ब्लॉग

युगावर सावली धरणारे मायेचे आभाळ – माता रमाई

मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर हे आता एका व्यक्तीचं नाव उरलं नाही, ती तमाम बहुजन समाजाची एक असीम अशी चेतना बनली आहे. रमाई म्हणजे त्याग, समर्पण या शब्दाला अर्थवत्ता प्रदान करणार्यार एका जाज्वल्य करुणेचा अव्याहत झुळझुळणारा तो नितळ निळा झरा आहे. प्रतिकुलतेतही दृढनिश्चय आणि स्वाभिमान कायम राखणार्यात भक्कम धैर्याचे ती रूप आहे. अगणित संकटांना लीलया झेलताना स्वसुखाचा त्याग करून आपल्या भवतालातील माणसाचं जगणं मनोरम करणार्यास एका दुर्मिळ दुःखयोगाचे ते प्रतीक आहे. प्रज्ञेच्या महासूर्यावर छाया धरण्याचे व्रत स्वीकारलेल्या प्रगाढ अशा युगसावलीचे मूर्तिमंत रूपच रमाईच्या व्यक्तित्त्वातून साकार झाले आहे.

का कुणास ठाऊक रमाई या भोळ्याभाबड्या होत्या असे मला अजिबात वाटत नाही. त्या सोशिक होत्या, सहनशील होत्या पण त्या भोळ्याभाबड्या नव्हत्या. आपल्या पतीचे महानपण त्या जरूर जाणून होत्या. त्यांचे मोठेपण त्यांना ठाऊक होते म्हणून त्यांच्या अभ्यासात आणि सामाजिक-राजकीय व्यग्रतेत आपला व्यत्यय होणार नाही, याची त्या सदैव काळजी घेत. आपल्या कर्तव्यनिष्ठेचे सजग भान त्यांना होते. यातूनच त्यांचा सात्विक संसार त्यांनी उभारला होता. हा संसार राजा-राणीचा संसार नव्हता तर लाखो करोडो लोकांना राजाराणी होता यावे, यासाठीचे ते आभाळ वाकविणारे अविरत अभियान होते. रमाई या अभियानाच्या ऊर्जा होत्या. ज्वलनशील इंधन होत्या.

रमाई यांचा जन्म (७ फेब्रुवारी १८९९) दोपोली जवळील वनंद गावी झाला. वयाच्या नवव्या वर्षी त्या लग्नबंधनाने सुभेदार रामजी यांचे पुत्र भीमरावाशी जोडल्या गेल्या ते साल होते १९०८. तेव्हा भीमरावाचे वय होते सतरा वर्षाचे. ते नुकतेच मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले होते. रमाईचे बाबासाहेबांच्या आयुष्यात येणे अनेक अर्थाने अर्थपूर्ण होते. कुणीच आपले नसण्याच्या काळात रमाईच त्यांच्या मनाचा विसावा होत्या आणि आधारही.

रमाई ह्या काहीशा अबोल होत्या. त्या वृत्तीने शांत होत्या. पण कष्ट आणि सोसणे हे त्यांचे बळ होते. कष्टानेही चकित व्हावे इतके कष्ट रमाईने केले. कुटुंबाच्या भरण पोषणासाठी शेण गोळा करणे, त्याच्या गोवर्यान थापणे आणि त्या बाजारात विकणे ह्या साठी त्यांनी जे कष्ट उपसले ते त्याची मोजदाद कशी करावी ? आपल्या बुद्धी तेजाने ज्ञानाची शिखरे पादाक्रांत करणार्याा प्रज्ञावंताची आपण पत्नी आहोत याची जाणीव त्यांना होती पण या गोष्टीचा त्यांना कधी अहंकार नव्हता. उलट आपल्या शेण गोळा करण्याने पतीच्या मोठेपणाला उणेपणा येईल हे जाणून दिवस निघण्याच्या पूर्वीच भल्या पहाटे उठून आपल्या जाऊ लक्ष्मीबाई सोबत त्या हे काम करायच्या.

राधाबाई बळवंतराव वराळे यांनी रमाबाई यांच्या आठवणी आपल्या एका पुस्तकात नोंदवून ठेवल्या आहेत. त्यापैकी एक हकीकत जी रमाबाई यांनी त्यांना सांगितली आहे ती या बाबासाहेब आणि रमाईच्या नात्यावर वेगळाच प्रकाश टाकते. गोलमेज परिषदेसाठी बाबासाहेब बोटीने लंडनला जाणार होते. रमाबाई यांची इच्छा होती की आपण ही त्यांना निरोप देण्यासाठी बंदरावर जावे. त्यांनी याबाबत बाबासाहेबांकडे विचारणा केली. बाबासाहेब रमाईला म्हणाले, “की तुझी तब्बेत बरी नाही आणि तिथे खूप गर्दीही असेल. त्यामुळे तू घरीच थांब. “बाबासाहेबांनी रमाईस बंदरावर येण्यास नकार दिला. त्यात रमाईला नाराज करण्याचा विचार नव्हता तर त्यांच्याविषयीची काळजीच त्यात अधिक होती. पण रमाईचे मन मानायला तयार नव्हते. त्यांनी बळवंतराव वराळे यांना ही बाब सांगितली.

रमाईची बाबासाहेबांना निरोप देण्यासाठी बंदरावर येण्याची उत्कटता त्यांना तीव्रतेने जाणवली. वराळे यांनी मग रमाईसाठी एका टॅक्सीची व्यवस्था केली. बाबासाहेबांच्या गाडी मागे ही गाडी बंदरावर गेली. बाबासाहेब त्यांच्या गाडीतून उतरले आणि चालू लागले. कार्यकर्त्याची खूप गर्दी झालेली होती. चालतांना त्यांनी सहज मागे वळून पाहिले तर रमाई त्यांच्या मागे येतांना त्यांना दिसल्या. सोबत बळवंतराव वराळे होते. क्षणभर रमाई यांना वाटले, बाबासाहेब यांनी नको म्हटले तरी आपण आलो. आता बाबासाहेब काय म्हणतील? ते रागावणार तर नाहीत ? पण बाबासाहेब म्हणाले, “अरे तुम्हीही आलात”, असे म्हटल्यावर रमाईच्या जीवात जीव आला.

रमाई, बळवंतराव व पोळ यांना त्यांनी बोटीवर नेले. सबंध बोट फिरवून दाखविली. जेवण, अंघोळ , विश्रांतीची सोय कशी आहे ते दाखविले. बोटीवरच सगळ्यांसाठी खुर्च्या टाकायला सांगून चहा मागविला. आणि शेवटी परत जातांना बाबासाहेब बळवंतराव वराळे यांना म्हणाले, “ अरे हिला सांभाळून घेऊन जा. गर्दी खूप आहे”. हा प्रसंगातून बाबासाहेब आणि रमाई यांच्या मनात परस्पराप्रती असणारा अतीव स्नेह जसा प्रगटतो तशी परस्परांची काळजी घेणारी ओली जाणीव पाहून डोळ्यात पाणी तरळते.

बाबासाहेब रमाई यांना जेव्हा पहिला मुलगा झाला तेव्हा आपले गुरू क्रांतिबा जोतीराव फुले यांच्या दत्तक मुलाचे असणारे यशवंत हेच नाव त्यांनी आपल्या मुलाला दिले. यशवंत नंतर पुढे जन्माला आलेली त्यांची अपत्य अकाली गेली. गंगाधर, इंदू , रमेश आणि राजरत्न या आपल्या अपत्यांना कायमचा निरोप देतांना रमाई आणि बाबासाहेब यांनी ज्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या यातना सहन केल्या त्याचे वर्णन केवळ अशक्यच. आपले सहकारी दत्तोबा पवार यांना राजरत्नच्या मृत्यू नंतर एक पत्र लिहिले, त्यात ते असे म्हणतात, “पुत्र निधनामुळे आम्हा उभयतास जो धक्का बसला आहे. त्यातून आम्ही बाहेर पडू असे म्हणणे शुद्ध ढोंगीपणाचे आहे. आतापर्यंत तीन मुलगे आणि एक मुलगी अशा लाडक्या बाळांना मूठमाती देण्याचा प्रसंग आमच्यावर ओढवला. त्यांची आठवण झाली की मन दु:खाने खचते. त्यांच्या भविष्याविषयी जे इमले आम्ही बांधले होते ते ढासळले ते वेगळेच. आमच्या जीवनावरून दुःखाचा ढग वाहत आहे. मुलांच्या मृत्यूबरोबर जीवनाला चव आणणारे मीठच नष्ट झाल्यामुळे आमचे जीवन अळणी झाले आहे.”

रमाई आणि बाबासाहेबांचा संसार हा अवघा सत्तावीस वर्षांचा होता. त्यातही बाबासाहेब अमेरिका आणि लंडन येथे शिक्षणासाठी दोन वेळेस गेले. तो काळ होता सात आठ वर्षांचा. या काळात अपार दारिद्र्याशी दोन हात करत रमाईने संसाराचा भार नेटाने वाहिला. आधीच प्रकृती तोळामासा त्यात सततची उपासमार, अतोनात शारीरिक श्रम आणि इतरांची कायम चिंता करण्याची वृत्ती यातून त्या मृत्युच्या लवकरच जवळ गेल्या. २७ मे १९३५ रोजी वयाच्या 36 व्या वर्षीच रमाईची प्राणज्योत मालवली. “राजगृह” पोरके झाले. ऐन उमेदित रमाईला काळाने हिरावून नेले. शोक अनावर होऊन बाबासाहेबांनी स्वत:ला कोंडून घेतले. त्यांच्यासाठी रमाईचे जाणे खूपच दु:खद होते.

बाबासाहेबांनी रमाईला “थॉटस् ऑन पाकिस्तान” हा ग्रंथ अर्पण केला आहे. या अर्पण पत्रिकेत त्यांनी रमाईच्या हृदयाचा चांगुलपणा, मनाची सभ्यता आणि चारित्र्याची पवित्रता या गुणांचा गौरव करत रमाईचे मनोधैर्य आणि संकटांना सतत सामोरे जाण्याची वृत्ती आणि मित्र नसल्याच्या काळातील त्यांनी दिलेली साथ याचा सार्थ शब्दात उल्लेख केला आहे.

करुणेचे मूर्तिमंत प्रतिक सबंध युगावर सावली धरणारे मायेचे आभाळ असणाऱ्या माता रमाई समजून घेण्यासाठी खरेतर बाबासाहेबांची ही अर्पण पत्रिका देखील पुरेशी आहे।

डॉ. राजेंद्र गोणारकर
सहयोगी प्राध्यापक
माध्यमशास्त्र संकुल
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ
नांदेड
मो.9890619274