इतिहास

रवींद्रनाथ टागोर आणि बुद्धिझम

रवींद्रनाथ टागोर हे आपल्या राष्ट्रगीताचे जनक आहेत हे सर्वांनाच माहीत आहे. तसेच ते मोठे लेखक, कवि, कथाकार, गीतकार, संगीतकार, नाटककार, निबंधकार आणि चित्रकार आहेत हे ही माहिती आहे. परंतु त्यांचा बुद्धिझमचा देखील अभ्यास खूप होता, याबद्दल बिलकुल माहिती नाही. पोष्ट लिहिताना अनेक संदर्भ चाळावे लागतात. तेव्हा अचानक रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘बुद्धदेवा’ बाबत माहिती मिळत गेली. ( बंगाली भाषेत नुसतेच ‘बुद्ध’ म्हणत नाहीत. बुद्धदेव किंवा बुद्धधर्म असे म्हणतात.) त्यांच्या मते भारतीय जनतेवर गीतेचा ठसा भासत असला तरी मूळ भारतीय समाजमनावर धम्मपादाचे संस्कार आहेत. त्याचवेळी त्यांच्या लहानपणापासूनच भारतात ठिकठिकाणी बौद्ध संस्कृतीचे पुरातन अवशेष उघडकीस येत होते.

त्यांचा जन्म ७ मे १८६१ रोजी झाला. १८९० पर्यंत त्यांच्या कवितेची अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली. १९१३ मध्ये त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शांतिनिकेतन आणि विश्वभारती संस्था त्यांनीच स्थापन केल्या. अशा या बंगाली लेखकाने भारतीय संस्कृतीचा परिचय पाश्चात्य देशांना अनेक कविता, निबंध आणि लेखाद्वारे करून दिला. वैश्विक समानता, मानवता हा त्यांचा विचारांचा व साहित्याचा पाया होता. निस्सीम प्रेम, निसर्गाची विविध रूपे, मनुष्यजीवन व त्याचे ध्येय हे त्यांच्या लेखनाचे विषय होते. त्याचबरोबर बुद्धांच्या तत्वज्ञानाचा मानवी जीवनात झिरपलेला प्रवास सुद्धा त्यांनी उत्कटपणे मांडला.

बुद्धाविषयी त्यांच्या मनात एक वेगळे स्थान होते. अनेक लेखांमध्ये त्यांनी बुद्धांचा उल्लेख खालील प्रमाणे केला.”the most excellent human being” ( सर्वश्रेष्ठ मानव), an eminent or distinguished personage (महापुरुष), the chief of men (नरोत्तम), great serene (महासंत), the compassionate one( करुणामय) इत्यादी. त्यांच्या अनेक कवितेतील बुद्ध हे कमलासनावर बसलेले असून त्यांच्या डोळ्यातून शांती ओसंडते आहे, त्यांचे ओठ मंदस्मित करीत आहेत आणि मुखकमल अपूर्व तेजाने उजळले आहे अशी वर्णने आढळतात. त्यांच्या ‘Siam’ कवितेत बुद्धांच्या अलौकीकतेचे वर्णन आहे. बर्लिन येथील अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या भेटीत सुद्धा त्यांची बुद्धिझमबाबत चर्चा झाली.

अशा या थोर साहित्यिकाचे ७ ऑगस्ट १९४१ रोजी निधन झाले. त्यांच्या मोठ्या बंधूनी देखील ‘ऐतिहासिक बुद्धधर्म’ बद्दल लिखाण केले आहे. टागोर यांनी त्यांच्या शांतिनिकेतन आश्रमामध्ये नवीन पिढीला बौद्ध तत्वज्ञानाचे धडे दिले. कराची येथील विद्यापीठात व्याख्यान देताना विद्यार्थ्यांसमोर ते म्हणाले “I also have one “guru”, He is Buddhadev”. कृष्णा कृपलानी यांनी लिहिले आहे की बोधगयेला जेव्हा त्यांनी भेट दिली तेव्हा ते म्हणाले “आज या वैशाख पौर्णिमेदिवशी जगातील सर्वात श्रेष्ठ मानवास मी भावपूर्ण वंदन करीत आहे”.

“बुद्धदेव” या निबंधात रवींद्रनाथ टागोर लिहितात, ” माझा जन्म बुद्धांच्या काळात का नाही झाला ? ज्यांच्या पदस्पर्शाने हे जग शुद्ध झाले, पवित्र झाले”. ( Why was I not born at the time when he had been physically present, walked the street of this Gaya, the touch of whose feet had once purified this world ? Why couldn’t I have the good fortune of feeling the radiation of his holy presence directly in my body ?”.) यावरून बुद्धांचा त्यांच्यावर किती पगडा होता हे दिसून येते. पण अनेक विचारवंतांनी आणि थोरामोठ्यांनी हे कधी जगापुढे मांडलेच नाही.

यावर्षी ७ मे रोजी बुद्धपौर्णिमा होती आणि त्याच दिवशी रवींद्रनाथ टागोर यांची जयंती होती हा एक योगायोग म्हणावा लागेल. त्यांच्या अनेक कथांपैकी ‘दालिया’ नावाची कथा मला विशेष भावते. त्यामध्ये औरंगजेबला सोडून बंगाल प्रांतात पळालेल्या शाहसुजा नावाच्या सरदाराच्या मुलींची ( अमिना आणि जुलेखा ) आणि तरुण अरक्कन बौद्ध राजा दालिया यांच्या प्रेमाची सुंदर कथा आहे. वंशवाद, वर्णभेद, अस्पृश्यता यांच्याबद्दल त्यांना दुःख होत होते.

गीतापेक्षा बुद्धांच्या गाथा आणि धम्मपाद काव्याबद्दल त्यांना आस्था होती. त्यांच्या मालिनी, चांडालिका आणि नातीर पूजा या नाटकांमधून बुद्धधम्माचे सार व्यक्त होते. त्यातील नायिका या ब्राह्मणी संस्कृतीच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या दिसतात. तसेच त्यांच्या श्रेष्ठ भिक्षा, नगरलक्ष्मी, मूल्यप्राप्ती अशा अनेक कथांमधून बुद्धकथा दृष्टीस पडतात. रवींद्रनाथ टागोर या प्रसिद्ध बंगाली साहित्यिकाची ही ओळख भारतातील कुठल्याच मान्यवर साहित्यकाने आजपर्यंत जगापुढे मांडली नाही, याचेच दुःख वाटते.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *