जगभरातील बुद्ध धम्म

भारतातील प्रत्येक बौद्ध बांधवाने म्यानमार देशाचे ऋण मान्य केलेच पाहिजे

बोधगया या पवित्रस्थळाचा गेल्या अडीच हजार वर्षांचा इतिहास बघितला तर असे दिसून येईल की सम्राट अशोकाने त्याच्या कारकिर्दीत विहार बांधल्यानंतर जवळ जवळ पाचशे वर्षां नंतर गुप्तराजवटीत त्याच्या नूतनीकरणाचे काम करण्यात आले. त्यानंतर कुठल्याही भारतातील राजवटीत बोधगया येथील विहाराचे देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात आले नाही. उलट काही राजवटीत या पवित्र स्थळाला क्षती पोहोचविण्यात आली. ९-१० व्या शतकानंतर बौद्ध धम्माचा हळूहळू प्रभाव कमी झाला. मात्र या पडत्या काळात देखील श्रीलंका व म्यानमार या देशांनी बोधगया येथील विहाराच्या देखभालीसाठी वेळोवेळी मदत केली व कुमक पाठविली.

इ.स.१०८४ मध्ये म्यानमारच्या कॅनझीत राजाने व १४७२ मध्ये धम्मजेदी राजाने या पवित्र स्थळाच्या दुरुस्तीसाठी निधी दिला. त्याच बरोबर कुशल कारागिरांची मोठी तुकडी बोधगया येथे पाठविली. अशा तर्हेने १२ ते १९ व्या शतका पर्यंत म्यानमारच्या प्रत्येक राजाने बोधगया स्थळाची देखभाल दुरुस्ती केल्यामुळे बोधगया विहार सुस्थितीत टिकून राहिले. यास्तव भारतातील प्रत्येक बौद्ध बांधवाने म्यानमार देशाचे ऋण मान्य केलेच पाहिजे. कारण या देशानेच भारतातील प्रतिकूल परिस्थितीत बोधगयाचे पावित्र्य जपले आहे.

त्यांचे हे ऋण फेडण्याची पाळी आता आपली आहे. म्यानमार मध्ये २०१६ मध्ये झालेल्या भूकंपाने बगान या ऐतिहासिक शहरामधील अनेक पॅगोड्यांना क्षती पोहोचली. गेल्या चार वर्षात दोन हजार पैकी फक्त ३६५ पॅगोडयांची युनेस्कोच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार दुरुस्ती करण्यात करण्यात आली. म्यानमारमध्ये हजारोच्या वर बुद्धविहार, मॉनेस्ट्री, स्तूप असून अनेकांची दुरुस्ती करणे बाकी आहे. तूर्तास पाच भव्य महत्वाचे पॅगोडे तात्काळ दुरुस्त करणे आवश्यक आहे. त्यात भव्य असा आनंद पॅगोडा सुद्धा आहे. येथील भव्य बुद्ध मूर्ती सांभाळून हे काम करणे आवश्यक आहे.

यास्तव म्यानमारचे अध्यक्ष यु वि मिंट यांनी २६-२९ मार्च २०२० दरम्यान भारतास भेट देऊन पॅगोडा, विहार, मॉनेस्ट्री यांच्या दुरुस्तीसाठी भारतास विनंती केली. त्यानुसार भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग लवकरच तेथे जाऊन व पाहणी करून दुरुस्तीचे काम हाती घेत आहे. या अनुषंगाने करारनाम्यावर उभय देशांच्या सह्या झाल्या. ही खूपच आनंदाची गोष्ट असून म्यानमार देशातील बौद्ध सांस्कृतिक वारसा स्थळांची दुरुस्ती करणे हे आपले कर्तव्य आहे असे वाटते.

कोरोनाचा जगात सर्वत्र फ़ैलाव होत असताना म्यानमारमध्ये तो नियंत्रित आहे. ही अतिशय चांगली बाब आहे. बुद्ध उपदेशांचे काटेकोरपणे पालन करणारा हा देश आता विकसित होत असून मागील वर्षी बगान शहराचे नाव जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहे. याच देशाने बुद्धांची ध्यान साधना सर्व जगाला दिली. क्षणभंगूर जीवन आणि उदय-व्यय होत असलेला सृष्टीतील आणि शरीरातील जीवनक्रम याचे आकलन ज्याला झाले तो सर्व प्रसंगांना समता भावनेने सामोरे जातो. असा बुद्ध उपदेश जपणाऱ्या देशात पुरातन बौद्ध स्थळांच्या दुरुस्तीेचे काम करणे, हे निश्चितच फलदायी आहे. जो काही अधिकारी/कर्मचारी वर्ग या कामासाठी तेथे जाईल, त्या सर्वांना धम्माचे आकलन होवो. त्यांचे मंगल होवो. या सदिच्छा.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ट बौद्ध इतिहास अभ्यासक)