बातम्या

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ”दीक्षोत्सव-२०२०” कार्यक्रमास जगभरातून प्रतिसाद

जागतिक धम्म परिषद (GLOBAL BUDDHIST CONGREGATION) आणि आवाज इंडिया चॅनेलच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित ”दीक्षोत्सव २०२०” ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 23, 24 आणि २५ ऑक्टोबर रोजी असे तीन दिवशीय कार्यक्रमात जगभरातून विविध क्षेत्रातील प्रसिद्ध मान्यवर ऑनलाईनच्या माध्यमातून सहभागी झाले होते. त्यासोबतच १० लाखाहून अधिक लोकांनी ऑनलाईन सहभाग घेतला होता.

२३ ऑक्टोबर रोजी राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते ”दीक्षोत्सव २०२०” कार्यक्रमाचे उदघाटन झाले. तर यावेळी प्रमुख पाहुणे लेह/लद्दाख येथील महाबोधि मेडीटेशन सेंटरचे अध्यक्ष भदंत संघसेना आणि राज्याचे उद्योग आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे उपस्थित राहून धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने ”दीक्षोत्सव -२०२०” कार्यक्रमा विषयी आपले विचार व्यक्त केले.

कोरोनाच्या संकटामुळे दीक्षाभूमी नागपूर येथील धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. त्यामुळे सर्व धम्म बांधवांना ऑनलाईन धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे कार्यक्रम घरी बसून पाहता यावेत यासाठी महाउपासक तथा ज्येष्ठ सनदी अधिकारी डॉ.हर्षदीप कांबळे सर यांच्या संकल्पनेतून ”दीक्षोत्सव-२०२०” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच जीबीसी इंडिया, आवाज इंडिया टीव्ही/ युट्यूब आणि धम्मचक्र फेसबुक पेजच्या माध्यमातून सर्व कार्यक्रम लाईव्ह टेलिकास्ट करण्यात आले.

धम्मचक्र प्रवर्तन दिनी ऑनलाईन बुद्धवंदना, जयमंगल अष्टगाथा, मैत्री गीत, रतनसुत्त टेलिकास्ट करण्यात आले. विशेष म्हणजे पहिल्यांदाच प्रसिद्ध भजन सम्राट अनुप जलोटा आणि कलाकारांकडून तथागत बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना संगीतमय अभिवादन करण्यात आले असून सर्व धम्म बांधवानी या कार्यक्रमाला जोरदार प्रतिसाद दिला.

तीन दिवशीय कार्यक्रमात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धम्म भारत पुनर्स्थापित करण्यात योगदान, प्रबुद्ध भारत आणि प्रबुद्ध परिवार, धम्मचक्र गतिमान करण्यात युवकांचा सहभाग, रोजगार-स्वयंरोजगार क्षेत्रात आंबेडकरी उद्योजकांचे स्थान? प्रबुद्ध भारत निर्माण करण्यामध्ये लोकूत्तरा भिक्खू ट्रेनींग सेंटरचे महत्व, धम्मचक्र गतिमान करण्यात भिक्खू संघाची भूमिका आदी विषयावर सम्यक संवाद ऑनलाईन टेलिकास्ट करण्यात आले. या कार्यक्रमास विद्वान भिक्खू, जगभरातील अभ्यासक, प्रशासकीय अधिकारी सहभागी झाले होते.

१० लाखाहून अधिक लोकांचा ऑनलाईन सहभाग

पहिल्यांदाच ऑनलाईन धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला असून भारतच नाहीतर जगभरातून बौद्ध बांधवानी ”दीक्षोत्सव २०२०” कार्यक्रमाचा आस्वाद घेतला आहे. आवाज इंडियाचे फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनल, जीबीसी इंडिया फेसबुक पेज आणि धम्मचक्र फेसबुक पेजच्या माध्यमातून तीन दिवसात १० लाखाहून अधिक धम्म बांधव ऑनलाईन सहभागी होते. विशेष म्हणजे जपान, अमेरिका, इंग्लंड, थायलंड, ऑस्ट्रेलिया, साऊथ कोरिया, म्यानमार, सिंगापूर, श्रीलंका देशातून मोठ्या प्रमाणात लोकांनी सहभाग घेतला.