पाकिस्तानातील रावळपिंडी शहर हे एकेकाळी बौद्ध धम्माचे भरभराटीचे स्थळ होते, यावर प्रथम दर्शनी विश्वास बसत नसला तरी ते एक सत्य आहे. येथील शहराच्या आसपास अनेक पुरातन बौद्ध स्थळे होती व आहेत. या शहरात व त्याच्या आसपास एकूण ५५ स्तूप, ५८ मॉनेस्ट्री (संघाराम), व ९ विहारे तसेच खरोष्टी लिपीतील अनेक शिलालेख आढळले आहेत.
जागतिक वारसा यादीत स्थान असलेले प्राचीन तक्षशिला विद्यापीठ येथून खूप जवळ आहे. प्रसिद्ध पुरातत्ववेत्ते सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी रावळपिंडीचे पूर्वीचे नाव गंजीपूर असल्याचे नमूद केले आहे. व तेथे त्यावेळी भट्टी जमात स्थायिक होती. असंख्य स्तूप तेथे असल्याने त्यांच्या आकारामुळे काळाच्या ओघात तेथील ठिकाणाला पिंडी असे संबोधण्यात येऊ लागले.
हजारो वर्षांपूर्वी म्हणजेच अकराव्या शतकात येथील प्रांतात गझनीच्या मोहम्मदने नासधूस केली. १४व्या शतकात परत येथे हल्ला होऊन गंजीपूर भकास झाले. सन १४९३ मध्ये जंदाखान याने नाश झालेले शहर परत बसविले व तपस्वी आणि संतांची भूमी म्हणून त्याला रावळ नाव दिले. तेव्हापासून या शहराचा हळूहळू विकास होत गेला, मात्र अनेक बौद्ध स्थळे नामनेष होत गेली. १८४९ नंतर जेव्हा येथील प्रांतात ब्रिटिशांचे वर्चस्व झाले तेव्हा अनेक ठिकाणी उत्खनन करून बौद्ध संस्कृतीचे अवशेष मिळविण्यात आले. आज लष्करी मुख्यालय असलेले रावळपिंडी पाकिस्तानातील दोन नंबरचे मोठे शहर असून एकेकाळी इथे धम्माचा वृक्ष बहरला होता हे आवश्य ध्यानात ठेवावे.
– संजय सावंत
Kindly send me historical potos plz