ब्लॉग

कोरोना आणि डॉ हर्षदीप कांबळे यांचा वाढदिवस!

राजाराम पाटील, अध्यक्ष, आगरी समाज शेतकरी प्रबोधिनी, यांचा विशेष लेख…
जग कोरोनाच्या महामारीत स्वतःच्याच ‘नजरकैदेत’ असताना आम्ही, सर्वच देव देवतांच्या जयंत्या, मेळावे, विवाह सोहळे, इतकेच काय मानवी जन्म आणि मृत्यूचे सारे सोहळे रद्द केले आहेत. अंत्यत्ययात्रेतला ‘शेवटचा’ निरोप देतानाही शेकडो जणांना कोरोनाच्या मृत्युचे पॅकेज पाठीमागे देऊन गेलेली घटना आम्ही ‘उरणकर’ अनुभवतोय. म्हणूनच आता एकत्र येणे नकोच..अगदी मयताच्या किंवा सांत्वन सोहळ्यासाठीही नको..असे ‘शहाणपण’ अनुभवलेले आम्ही!वाढदिवस कसा साजरा करू शकतो? होय तरीही केला आम्ही साजरा एक वाढदिवस तोही एका खूप अतिविशिष्ट कारणांमुळे तोही सोशल मीडियावर मुद्दाम, जाहीरपणे सांगण्यासारखा सर्व समाजासाठी विशेषकरून आगरी कोळी ओबीसी समाजात जन्मलेल्या कुणासही विचार करायला लावणारी ही घटना आहे.

माझ्यावर आई वडिलांचे संस्कार नेहमीच आदर्शवादी होते. आईच्या कष्टमय जीवनास पाहून, शेती मासेमारी या व्यवसायी क्षेत्रात बालपणातच, शाळेतल्या शिक्षणापेक्षा मी अधिक वेगाने प्रगती करत निघालो होतो.. परन्तु खेळ व्यायाम आणि अभ्यास यात माझ्या वर्गात नेहमीच पहिल्या नंबरवर ही असायचो. नेहमी खरे बोलावे, चांगले आचरण ठेवावे, नित्य देवपूजा, मोठ्यांचा आदर, व्यायाम करावा, दारू न पिणे, स्त्रियांचा आदर अशा अनेक चांगल्या सवयी असूनही जेव्हा अपयश वाट्यास येते तेव्हा आजच्या कोरोनासारखीच स्थिती मनात तयार होते.

मला दारू, मनाची निराशा आणि मानवी अन्याय अत्याचार मारू शकत नव्हते. ही माझ्या आई वडिलांची पुण्याई! तरीही जी काही निराशा होती, ती काही आंबेडकरी भावांनी घालविली. त्यात नवी मुंबईचे अशोक अंकुश, प्रा प्रेमरत्न चौकेकर, शाहीर संभाजी भगत ही नावे अत्यन्त कृतज्ञता पूर्वक मी घेईन. या तिघांनीही डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा ‘विचार’ मला दिला आणि पाठीवर बंधुत्वाचा ‘हातही’ दिला.व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवन कसे जगावे हे आंबेडकरी भाऊ बहिणींनी मला शिकविले.यानंतर सिडको विरोधी आंदोलनाचे दुसरे नेते दि बा पाटील मला भेटले. राजकीय जीवनात आमदार खासदार आणि महाराष्ट्राच्या विरोधी पक्ष पदी पोहचलेल्या या दोन्ही नेत्याच्या जीवनात डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि एकविरापुत्र बुद्ध ओतप्रोत भरले होते. त्याचप्रमाणे बाबासाहेब आणि तथागत बुद्ध ह्या दोघांचेही विचार जीवनात प्रत्यक्ष राबवणार्या आणखी एका माणसांची माझी भेट झाली आणि जवळून ओळख झाली, ती व्यक्ति म्हणजे वरिष्ठ सनदी अधिकारी उद्योग आयुक्त डाॅ हर्षदीप कांबळे साहेब. धम्माच्या विचाराने पुढे जाणारा असा अधिकारी विरळाच आहे.

तसेच पुढे “दोनच राजे इथे जाहले !! या कोकण पुण्यभूमीवर.. एक त्या रायगडावर! एक चवदार तळ्यावर..!” आंबेडकरी चळवळीतील हे लोकप्रिय गीत, मला छत्रपती शिवराय आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या वंचित रयतेची, मागासवर्गीय भारताची, दिल्लीवर राजकीय स्वारी करण्याची संधी आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनीच दिलीय. ओबीसींच्या जीवनातील हा आंबेडकरी राजकीय विचार हा असा सहज रुजलाय.

आज देव नाकारून अनेक कर्तृत्वान, हुशार माणसे आंबेडकरी चळवळीने जन्मास घातली; शिक्षण आणि बौद्ध विज्ञानवादी संस्काराने घडविलेली. मी या सर्वांची नावे येथे घेत नाही. परन्तु नवी मुबंई विमानतळ आणि मुबंई गावठाण हक्क, जमीन हक्क लढे लढत असताना संपर्कात आलेले आंतरराज्य आणि महाराष्ट्राच्या कानाकोप-यातील कोरोनाग्रस्त गरीब माणसांना, प्रसिद्धी पासून दूर राहून, गुप्तपणे अन्नदान देणाऱ्या अनाम वीरांना मी धन्यवाद देईन. अर्थात त्या दानाची गरज, या क्षणापासून वाढत जातेय.. याचीही जाणीव करून देत देतच..मी एका मोठ्या मनाच्या माणसाचा..डॉ हर्षदीप कांबळे यांचा वाढदिवस घरी राहून साजरा केला. अर्थात धम्म, धान्य दानाने..!!केवळ राजकीय नेतृत्वच लोकांना न्याय देऊ शकते, हा माझा गोड गैरसमज दूर करणारे माझे आदर्श, आयएएस अधिकारी, महाराष्ट्राच्या उद्यागो विभागाचे आयुक्त डॉ हर्षदीप कांबळे यांनी!.

मानवी कर्तृत्वाचा आंबेडकरी पराक्रम लिहिण्यास जागा अपुरी पडावी ; हा संदेश देणारी आंबेडकरी बौद्ध धम्म चळवळ ही जगातील डाव्या आणि उजव्या चळवळीचा मेंदू आणि मणका यांना नवं मानवतेचा संदेश देणारी जागतिक चळवळ ठरावी! माझ्या मनातील याच विचारांमुळे, आजच्या कोरोनाच्या अंधारातही दिवा पेटवायची इच्छा असेल, तर तो स्वतःच्या व्यक्तिगत जीवनाच्या आदर्शचाच असावा. डॉ हर्षदीप कांबळे यांनी प्रचंड संघर्षातून शिक्षण घेऊन देशासाठी जे योगदान दिलेय ते माझ्या आणि ओबीसी समाजाचाही आदर्श ठरावा यात मला अजिबात शंका वाटत नाही. “मुक्ती कोण पथे” या मार्गावर माझ्या जीवनात, जागतिक बौद्ध धम्म परिचय, विनयशीलता, दान पारमीता या जीवन मूल्यांचे संस्कार आणि उद्योगाचेही जागतिक मार्ग खुले करणारे ठरले.

कोळीवाडे आणि गावठाणे यांच्याशी सरकारच्या विविध विकास योजना जोडणारे डाॅ हर्षदीप कांबळे ,सागरपुत्र ओबीसी समाजातील उद्योजक तरुणास अनुकरणीय आहेत. उद्योगात महिलांना राखीव जागा देणारे महाराष्ट्र हे भारतातले पहिले राज्य होण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.गरीबांना यवतमाळ कलेक्टर असतांना ४००० एकर जमिनी त्यांनी विनामुल्य दिल्या, एफडीए कमिशनर असतांना ह्रद्य शस्रक्रियेत वापरनार्या स्टेंटची लाखों रूपयांची किंमत फक्त ३० हजारावर आणली… मुख्यमंत्री रोजगार योजना ही अशीच क्रांतिकारी योजना…दिल्लीमध्ये असतांना मागासवर्गींसाठी स्काॅलरशिप योजना इ. अश्या त्यांच्या २२ वर्षाच्या कार्यकाळात ते एक कुशल प्रशासक म्हणून भारतात ओळखले जातात.

