ब्लॉग

हे आत्मचरित्र कदाचित भारतातील सर्वात प्राचीन व विश्वसनीय असा ऐतिहासिक दस्तैवज

“सिंहसेनापती” हे खरेतर महापंडित राहुल सांकृत्यायन यांनी अनुवादित केलेले ‘वैशाली’ गणराज्याचा पराक्रमी सेनापती ‘सिंह’ याचे इ. स. पूर्व ५०० मध्ये मातीच्या तब्बल १६०० वीटांवर (Clay Tablets) बुद्धकालीन धम्मलिपीत लिहिलेले जगातील पहिले आत्मचरित्रच ठरेल. याचा शोध एका उत्खननामध्ये स्वतः महापंडित राहुल सांकृत्यायन यांनाच लागलेला आहे. या सर्व वीटा पाटणा वस्तुसंग्रहालयात आजही सुरक्षित ठेवलेल्या आहेत.

सेनापती ‘सिंह’ हा स्वतः तक्षशिला विद्यापीठात शिकलेला होता. मगधनरेश अजातशत्रू याने ज्यावेळेस ‘वैशाली’ आक्रमण केले, त्यावेळी मगधच्या सेनापतीस त्याने युद्धात हरवून, अजातशत्रूचा प्रख्यात हत्ती ‘नालागिरी’ (जो अजातशत्रूने देवदत्ताच्या कह्यात येऊन त्यास दारू पाजून बुद्धास ठार करण्यासाठी बुद्धाच्या मार्गात सोडला होता, व ज्यास बुद्धाने आपल्या मंगल मेत्ता भावनेने शांत करुन आपलासा केले होते, तोच हा ‘नालागिरी’ हत्ती) हत्तीही जिंकून आणला होता. सुरुवातीस तो महावीराचा अनुयायी होता.

एकदा वर्षावासानिमित्त बुद्ध ‘वैशाली’ येथे मुक्कामी असतांना, अनेक लोक बुद्धाच्या धम्मवाणीचा लाभ घेण्यासाठी बुद्धाकडे येत असत. तेव्हा बुद्धाची किर्ती सिंह याच्या कानी गेल्याने,त्याने महावीराकडे बुद्धाच्या भेटीस जाण्याची परवानगी मागितली. परंतु, महावीराने बुद्धविचार हे महावीराच्या विचाराहून भिन्न आहेत, म्हणून तू तिथून जाता कामा नये, असेच त्यास बजावले. त्यानंतर दोनदा परवानगी मागूनही महावीराने त्यास बुद्धाच्या भेटीस जाण्यापासून परावृत्त केले. परंतु, चौथ्या वेळेस मात्र सिंह याने महावीरास कुठलीही सूचना न देता बुद्धाची भेट घेतली. त्या भेटीदरम्यान त्याने तो महावीराचा अनुयायी असल्याचे व बुद्धाची मते महावीरास पटत नसल्याचेही बुद्धास सांगितले. तथापि,बुद्धाने मात्र महावीराच्या आरोग्याची चौकशी करुन त्याच्या विचाराची प्रशंसाच केली. बुद्धाच्या या उदारमतवादी व स्नेहपूर्ण व्यक्तीमत्वाने प्रभावी झालेल्या सिंहाने महावीरास सोडून बुद्धाचे अनुयायीत्व पत्करले.

या व इतरही सर्व ऐतिहासिक बाबी, तसेच, त्याकाळातील सामाजिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक , आर्थिक, भौगोलिक परिस्थिती, शिक्षणव्यवस्था, तेव्हा प्रचलित असलेली युद्धनीती, चालीरीती, नातेसंबंध इ. अनेक गोष्टी सेनापती सिंह याच्याच तोंडून या अतिशय महत्वपूर्ण पुस्तकातून कळतात. मातीच्या १६०० वीटांवर लिहिलेले हे आत्मचरित्र कदाचित भारतातील सर्वात प्राचीन व विश्वसनीय असा ऐतिहासिक दस्तैवजही ठरु शकते. इतिहासाची आवड असणाऱ्या प्रत्येकानेच महापंडित राहुल सांकृत्यायन यानी उत्खननाद्वारे स्वतः शोधलेले व अनुवादित केलेले हे पुस्तक आवर्जून वाचले पाहिजे…..”

अशोक नगरे (लेखक – पुराभिलेखागार संचालनालय, महाराष्ट्र शासन प्रमाणित मोडी लिप्यंतरकार, धम्मलिपी तथा प्राचीन इतिहास व पुरातत्त्व अभ्यासक. पारनेर,जि. अहमदनगर.)