बातम्या

बोधगया क्षेत्रात सापडले नवीन ”बौद्धस्थळ”

२०१८ च्या सप्टेंबरमध्ये हिंदुस्थान टाइम्सच्या पाटणा आवृत्तीत एक बातमी आली की बोधगया क्षेत्रात धर्मारण्य आणि मातंगवापी जवळ एक मोठी शिळा सापडली आहे. या शिळेवर बसून सुजाताने दिलेली खीर सिद्धार्थ गौतम यांनी ग्रहण केली होती. तसेच बुद्धांनी ज्ञानप्राप्ती पुर्वी जेथे वैराग्य मार्गाचा अभ्यास केला ते मोहना नदीजवळील जंगलात असलेले ठिकाणही (धर्मारण्य) शोधण्यात आले आहे.यासाठी प्राचीन साहित्यातील सर्व संदर्भ तपासण्यात आले. प्राचीन प्रवास वर्णने तपासण्यात आली.या संदर्भातील सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे.

चीन देशातील भिक्खू फाहियान हे पाचव्या शतकात आणि हुएनत्संग हे सातव्या शतकात भारतात आले होते. फाहियान आणि हुएनत्संग यांनी त्यांच्या प्रवासवर्णनात एके ठिकाणी लिहिले आहे की सिद्धार्थ गौतमांनी ज्या शिळेवर बसून सुजाताने दिलेली खीर खाल्ली ती शिळा सहा घनफूटाची आहे आणि ती मातंगवापी स्थळापासून एक “ली” अंतरावरती आहे. ( १ ‘ली’ म्हणजे ३५० मी. ) तो धागा पकडून अनेक संशोधकांनी संशोधन करण्यास सुरुवात केली. आणि आश्चर्य म्हणजे मातंगवापी या स्थळापासून दोनशे मीटर अंतरावर एक शिळा आढळुन आली. त्याचबरोबर सिद्धार्थ गौतम आणि त्यांच्या बरोबरीचे पाच परिव्राजक यांनी ज्या अरण्यात कठोर तपश्चर्या केली ते स्थानही शोधून काढण्यात आले. पुरातत्व खात्याचे दीपक कुमार यांनी देखील या स्थळाची पाहणी केली आणि फाहियान आणि हुएनत्संग यांच्या प्रवास वर्णनात असलेल्या शिळेच्या माहितीनुसार व दाखविलेल्या दिशेनुसार चाचपणी करून खात्री केली.

सुजाता स्तुप ( सुजातागढी ) – आताच्या बकरौर गावाजवळ.

आता झालेल्या संशोधनानुसार संशोधकांनी खालील प्रमाणे क्रम मांडला आहे. सिद्धार्थ गौतम हे उद्दक यांच्या आश्रमातून निघाल्यावर गयेत धर्मारण्य येथील अरण्यात पाच परिव्राजक यांचे सोबत आले व तेथे उग्र तपश्चर्या सुरू केली. शरीराला अत्यंत क्लेश दिले. सहा वर्षानंतर शरीर अत्यंत क्षीण झाले. परंतु शरीराला क्लेश देऊन शांती आणि एकाग्रता साधता येणार नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी अन्न सेवन करण्याचा विचार केला व तेथील नेरंजना नदीत उतरून सुपतिठ्ठ घाटावर स्नान केले. त्यानंतर मातंगवापी स्थळाकडे विश्रांती घेत हळूहळू जात असताना तेथे एका वृक्षाखाली त्यांना सेनानीग्राम ( म्हणजेच आताचे बकरौरगाव – उरुवेला प्रदेश ) येथून आलेली गाव प्रमुखाची मुलगी सुजाताने वृक्ष देवता समजून खीर अर्पण केली. सिद्धार्थ यांनी ती खीर पुढे चालत जाऊन एका शिळेवर बसून ग्रहण केली. ही सर्व ठिकाणे नेरंजना नदी व मोहना नदी मधील प्रदेशात आहेत. अडीच हजार वर्षांपूर्वी तेथे घनदाट जंगल होते. खीर ग्रहण केल्यानंतर पुढे चालत जाऊन सिद्धार्थ नेरंजना नदीच्या पात्रात उतरले व खीरीचे पात्र पाण्याच्या प्रवाहात सोडून दिले. त्यानंतर ते पलिकडच्या तीरावर असलेल्या गयेच्या अरण्यात दाखल झाले. व तेथे दृढ निश्चय करून पूर्वेकडे तोंड करून ध्यानस्थ बसले.

मातंगवापी येथे स्तुपाचे असंख्य अवशेष सापडत आहेत. त्याच जागेवर उभे राहिलेले हे देऊळ.

११ व्या शतकानंतर बौद्ध संस्कृती नष्ट होत गेल्यावर चैत्य व विहार ओस पडून तेथे मातीचे ढिगारे साचले गेले. लिखित आणि मुखोद्गत असलेली बौद्ध परंपरा नष्ट होत गेली. त्यानंतर आठशे वर्षांनी १९ व्या शतकात ब्रिटिशांच्या काळात बौद्ध स्थळांचा शोध घेणे सुरू झाले. त्यावेळी फ्रान्सिस बुचानन (१८११), मार्खम किटो (१८४७), अलेक्झांडर कँनिंगहॅम (१८६१) आणि एरीएल स्टेन (१९०१) यांनी केलेल्या शोध मोहिमेत बोधगयेमधील पडझड व नष्ट झालेली अनेक स्थळे उघडकीस आली. तरीही परिपूर्ण माहिती त्यांना मिळाली नसावी. १९७३ साली पुरातत्व विभागाने बकरौर गावात सुजतागढी ठिकाणी उत्खनन केले. तेथे स्तुपाचे अवशेष सापडले. बोधगयेमध्ये ४५ क्षेत्रे असून धर्मारण्य व मातंगवापी क्षेत्रासकट सर्व क्षेत्रे आता हिंदू तीर्थक्षेत्रे झाली आहेत. तेथे सर्व ठिकाणी पिंडदान ( पिंडपाताचा अपभ्रंश ) म्हणून भाताचा गोळा (खीर) देण्यात येतो. तसेच सन १९०० पर्यंत म्यानमार व तिबेटमधून काही भाविक धर्मारण्य व मातंगवापी येथे दरवर्षी येत होते असे माहितगार बुजुर्ग मंडळींनी सांगितले. तेथे उभारलेली देवळे ही जमिनीच्या उंचवट्यावर असून प्राचीन काळी तेथे स्तुप असावा असे निदर्शनास आले आहे. सुजाताने खीरदान केल्याचे सध्यस्थीतीतील देऊळ हे गावातील बालेश्वर पाठक यांनी भाविकांसाठी १९५० साली पिंपळ वृक्षाखाली उभारले आहे.

इंडोनेशिया देशातील खिरदानाचे एक शिल्प.

ललितविस्तार, महावस्तू, अभिनिषक्रमणा सूत्र, हिंदूचे वायुपुराण (ज्यात गयेची माहिती दिली आहे), चिनी भिक्खुंची प्रवासवर्णने अशा प्राचीन साहित्यातील सर्व गोष्टींचा अभ्यास करून संशोधकांनी बुद्धांनी गयेत कसाकसा प्रवास केला असावा याचा नकाशा काढला. या कामी फाहियान यांचे प्रवासवर्णन जास्त आधारभूत ठरले. शोधली गेलेली शिला आता रतनगिरी शिला म्हणून ओळखली जात आहे. व तेथे जाण्यासाठी चांगल्या रस्त्याचे बांधकाम करण्याचा प्रस्ताव आहे. बिहारच्या बोधगयेच्या पर्यटन स्थळांच्या यादीत या शिलेचा समावेश झाल्यास तेथे जाण्यायेण्यासाठी सुविधा उपलब्ध होऊ शकेलं. सध्याचे तेथील

संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)