कालच विशवविख्यात प्रा. नामदेवराव जाधव यांचा साहेबांना शुभेच्छा देणारा व्हिडीओ पाहायला आणि सुखानी व आश्चर्याने मन भरून आले. आज प्रत्येकजण पद पैसा प्रतिष्ठा यामागे धावतांना दिसतोय. अधिकाधिक संपत्ती कमावून आपल्या सात पिढ्या कश्या आरामात जगतील हे पाहून आपल्या वारसदारांच व गणगोतांचं कसं भलं होईल यातच मग्न आहे*.अश्या परिस्थितीत एक सनदी अधिकारी तोही उद्योग विभागाची जबाबदारी सांभाळणारा शिवाय त्यांची पत्नीही थायलँड येथील यशस्वी उद्याजिका हे दोघे विचारपूर्वक, जाणिवपूर्वक निर्णय घेतात की आपल्याला अपत्य होऊ द्यायचे नाही फक्त इतकेच नाही तर समाजातील जी गरीब मुलंमुली आहेत त्यांनाच आपले अपत्य मानून त्यांना प्रेम द्यायचे व आपली साधन संपत्ती आपले सर्व संसाधनं त्याच्या उत्कर्षासाठी कल्याणासाठी वापरायचे, या त्यांच्या अपूर्व त्यागाला सलाम. खऱ्या अर्थाने बाबासाहेंबाच्या विचारांचा वारसा चालू ठेवायचा तर ही खरी“फुले शाहू आंबेडकर” विचारधारा आहे हे जगाला त्यांनी दाखवून दिले. मला वाटत नाही इतकी व्यापक भुमिका समाजसेवेसाठी कुणी घेतली असेल !

 

थायलंडच्या बौद्ध उपासीकेशी विवाहबद्ध होत जातीअंत लढ्यातील आंतरजातीय, आंतरदेशीय विवाहांना नवा आदर्श देणारे दांपत्य म्हणून जागतिक कौतुकास ते म्हणूनच पात्र आहेत. सत्ता संपत्तीचा कौटूंबिक, खानदानी(उच्चवर्णीय) मोह टाळण्यासाठी स्वतःचे मूळबाळ जन्मास न घालता साऱ्या देशातील अनाथ, उपेक्षित, मागासवर्गीय बालकांना वात्सल्य देणाऱ्या या महान पतीपत्नीना मी कोरोनातही शुभेच्छा दिल्या नाही तर, ती कृतघ्न पणाची मोठी चूक होईल. एवढा मोठा निर्णय व्यक्तिगत जीवनामध्ये घेणारा व्यक्ति मी कधीच पाहिला नाही . त्याग आणि दान पारमिता काय आहे यांचे हे अत्युच्च उदाहरण आहे. सर्वच समाजासाठी हे एक आदर्श उदाहरण आहे.

कोळी समाजाचे दैवत, आई एकविरा ही बुद्धाची आई आहे हे आणि हा कोळी समाज आज जगाला हुंडा नाकारणाऱ्या महान एकविरा मातृसत्ताक संस्कृतीकडे घेऊन जात आहे. आजच्या कोळीवाड्यातील समृद्ध स्त्री संस्कृतीकडून कार्ला एकविरा बौद्ध लेण्यातून, नवी मुबंई विमानतळात उध्वस्त होणाऱ्या, 2000 वर्षे जुन्या सम्राट अशोकाच्या, मातृसत्ताक केरुमाता लेणी बचाव आदोलनाची क्रांतिकारी शिकवण, आगरी कोळी कराडी ओबीसी समाज बांधवांना दिली आहे. आपल्या समाजा मधुनही डाॅ कांबळे साहेंबांसारखे सर्वांना दिशा देणारे वीर निर्माण व्हावेत ही ईच्छा आहे.

आज साऱ्या जगात राजकीय नेतृत्वाला लोक संशयाने पाहत आहेत. देशबंदी शहरबंदी, गावबंदी, घरबंदी आणि माणसाने माणसाला भेटण्यासाठी घातलेली बंदी, याची तपासणी नागरिक करू लागलेत. या संकट समयी साऱ्या जगालाच नवी मानवी मूल्ये देणारी एकविरापुत्र बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडर यांच्या सारखी कमळपुष्पे या खंडप्राय मातृसत्ताक भारतमातेला हवीत. त्या मानवी मूल्यांचा आदर्श देणारे अधिकारी डॉ हर्षदीप कांबळे हे माझ्या दर्या किनाऱ्यावरील घरी भात मासे खाऊन गेले .. म्हणूनच बंधुत्वाचा अधिकाराने हे लिहिले… स्वतः त्यांनी आणि कुणीही यास “व्यक्तिपूजा” समजू नये..!

राजाराम पाटील
अध्यक्ष, आगरी समाज शेतकरी प्रबोधिनी