इतिहास

सन १८८२ मधील सांची स्तुपाचे नूतनीकरण

सांचीचा स्तूप प्रथम जनरल टेलरने सन १८१८ मध्ये शोधला. हा पहिला युरोपियन होता की ज्याने या स्तुपाचा शोध लावला. त्यानंतर १८६१ मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग स्थापन झाल्यावर सर कॅनिंगहॅम पाहिले संचालक झाले. सन १८७१च्या दरम्यान सर कॅनिंगहॅम यांना दोन सहाय्यक येऊन मिळाले. एकाचे नाव जोसेफ डेव्हिड बेगलर आणि दुसऱ्याचे नाव होते कार्लयेले. दिल्ली आणि आग्रा येथील सर्वेक्षण केल्यावर कार्लयेले याला उत्तर भारतात पाठविले आणि स्वतः सर कॅनिंगहॅम हे बेगलर सोबत मध्य भारतातील म्हणजे मध्यप्रदेशातील सर्वेक्षण कामासाठी रवाना झाले.

त्यांनी सांची येथील स्तूपाच्या आजूबाजूस उत्खनन करून काही महत्वाची तोरणामधील दगडी शिल्पे बाहेर काढली. तसेच या स्तूपाचे अनेक फोटोग्राफ जोसेफ डेव्हिड बेगलर याने काढले. १८८२ मध्ये या स्तूपाचे नूतनीकरण करण्याचे काम सर कॅनिंगहॅम यांनी सुरू केले. आणि हा स्तूप सुस्थितीत आणण्यात आला. जोसेफ बेगलर याने नूतनीकरण कामाचे फोटो सुद्धा काढले. त्यावेळेला प्रिंट व्यवस्थित आल्या नाहीत म्हणून काही फोटो वाया गेले. आजही यातील शिल्लक असलेले फोटो ब्रिटिश लायब्ररी मध्ये सुरक्षित आहेत.

सर कॅनिंगहॅम आणि जोसेफ बेगलर यांनी मध्यभारतातील खजुराहो देवळे, राजवाडे, आणि सांची स्तुपांचे सर्व्हे करण्याचे काम एकत्रित केले. येथील पुरातन अवशेषांची धूळधाण व पडझड झालेली बघून दोघेही हळवे होत. मनुष्याने त्यांच्या महत्वकांक्षेपायी उध्वस्त केलेली ही एकेकाळची नावाजलेली व समृद्ध असलेली बांधकामे झाडाझुडपात एकांती धूळ खात पडलेली पाहून त्यांना अतीव वेदना होत. जोसेफ बेगलरचा कामामधील उत्साह पाहून सर कॅनिंगहॅम खुश होत असत. त्यांनी त्याचा उल्लेख Zealous Assistant म्हणून केला आहे आणि त्याची छायाचित्रे बघून ते सार्थच होते हे जाणवते.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)

2 Replies to “सन १८८२ मधील सांची स्तुपाचे नूतनीकरण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *