ब्लॉग

रखमा, तुझी ही मुलगी राजाची राणीच होणार बघ…!

पहाटे साडेपाचचा सुमार असावा. हा काळ १८९९ सालचा असावा. वणंद गावच्या गावकुसाबाहेरील वस्तीत एका चंद्रमोळी झोपडीत, एका गोऱ्या गोऱ्या, मुलायम अर्भकाचा जन्म झाला. तसं त्या अर्भकाचे माता पिता…. भिकू आणि रूक्मिणी (धोत्रे). कुणी त्या माऊलीला रखमा म्हणत….. रखमा आपल्या मुलीकडे एकटक पाहू लागली. सुईण बोलली, “अगं अशी एक टक लावून काय बगतेस? शंभर नंबरी सोनं हाय सोनं..ही ईवली ईवली मुलगी म्हंजी, भारताची भरली भरली कणगी हायं….

आईला मिळणार सोन्याचा घागरपेटा नि बापाला मिळणार जरीचा मंदील…. लेक म्हंजी रत्नाची खाण. या या खाणीतून ही….ही रत्न जन्माला येत्यात. खाणच नसेल तर कुठली हि रत्न….. का कुणास ठाऊक, घरादारात, शेजारपाजारच्यांत, मुलामुलींत, रखमाच्या मुलीच्या जन्मापासून कसा आनंदी आनंद चाललेला. घरापुढील मोगऱ्यावर रात्रीतून एखादं टपोरं फुल उगवावं, त्याचा सुगंध साऱ्या वातावरणात पसरावा तसं रखमाला ‘एक सुंदर मुलगी’ झाल्याची गंधीतवार्ता साऱ्या वणंद गावच्या गावकुसाबाहेरील वस्तीत कशी दरवळली. सारे जण तिला पाहून असेच म्हणत असतं,

“रखमा, तुझी ही मुलगी राजाची राणीच होणार बघ.”
आणि खरंच स्वप्नातल्याप्रमाणे, एक दिवस ती मुलगी वयात येते. तारुण्यांन मुसमुसते, मग तर ती अतिशय सुंदर दिसू लागते. जणू स्वर्गाची स्वप्नील परीच… “पोरगी मोठी भाग्याची हो…. सगळी माणसं कशी झुलत्यात हो तिच्यासाठी.” बारशाचा तो शुभ दिन. शुभ सोहळ्याचं मंगल आमंत्रण देतच उगवला. बारस अर्भकाला पाळण्यात घालून नाव ठेवण्याचा मंगल दिवस, आई बापाच्या सौख्याचा, मोठ्या आनंदाचा दिवस.

मुलीच्या मामानं “पार्वती” नाव ठेवा असं सांगून गेलायं. गावच्या भिकंभटान हीचं पोथीतील नाव “भागीरथी” सांगितलं आहे. आम्ही दोघांनीबी हेच नाव ठेवायचं ठरवलंय….पाळण्यातलं नाव भागीरथी. नथवर मुलगी रानी नाव घेतल्यागत बोलली,

“पाळण्यातल नाव “भागीरथी” नामी,
आमी मात्र म्हणणार रामी….रामी”

‘रामी’ (रमाई) सुंदर, सदाफुली, नित्य हसतमुख टवटवीत, त्यामुळे सर्वांचे लक्ष तिच्यावर खिळलेलं. रखमा भिकूच्या चंद्रमौळी घरात रामीची चंद्रकोर कलाकलानं वाढीस लागलेली. “रामी” सहा वर्षाची असावी तिच्या आयुष्यातील एक प्रसंग….. माणसाचं काळीज चिरुन टाकणारा……रामीनं कानाला हात लावून आपला कान स्वतःहून पिरगाळला. रखमाईजवळ जात पश्चातापी मनानं रामी बोलली, “आई तुझ्या पाया पडते, आता मला कळलं, अशी चूक मी जलमांत करणार न्हायी….आई मला क्षमा कर.”रामी अक्षरशः रखमाईच्या पाया पडली, पायावर डोकं ठेवून बोलली, “भावंडांना मी इसरणार न्हायी….कंदी….कंदी (कधीच विसरणार नाही.) चिमुकली जिद्द, गुडघ्याएवढी पोर पण घरकामात बनत होती थोराहूनही थोर! रामी रखमाईच्या पंखाखाली तन मनानं वाढत होती. नवीन नवीन शिकत होती.

आई हा बिनभांडवली, बिनतोट्याचा व खूप खूप फायद्याचा धंदा (शेणी, गोवऱ्या थापणे व त्या विकणे) मी जलमभर इसरणार न्हाय…कंदी (कधीच) इसरणार न्हायी…आई तुझ्या गळ्याची शपथ. रामी….एक चिमुरडा जीव….चिमुकले हातपाय….चिमुकली तिची धाव…तरीही ती धावत होती, धावायच म्हणून धावत होती. कर्तव्य म्हणून धावत होती. आईच्या आजारपणात पहाटे उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत रामी सगळी कामे स्वतः आनंदान, उत्साहानं करीत होती. कधी कंटाळा नाही, कधी आळस नाही. आरडाओरडा नाही. कर्तव्य म्हणून करीत होती.

रखमाईच्या मृत्यूनंतर रामी आपल्या वडिलांना समजावते, (त्यावेळी रामीचे वय ८ वर्ष असेल.) “बाबा तुम्ही असं रडत बसू नका, मला आई नेहमी म्हणायची, रामे…. माणसानं रडत बसू नये… दुःख गिळून टाकण्यासाठी हसतमुखानं जगायला शिकलं पाहिजी.” “बाबा मरताना आई मला सांगून गेलीय, रामे….साऱ्यांची तू आई हो… आईच हे सांगण तळहाताच्या फोडाप्रमाणे मी जपणार हायं. माझ्या भावंडांना मी कदिबी अंतर देणार न्हायं… सारं घर मी एकटी सांभाळीन.. सैंपाक करीन, शेण आणून शेणी थापीन. त्या विकून त्यावर घर चालवीन…. हो आईनं जसं केलं तसं मी समद (सगळं) करीन. पण बाबा तुम्ही खचून जाऊ नका…घराचा खांबच खचला तर सारं घरच कोसळंल. बाबा आम्हांला दिलासा द्या…न्हाईतरं मी….(स्वतःच्या जीवाचे बरे वाईट करेन असे बोलायचं रामी थांबते)” भिकूच्या मृत्यूनंतर तिचा म्हमंईवाला (मुंबई) मामा रामी आणि तिच्या भावांडांचा सांभाळ करीत असे.

“रमाई” या कादंबरीतील काही भाग

संदर्भ:- रमाई
लेखक :- बंधु माधव

टीप:- ही कादंबरी विकत घेऊन जरुर वाचा आणि आपल्या नातेवाईकांना व मित्रमंडळींना देखील भेट द्या.

संकलन :-
एस.पी.तळवटकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *