आंबेडकर Live

असं आकाराला आलं आपल्या बाबासाहेबांचं ‘राजगृह’

ज्ञानाची प्रचंड भूक असलेल्या बाबासाहेबांची विद्यासंपन्न होण्याची अभिलाषा फार महान होती. त्यांची शिक्षण घेण्याची दुर्दम्म इच्छाशक्ती अपार होती. त्यांचे शिक्षणा विषयी आधुनिक व उदार मतवादी दृष्टीकोन या संबंधी जगभरातील विद्वानांमध्ये तेव्हाही कुतूहल होते, आजही आहे. कदाचित अनंत काळापर्यंत हे टिकून राहील. थॉम्पसन नावाचा एक फार मोठा इंग्लिश लेखक होऊन गेलाय… त्याने एकदा म्हटलं होतं की, “डॉ. आंबेडकरांचे जे जे साहित्य दृष्टीस पडेल ते ते वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की डॉ. आंबेडकरांमुळे सनातनी प्रवृत्तींना वेडाचे झटके का येतात ते.” हे वाक्य होतं. विसाव्या शतकातलं.. एकविसाव्या शतकातही हि स्थिती कायम आहे. याच राजगृहाच्या धन्याला आजही सनातन्यांना प्रचंड भय वाटत असतं.

बाबासाहेबांचे सुरवातीचे दिवस अत्यंत कठीण परीस्थितीत गेले. बॅरिस्टर झाल्यानंतर त्यांनी वकिली सुरु केली. आणि अल्पावधीतच त्यांची एक हुशार वकील म्हणून ख्याती चोहीकडे पसरली. आणि 1930 सालानंतर त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होत गेली. तेव्हा बाबासाहेबांचं कार्यालय परळच्या दामोदर ह़ॉल जवळ होतं. आता घरी येणाऱ्या जाणाऱ्यांचा राबता वाढला होता. पोयबावाडीतील घर अपूरं पडू लागलं होतं. पुस्तकांची आबाळं होत होती. म्हणून त्यांनी आता स्वतःसाठी नवीन घर बांधण्याचा निश्चय केला.

बाबासाहेबांनी स्वतःची इमारत उभी करताना त्यात ग्रंथालय कसे असावे, याचा अभ्यासपूर्ण आराखडा तयार केला होता. परदेशात पाहिलेल्या उत्तमोत्तम ग्रंथालयांची वैशिष्ट्ये आपल्याकडेही असावीत, असा प्रयत्न त्यांनी केला. त्या रचनेत तीन-तीन खोल्यांचे दोन ब्लॉक्स राजगृहाच्या तळमजल्यावर बांधून घेतले होते. त्या दोन ब्लॉक्समध्ये त्यांनी आपल्या कुटुंबीयांच्या राहण्याची व्यवस्था केली होती. राजगृहाच्या पहिल्या मजल्यावर डॉ.बाबासाहेबांनी स्वत:च्या राहण्याच्या सोयीबरोबरच आपल्या प्रिय ग्रंथालयाची आणि कार्यालयाचीही सोय केली होती. त्यांनी स्वत: आराखडा तयार करून त्याप्रमाणे सोयी करून घेतल्या होत्या.

१९३० मध्ये त्यांनी दादरच्या हिंदू कॉलनीत ९९ व १२९ क्रमांकाचे प्रत्येकी ५५ चौरस यार्ड क्षेत्रफळाचे दोन प्लॉट खरेदी केले. पाचव्या गल्लीतील १२९ क्रमांकाच्या प्लॉटवर आपल्या कुटुंबीयांबरोबर राहण्यासाठी इमारत बांधण्याचे ठरवलं तर तिसर्‍या गल्लीतील ९९ क्रमांकाच्या प्लॉटवर भाड्याने देण्यासाठीची इमारत बांधण्याचे नक्की केले. बांधकामासाठी त्यांनी सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाकडून कर्ज मिळवले आणि तात्काळ बांधकाम सुरू केले. बांधकामावर देखरेख करण्याचे कामास श्री. आईसकर यांना नेमले होते. १९३१ सालच्या जानेवारी महिन्यात १२९ क्रमांकाच्या प्लॉटवर राहण्याच्या वास्तूचे बांधकाम सुरू केले. ते बांधकाम १९३३ मध्ये पूर्ण होऊन “राजगृह’ ही राहण्याची वास्तू तयार झाली.

प्लॉट क्रमांक ९९ वर दुसर्‍या इमारतीचे बांधकाम १९३२ मध्ये सुरू झाले. ते बांधकाम पूर्ण झाल्यावर त्यांनी त्या इमारतीचे नाव “चार मिनार’ असे ठेवले. “राजगृह’ हे नाव हिंदू संस्कृती आणि बौद्ध संस्कृतीशी संबंधित होते, तर “चार मिनार’हे नाव मुस्लिम संस्कृतीशी संबंधित होते. इमारतीचे प्रत्यक्ष बांधकाम १९३१ च्या जानेवारी महिन्यात सुरु होऊन ते सन १९३३ मध्ये पूर्ण झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या कुटुंबीयांसह “राजगृह’ या आपल्या सुंदर व प्रशस्त वास्तूत राहण्यास आले होते. पुढे ग्रंथांच्या खरेदीच्या आणि इतर गोष्टींच्या कर्जाची फेड करण्यासाठी ९ मे १९४१ रोजी त्यांनी “चार मिनार’ ही इमारत विकली. मात्र “राजगृह’ ही वास्तू त्यांनी कायम आपल्या मालकीची ठेवली.

त्यांच्या ग्रंथसंग्रहाची सुरूवात तशी खूप आधीपासूनच झाली होती. ते मॅट्रिक पास झाले त्यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. त्या सत्कार प्रसंगी बाबासाहेबांचे गुरुजी कृष्णाजी अर्जून केळुसकर यांनी बाबासाहेबांना गौतमबुद्धांचे चरित्र असलेले पुस्तक भेट म्हणून दिले. बुद्ध चरित्र ग्रंथाने ते खूपच प्रभावित झाले. तेथूनच ग्रंथ जमविण्यास सुरुवात झाली. या राजगृहात बाबासाहेबांनी आणलेला अखेरचा ग्रंथ देखील बुद्धांविषयीच होता. बुद्ध आणि धम्म हा शेवटचा ग्रंथ आणला.

राजगृह या इमारतीमध्ये असलेली ग्रंथालयाची मांडणी न्यूयॉर्कमधील ग्रंथालयाच्या मांडणीसारखी आहे तर, इंग्लंडमधील ग्रंथालयांच्या भव्य इमारतीत असतात तशा भव्य अशा खिडक्‍या आहेत. त्याचबरोबर भरपूर सूर्यप्रकाश येईल, अशा विशिष्ट अंतरावर खिडक्‍या आहेत. रोमन पद्धतीप्रमाणे भव्य व उंच खांब आहेत. त्यांची ऑक्‍सफर्ड रेड क्‍लिक दालनासारखी आंतररचना आहे. भिंतीमध्ये बांधलेला सज्जा आणि पोटमाळा ही पुस्तकांसाठी बांधलेल्या “राजगृहा‘ची वैशिष्ट्ये आहेत.

वैभव छाया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *