ब्लॉग

इच्छा ही माझी शेवटची…

रमाईंचे जीवन म्हणजे एक पवित्र गाथा आईचे नाव रुक्मिणीबाई. वयाच्या नवव्या वर्षी रमाचा भीमरावाशी विवाह झाला भीमरावाचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर आपल्या सुनेला पृथ्वी मोलाचं माणिक म्हणत. कोल्हापूरचे शाहू महाराज रमाला आपली ‘धाकटी बहीण’ समजत असत . स्मृतींची पाने चाळताना रमाईंची श्रद्धा, निष्ठा, त्याग, कारुण्य व सहनशीलता किती असामान्य होती याची प्रचीती येते.

रमाबाई अगदी लहानपणी भीमरावाच्या घरी आली. पतीची झेप तिने तेव्हाच ओळखली होती आणि तिने त्यांना मुक्तपणे विहार करण्यास सदैव साहाय्य केले. इंग्लंड – अमेरिका या पाश्चात्त्य देशात भीमराव शिक्षणासाठी गेले त्यावेळी घरची परिस्थिती मोठी बिकट होती. यावेळी रमाईने त्रागा करून किंवा अडचणींचा बाऊ करून त्यांना कधीच रोखले नाही. पतीप्रमाणेच ती मोठी स्वाभिमानी होती. रात्रीच्या अंधारात शेणी थापून ती चार पैसे मिळवीत होती आणि स्वत: चे घर चालवीत होती. राजरत्नच्या मृत्यूनंतर बाबासाहेबांनी जवळजवळ घर वर्ज्य केले. त्यावेळी रमा जेवणाचा डबा घेऊन परळ येथील दामोदर हॉलमध्ये जात असे. पुस्तकात डोके खुपसून बसलेल्या कार्यकर्त्यांच्या गराड्यात बसलेल्या पतीला चार घास खायला घालून त्या परत येत. कित्येक वेळेला त्या ताट वाढून समोर उभ्या राहात आणि डॉक्टर तासन् तास पुस्तकातच डोके खुपसून राहात. तरीही त्या शांतपणे त्यांची मान वर होण्याची वाट पाहत असत.

राजकीय चळवळीत सहभागी होऊन बाबासाहेबांनी आपला प्राण अहोरात्र धोक्यात घातला होता. तरीही ते निर्भयपणे बेडरपणे गावोगावी हिंडत होते. त्यांच्या जीविताला धोका होता. ते बाहेर गेले की परत येईपर्यंत रमा व्रतस्थ राहात. मुखात पाण्याचा थेंबही न घेता ती माउली आपला पती सुखरूप परत यावा म्हणून नवस करी उपवास करी. एकदा रमाबाई म्हणाल्या लोकांना शहाणपण शिकविण्यासाठी एवढा कसला मेला त्रास घ्यायचा आणि जीव धोक्यात घालायचा तो ! मी आता आंथरूण – पांघरूण घेऊन तुमच्याबरोबरच सगळीकडे येत राहीन म्हणजे तुमच्या सेवाचाकरीत खंड पडणार नाही.’ आणि ती भोळी रमा खरोखरच गाठोडे घेऊन तयार झाली होती बाबासाहेबांनी मोठ्या कष्टाने उभारलेल्या राजगृह ‘ या निवासस्थानी फार काळ राहण्याचे भाग्य त्या माउलीच्या वाट्याला आले नाही. मुलांचे अकाली मृत्यू ( रमेश इंदू , गंगाधर आणि राजरत्न ), अविरत कष्ट पतीची निरंतर काळजी आणि खडसर उपासतापासाने त्या दिवसेंदिवस खंगत गेल्या. कणाकणाने झिजत गेल्या. २७ मे १९३५ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली . त्या दिवशी रात्री खूप उशिरा का होईना बाबासाहेब घरी आले होते. रमाबाईला आपल्या मृत्यूची चाहूल लागली होती आदल्या दिवशी अंथरुणावरून उठून त्या घरभर हिंडल्या. पुत्र यशवंताला डोळे भरून पाहिले. गप्पागोष्टी केल्या. रात्री साहेब येईपर्यंत त्यांची वाट पाहिली आणि मग त्या अंथरुणावर हळुवारपणे जाऊन पडल्या.

ती काळरात्र होती. मध्यरात्रीनंतर ती साध्वी अस्वस्थ झाली आणि झोपेच्या अधीन झालेले सारे घर खडबडून जागे झाले बाबासाहेब उठून तिच्याजवळ गेले आणि तिचे खोल जात असलेले डोळे पाहून ते दु:खाने व्याकूळ झाले. त्यांनी रमाईचे डोके मांडीवर घेतले आणि हलक्या हाताने तिला घोटभर पाणी पाजले. ‘इच्छा ही माझी शेवटची आहे तुमच्या मांडीवर मी प्राण सोडावे’ असे म्हणतच रमाने प्राण सोडला. क्षणात सारे काही संपले. बाबासाहेबांनी लहान मुलासारखा टाहो फोडला. ते शोक करू लागले. बाबासाहेबांच्या सांत्वनासाठी मोठमोठे लोक येऊन गेले. परंतु बाबासाहेबांचे सांत्वन करणे कठीण होते. एरव्ही उग्र, तेजस्वी आणि कर्तव्यकठोर भासणारे बाबासाहेब मनाने अतिशय हळवे होते. त्यांचे मनविहार भावकोमल होते. त्यांच्यावरचा हा आघात फार मोठा होता रमाईंच्या जाण्यामुळे पंख तुटल्यागत त्यांची अवस्था झाली होती.

रमाईंच्या कार्यकर्तृत्वापासून प्रेरणा घेत अनेकांनी त्यांच्यावर काव्य रचले. कुणी स्फूर्तिदायक जीवनगाथा लिहिली. रमाईंच्या पदस्पर्शाने काही लोकांचे घर पावन झाले आणि काही लोकांच्या वाट्याला त्यांचा निकटचा सहवास घडून प्रत्यक्ष सेवा करण्याचे सुभाग्य लाभले त्यात आंबेडकरी चळवळीत निष्ठेने कार्य करणाऱ्या सोलापूरच्या दिवंगत गंगूबाई ऐदाळे यांचे नाव अत्यंत महत्त्वाचे आहे.

‘लढा आयुष्याश ‘ ग्रंथात गंगूबाई म्हणतात, ‘मी सात – आठ वर्षांची असेन नसेन. त्यावेळी माझ्या आयुष्यातली आनंदाची घटना म्हणजे रमाबाई शेटफळला आल्या होत्या. दलितांच्या उद्धारकर्त्या, प्रज्ञासूर्य, महान देशभक्त बाबासाहेबांची पत्नी रमाबाई एका दूर अडवळणी गावी येते ही गोष्टच स्वप्नाच्या राज्यात घडण्यासारखी. ज्या ज्ञानभास्कराच्या तेजाने सारे जग दिपून गेले होते, त्यांची सहचारिणी अप्रगत खेडेगावी येते जणू काय इंग्लंडच्या महाराणीने भारतातल्या एका खेड्याला भेट द्यावी असेच नाही का? होय, रमाबाईसुद्धा आम्हा दीनदुबळ्यांची, सात कोटी जनतेची माताच होती. आमच्या हृदयातलं त्यांचं स्थान अढळ आहे. अशा महामातेला जवळून पाहण्याचं नव्हे तर तिची सेवा करण्याचं भाग्य मला लाभलं आहे. म्हणून मी जीवनात तृप्त आहे.’

Photo : Siddhesh Gautam

मिलिंद मानकर, नागपूर