जगभरातील बुद्ध धम्म

आशिया खंडातील बौद्ध देशांत ‘पूर्वजांचा स्मृतीदिन’ असा साजरा करतात

बौद्ध जगतामध्ये सप्टेंबर महिन्यातील पंधरवडा पूर्वजांबद्दल श्रद्धा व्यक्त करण्याचा एक सण म्हणून Pchum Ben/ Vu-Lan/ Obon/ Ulambana/ Ancestor Day अशा विविध नावांनी साजरा करतात. आपल्या घरातील पूर्वजांना वंदन करण्याची प्रथा अडीज हजार वर्षांपासून चालत आलेली होती. अनेक बौद्ध देशांत या पंधरवड्यात पूर्वजांची आठवण म्हणून घरगुती पदार्थ तयार करतात. ते तयार केलेले पदार्थ आणि फुले-फळे विहारात, पॅगोडात मांडले जातात. पूर्वजांना व वडिलधाऱ्यानां नमन करतात. भिक्खूंना वंदन करून आशिर्वाद घेतले जातात. त्यांना चिवर दान केले जाते. अशा तऱ्हेने Remembering the Ancestors हा ‘सण’ म्हणून आनंदाने इतर बौद्ध देशांत साजरा केला जातो.

पूर्वजांच्या स्मृतिदिनानिमित्त फळे फुले विहारात ठेवतात.

भारतात पाळला जाणारा ‘पितृपक्ष’ आणि आशिया खंडातील बौद्ध देशांमध्ये साजरा होणारा ‘पूर्वजांचा सण’ यांच्या कालावधीत जरी साम्य दिसत असले तरी प्रत्यक्षात साजरा करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. भारतामध्ये भाद्रपद पौर्णिमेनंतर पितृपक्षाचा पंधरवडा ( या वर्षी २२ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर ) चालू होतो असे मानले जाते परंतु तो अशुभकाळ समजून गंभीरपणे साजरा केला जातो.

सुत्तनिपात ग्रंथात अनेक गाथांमध्ये वयोवृद्ध आईबाप, वयस्कर बहिणभाऊ यांचा सांभाळ करावा असा उपदेश केलेला आढळून येतो. जे समर्थ असून वृद्ध आईबापाचा सांभाळ करीत नाही ते पुरुषाच्या पराभवाचे कारण आहे असे म्हटलेले आहे. तसेच दुसऱ्या गाथेत जे पुरुष वृद्ध आईबापाचे पालनपोषण करीत नाही त्यास वृषल समजावे असे सांगितले आहे. घरातील वयोवृद्धांचा मान राखण्याबरोबर आपल्या पूर्वजांची आठवण म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्याची, त्यांच्या बद्दल श्रद्धा व्यक्त करण्याची परंपरा भारतीय समाजात होती. सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा प्रसार बाहेरच्या देशात केला त्यावेळी भारतातील या बौद्ध प्रथा देखील बाहेरच्या देशात गेल्या. तिथे त्या रुजल्या. शुद्ध स्वरूपात राहिल्या. म्हणूनच कंबोडिया, म्यानमार, चीन, जपान अशा अनेक बौद्ध देशात पूर्वजांना वंदन म्हणून Ancestor Day याच कालावधीत साजरा केला जातो.

पूर्वजांच्या स्मृतिदिनानिमित्त जपानी लोकांची वेशभूषा आणि नृत्य.

पण भारतातील या मूळ प्रथेला काळाच्या ओघात वेगळेच वळण लावले गेले. श्रद्धापूर्वक त्यांना वंदन करण्याऐवजी श्राद्ध घालण्याचा प्रकार रुजविला. देवी देवतांचे भय घालण्यात आले. नैवेद्य दाखविण्याचा व त्यास काक पक्षी शिवण्याची अजब प्रथा सर्वसामान्यांच्या गळी उतरवली गेली. हा श्राद्ध पक्ष अशुभ मानून या कालावधीत नवीन कार्य करण्यास मनाई केली. थोडक्यात बहुजन वर्गाला हा काळ दुःखद सांगून अंधारात ठेवले गेले.

आपल्या पूर्वजांना वंदन करण्याचा हा पंधरवडा खरे तर खूपच शुभ होय. या पृथ्वीवर कित्येक मुले या कालावधीत जन्म घेतात. त्यांना उलट त्यांच्या घराण्यातील पूर्वजांचे आशिर्वाद प्राप्त होत असतात. अनेक नवीन कार्यांचा शुभारंभ या कालावधीत जगभर होत असतो. माझ्या अनेक कामांचा आरंभ योगायोगाने याच काळात झालेला आहे. खरे तर श्वास जो पर्यंत चालू आहे तो पर्यंत सर्व दिवस हे मानवासाठी अत्यंत शुभ आहेत.

कंबोडिया देशात ‘पूर्वजांचा पंधरवडा’ हा विहारात किंवा पॅगोडात साजरा करतात. शेवटच्या दोन दिवशी या देशात सार्वजनिक सुट्टी असते. व्हिएतनाममध्ये ‘मदर्स डे’ म्हणून तर जपानमध्ये ‘ओबोन’ म्हणून साजरा करतात. चीनमध्ये ‘युलानपेन’ तर थाई आणि बर्मामध्ये ‘परिता’ म्हणून साजरा करतात. घरेदारे स्वच्छ करतात. नैवेद्य तयार करतात. काही ठिकाणी आकाशकंदील देखील आकाशात सोडतात. थोडक्यात भारतामध्ये हा पंधरवडा दुःखद/अशुभ समजला जातो तर इतर देशांमध्ये हा ‘सण’ वयोवृद्धांचा / पूर्वजांचा मानसन्मान म्हणून आनंदाने साजरा करतात, हाच मोठा फरक आहे. हार्वर्ड युनिव्हर्सिटीने प्लुरालीझम प्रोजेक्ट अंतर्गत अमेरिकेतील बौद्ध हा सण कसा साजरा करतात याची माहिती प्रसिद्ध केली आहे. त्याची लिंक खालील प्रमाणे आहे. https://pluralism.org/remembering-the-ancestors?

-संजय सावंत, नवी मुंबई, (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *