इतिहास

महापंडित राहुल सांकृत्यायन : भाग ०१

महापंडित राहुल सांकृत्यायन हे हिंदी साहित्यातील नावाजलेले लेखक, पंडित व बौद्ध तत्त्वज्ञानी होते. एवढीच त्यांची ओळख आपल्याला माहिती आहे. राहुल सांकृत्यायन सारखा विद्वान व्यक्ती भारताला लाभणे ही भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. त्यांना हिंदीच्या ३३ बोली भाषेसह पाली, संस्कृत, अर्धमागधी, इंग्लिश, अरबी, फारसी, फ्रेंच, तमिळ, कन्नड, मराठी, चिनी, जपानी, तिबेटी, रशियन अश्या अनेक भाषा त्यांना येत होत्या. १६० पेक्षा अधिक ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर आहे. १८९३ साली जन्मलेल्या राहुल सांकृत्यायन यांनी जगभ्रमंती करून ‘साम्यवाद ही क्यों’, ‘मानवसमाज’, ‘राजनीती’ हे ग्रंथ लिहिले. त्यांचे प्रवासवर्णांवरील अनेक पुस्तके जग प्रसिद्ध आहेत.

राहुल सांकृत्यायन यांना लेखक, निबंधकार, विद्वान, समाजशास्त्र, भारतीय राष्ट्रवादी, इतिहास, भारतीय विद्या, तत्त्वज्ञान, बौद्ध धर्म, तिबेटशास्त्र, शब्दकोशलेखन, व्याकरण, मजकूर संपादन, लोकसाहित्य, विज्ञान, नाटक, राजकारण, आदी विषयांवर त्यांनी दीडशेच्यावर ग्रंथ लिहिले. विविध विषयांचे व्यासंगी विद्वान, अनेक भाषांवर प्रभुत्व असलेले भाषापंडित असल्याने त्यांना महापंडित म्हटले जाते.

राहुल सांकृत्यायन यांचा जन्म आणि बालपण

उत्तरप्रदेशातील आजमगड पन्दाहा नावाच्या गावात ९ एप्रिल १८९३ साली झाला. त्याचे मूळ नांव केदारनाथ पांडे असे होते. श्रीलंकेत १९३०च्या सुमारास बौद्धधर्म स्वीकारल्यापासून त्यानी राहुल साकृत्यायन हे नाव धारण केले आहे. पन्दाहा गाव हे राहुल यांचे आजोळ होते. आजोबा ब्रिटिश लष्करातील नोकरीतून सेवानिवृत्त झाले होते व आपल्या चिमुकल्या शेतीवाडीचे काम पाहात होते. वडील शेजारच्याच एका खेड्यातील एक गरीब शेतकरी होते. वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत राहुलजी पन्दाहा येथेच होते . ‘अपर प्रायमरी’ची परीक्षा पास झाल्यानंतर ‘व्हर्नाक्युलर फायनल’चा अभ्यास करण्यासाठी ते निझामाबाद येथे गेले.

आजोबांनी आपल्या नोकरीचा बराच काळ जालना (मराठवाडा) येथे घालविला होता. बड्या ऑफिसरांबरोबर ‘ऑर्डली’ म्हणून फिरण्याचा प्रसंग त्यांच्यावर अनेकदा आला व या निमित्ताने अजिठा, वेरूळ, वगैरे ठिकाणे त्याना पहावयास मिळाली. या स्थळाचे रसभरित वर्णन राहुलजीना बालपणी आपल्या आजोबाच्या तोडून ऐकावयाला मिळाले. याचा बालमनावर अभावितपणे झालेल्या या संस्कारांना राहुलजींच्या प्रवास – प्रियतेचे व संशोधनकार्यातील दुर्दम्य उत्साहाचे बरेचसे श्रेय दिले पाहिजे यांत शंका नाही

