्यंत संपूर्ण रस्ता रंगीबेरंगी पताका व कमानी उभारून सुशोभित करतात. या महोत्सवावेळी अस्थीकलश बाहेर काढून त्यांचे पूजन केले जाते आणि त्यांची छोटीशी मिरवणूक सांचीस्तुपा जवळ निघते. सारिपुत्त आणि महामोग्गलान यांचे अस्थिकलश डोईवर घेतलेले भिक्खू मुख्य स्तुपाला प्रदक्षिणा घालून तीनदा स्तुपाला वंदन करतात, हे पाहून पाहणारा भावूक होऊन जातो. सम्राट अशोक राजाने उभारलेल्या भगवान बुद्धांच्या मुख्य स्तुपाला त्यांच्या शिष्याच्या अस्थीद्वारे स्तुपाला नमन करणे हे पाहणे मोठे भाग्याचे असते. आणि जे तो सोहळा पाहतात ते स्वतःला निश्चितच धन्य समजतात. असे हे सांची मोठे पवित्र स्थळ आहे.

सांचीचे हे महत्व पुन्हा विशद करण्याचे कारण म्हणजे परवाच एका चॅनलवर ‘मिस मॅच’ नावाच्या मराठी चित्रपटातील एक गाणे बघण्यात आले. या गाण्याचे चित्रण सांची स्तूपाजवळ केलेले पाहून धक्का बसला. पाच महिन्यांपूर्वीच पालि रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई यांनी सांची येथे आयोजित केलेल्या धम्मयात्रेत भाग घेतला होता, तेव्हा तेथील महाबोधी महोत्सव बघण्याचे भाग्य लाभले होते. चित्रपटातील प्रेमगीत अशा पवित्र लोकेशनवर चित्रित केल्याचे पाहून अत्यंत खेद वाटला. ज्या कुणाच्या डोक्यातून येथे नाचगाणे चित्रित करण्याची कल्पना सुचली असेल त्याला या स्थळाचे पावित्र्य माहीत नसावे असे वाटते. जेथे भिक्खू आणि भाविक स्तूपाभोवती परिक्रमा करतात तेथे नायक आणि नायिका नाचताना व शूज घालून पळताना पाहून वाईट वाटले. पण खरा निषेध या गाण्याच्या चित्रीकरणासाठी परवानगी देणाऱ्या ASI च्या भोपाळ मंडळ कार्यालयाचा केला पाहिजे. एक लाख रुपये फी आणि पन्नास हजार सुरक्षा अनामत रक्कम भरली म्हणजे कुणालाही पुरातन स्थळांचे विडंबन करण्याची परवानगी द्यावी असा होत नाही.

प्राचीन पूजनीय असलेले स्तुप म्हणजे बौद्ध विश्वाची पवित्र स्थळे आहेत. त्यांचे महितीपट काढा. त्यासाठी चित्रीकरण करा. पण पूजनीय पुरातन बौद्ध स्थळांचा थिल्लर नाचगाण्याच्या चित्रीकरणासाठी वापर करण्यास परवानगी देणे खरोखर निंदनीय आहे. मागील वर्षी सुद्धा बोरिवली जवळील कान्हेरी लेणी येथे एका चित्रपटाचे चित्रीकरण झाले असे समजले. बोगस ऐतिहासिक कथांवरील चित्रपटांच्या चित्रीकरणास लेण्यांची पार्श्वभूमी वापरण्यास पुरातत्त्व विभाग मंजुरी का देते ते कळत नाही. तसेच सर्व लेण्यांच्या परिसरात आता CCTV कॅमेरा लावण्यास प्राधान्य द्यावे असे वाटते. सर्वांच्या माहितीसाठी या गाण्याची युट्यूबवरील लिंक येथे देत आहे. चित्रपट पाच वर्षापूर्वीचा असला तरी त्यातील गाणे सांची स्तूपाच्या सानिध्यात चित्रित करण्यात आल्याने व ते आता बघण्यात आल्याने निषेध व्यक्त करणे मला योग्य वाटते.

-संजय सावंत,नवी मुंबई (लेखक – ज्येष्ट बौद्ध इतिहास अभ्यासक)