बुद्ध तत्वज्ञान

कुशल कर्म करण्याचे प्रयोजन; कुशल कर्म म्हणजे दान, शील आणि संयम

एकदा तथागत भिक्खूना उद्देशून म्हणाले, “भिक्खूनो, कुशल कर्म करण्याचे भय वाटू नये. कुशल कर्म हे सुखाचेच दुसरे नाव आहे. कुशल कर्म म्हणजे इप्सित साध्य होणे होय. प्रेयसाची प्राप्ती होय. आनंदाची उपलब्धी होय. श्रेयसाची प्राप्ती होय. भिक्खूनो, मी याचा स्वयं साक्षी आहे की, मी माझ्या कुशल कर्माची, प्रेयस, श्रेयस आणि आनंददायी फळे चिरकाळापासून भोगत आहे.”

“मी प्राय: स्वत:शीच विचारणा करतो की, “ही सर्व मंगल फळे कोणत्या कर्माची आहेत?” मी आता सुखी आणि समाधानी आहे, ही कोणत्या कुशल कर्माची परिपक्व फळे होत.”

“मला जे उत्तर प्राप्त होते ते हे आहे की, “ही माझ्या तीन कुशल कर्माची फळे होत. “ही तीन कुशल कमें परिपक्व झाल्यावर मला ही फलप्राप्ती झाली. ती कुशल कर्म म्हणजे दान, शील आणि संयम

“शुभ, आनंददायक, मंगलमय होते.” आणि धन्य ती प्रभात तोच दिवस सोन्याचा, तोच क्षण आनंदाचा जेव्हा सत्पात्री दान केले जाते. तेव्हा शुभ कर्म, शुभ वाणी, शुभ विचार आणि शुभ आकांक्षा यांचे आचरण करणाऱ्यालाच शुभ फळांची प्राप्ती.

“ज्यांना हा लाभ प्राप्त होतो. ज्यांना ही समृद्धी प्राप्त होते तेच सुखी होत. म्हणून तुम्ही सुद्धा आपल्या आप्तस्वकीयांसहित निरामय, समृद्ध सुखी जीवनाचा मार्ग स्वीकारावा.”

संदर्भ: बुद्ध आणि त्याचा धम्म
-डॉ.बाबासाहेब आंबेडकर