घरातून पळून जाऊन वैष्णव साधू ते मठाधिपती

१९०९ साली प्राथामिक शिक्षण पूर्ण करून राहुल हे कलकत्याला गेले. वडिलांची इच्छा होती कि मुलाने इंग्रजी शाळेत शिकावे. पण मुलाचे मन बाहेरच्या अमर्याद जगात भटकू लागले होते. १९०७ साली ते एकदा घरातून पळून जाऊन कोलकत्याला गेले होते. आठ महिन्यानंतर पुन्हा परत गावी आले. मात्र १९१० च्या सुरुवातीस पुन्हा घराबाहेर पडले ते कायमचेच…

अयोध्या , हरिद्वार, गंगोत्री, गंगोत्री वगैरे दूरदूरच्या प्रवास त्यांनी केला. बनारस येथे संस्कृतचा अभ्यास करून व्याकरण व काव्य यांचा चांगला परिचय करून घेतला. १९१२ साली ते बिहारमधील छापडा जिल्ह्यातील एका मठात जाऊन वैष्णव साधू बनले. तेथील महंताची त्यांच्यावर मर्जी बसून ते पटशिष्य बनून पुढे मठाधिपती बनले. तिथे असलेल्या शेतकऱ्यांत आणि मठातील साधूंमध्ये जमिनीवरून नेहमी वाद होत असत. यामध्ये राहुल हे शेतकऱ्यांची बाजू घेत असायचे..1915 साली आग्र्याला आर्य समाजाच्या लोकांशी त्यांचा संबंध आला आणि आयुष्याला कलाटणी मिळाली.

आर्यसमाज प्रचारक ते कट्टर राष्ट्रवादी

आर्यसमजाच्या शिकवणुकीने त्यांच्या तर्कनिष्ठ मनाला वैष्णव धर्मापासून खेचून घेतले. १९२७ पर्यंत ते आर्यसमाजी होते. त्यानंतर त्यांचा संबंध राजकीय क्षेत्रातील राष्ट्रवादी कार्यकर्त्न्यांशी आला. त्या वेळी तरुणांचा ओढा त्या काळातील सर्वात जहाल अशा क्रन्तिकारी गटाकडे जास्त होता. टिळकांविषयी राहुल यांना फार आदर होता. तर मवाळ गटातील लोकांबद्दल तिटकारा होता.

लेनिनचा प्रभाव

१९१७ मध्ये बुंदेलखेड येथील मुक्कामात ‘प्रताप’ या हिंदी पत्रात रशियन क्रांतीची बातमी वाचली. लेनिनचे नाव राहुल यांनी पहिल्यांदाच ऐकले. त्यानंतर रशियातील बातम्या व तिथल्या हालचाली विषयी जाणून घेऊ लागले. रशियात नवी समाजव्यवस्था अस्तित्वात आली आहे. जुलूमशाही आणि पिळवणूक नामशेष झाली आहे. गरीब श्रीमंत भेद उरलेला नाही. प्रयेकाला श्रम करावे लागते. सत्यदर्शनासाठी आतुर असलेल्या या नवयुवकाच्या डोक्यात नवा प्रकाश पडला. १९१८ साली ‘बावीसवी सदी’ या ग्रंथाचा आराखडा केला. या ग्रंथात १९१८ साली सोविएत समाजाचे कल्पना चित्र रंगिवले होते. काही वर्षांनी त्यांना सोविएत रशियाला भेट देण्याची संधी मिळाली.

नेपाळ प्रवास आणि बुद्धाच्या प्रेमात

१९१९ साली मार्शल लॉच्या वेळी ते नेपाळच्या तर्राईत गेले. तिथे त्यांना वेदांताविरुद्ध बंड उभारणारा बौद्ध तत्वज्ञानाचा अभ्यास करण्याची त्यांना तीव्र इच्छा झाली. लुम्बिनी, कुशिनारा, जेतवन, वैशाली असे अनेक्क बौद्ध इतिहासातील स्थळांना त्यांनी भेट दिल्या. पुढील वर्षी त्यांनी दक्षिणेचा प्रवास करून मीमांसा व वेदांत यांचा नव्याने अभ्यास केला. बौद्धधम्माचा स्वीकार करण्याची त्यांच्या मनाची धडपड चालली होती. क्रमश:

जयपाल गायकवाड, नांदेड