भगवान बुद्धांचे अग्रश्रावक सारिपुत्त यांच्या कुटुंबाची माहिती ‘खदिरवनिय रेवत’ या सुत्तात मिळते. सारिपुत्त हे सर्व भावंडात वडील बंधू होते. त्यांच्या बहिणींची नांवे चाला, उपचाला आणि सिसुपचाला अशी होती आणि भावांची नांवे चुंद,उपासेन व रेवत अशी होती. ही सर्व नांवे थेरीगाथेच्या अठ्ठकथेत सापडतात. रेवत हा सर्वात लहान होता. वडील बंधू सारखा तो भिक्खू होऊ नये म्हणून आईबापाने त्याचे लहान वयातच लग्न ठरविले. त्याच्यासाठी बघितलेली मुलगी आजी आणि आजोबांच्या पाया पडायला आली तेंव्हा आजोबांनी आशीर्वाद दिला की “हे मुली तू या आजीबाई पेक्षा जास्त वर्षे जग” तेंव्हा लहानगा रेवत म्हणाला “काय ? ही सुंदर मुलगी पुढे आजीबाई सारखी दिसणार काय ?” तेंव्हा आजोबा म्हणाले “अरे, तुला काही समजत नाही. जे पुण्यवान असतात ते जास्त वर्षे जगतात व वृद्ध होऊनच मरतात.”
हे ऐकून रेवत चिंतामग्न झाला. ‘अरेरे, ही सुंदर मुलगी पुढे आजीबाई सारखी दिसणार. तिची त्वचा सुरकूतलेली होणार. केस पांढरे होणार आणि दात पण नसणार ! मग अशा रूपावर भाळून काय होणार ? मला माझ्या मोठ्या बंधुचाच मार्ग पत्करला पाहिजे.’ अशा विचाराने रेवतचे मन भरून गेले. व लग्नापूर्वीच घरातून पळ काढण्याचा त्यानें निश्चय केला.
लग्नाचे दिवशी रेवत मित्रांसोबत खेळत होता. व लग्नविधी सुरू होण्यापूर्वी सर्वांचा डोळा चुकवून त्याने घरातून असा पळ काढला की त्याच्या आईबापाला व नातलगांना तो सापडलाच नाही. खोल अरण्यप्रदेशात एके ठिकाणी काही भिक्खू रहात होते. तेथे रेवत गेला व प्रवर्ज्या मागू लागला. तेंव्हा त्यांनी विचारले “तू आहेस कोण ? नवरदेवाचा पोशाख घालून आलास आणि प्रवर्ज्या मागतोस काय ?” तेंव्हा रेवतने आपले वडील बंधू सारिपुत्त यांचे नावं सांगितले. ते ऐकुन भिक्खुंनी त्याचे कौतुक केले व त्यास श्रामनेर प्रवर्ज्या दिली. श्रामणेर झाल्यावर रेवत मोठ्या घनदाट वनात ( खदिर वन) रहात असे. तेथेच तो ध्यानसाधना करीत अर्हत पदाला पोहोचला. त्याला भेटण्याची सारीपुत्त यांची इच्छा झाली तेव्हा खदिरवनात जाण्यासाठी बुद्धांकडे त्यांनी परवानगी मागितली. तेंव्हा भिक्खूसह भगवान बुद्ध सुध्दा तेथें जाण्यास तयार झाले. भयंकर अशा त्या वनात सर्वजण पोहोचले तेंव्हा रेवत यांनी त्यांच्या राहण्याची यथाशक्ती व्यवस्था केली.
भगवान त्यास म्हणाले ‘ रेवत या जंगलात सिंहगर्जना व हत्तींचे चित्कार ऐकून तुला काय वाटते ?’ रेवत म्हणाला ‘भगवान, अशा प्रसंगी मला भय न वाटता एक प्रकारचे अरण्यप्रेम वाटते.’ त्याचे उत्तर ऐकून भगवान बुद्ध प्रसन्न झाले व अरण्यवासापासून कोणकोणते फायदे आहेत याचा सर्व भिक्खूसंघाला उपदेश केला. भिक्खूसंघासह भगवान बुद्ध परत जेंव्हा श्रावस्तीला आले तेंव्हा उपासक विशाखाने प्रवास कसा काय झाला व रेवतांचे राहण्याचे स्थान कसे आहे, याची चौकशी केली. जे भिक्खू अर्हत होते त्यांनी रेवत यांच्या स्थानांची स्तुती केली. परंतु सामान्य भिक्खूंना ते स्थान आवडले नाही, असे त्यांच्या बोलण्यावरून विशाखेला दिसून आले. तिने भगवंतांना त्या ठिकाणा बाबत विचारले तेव्हां भगवंतांनी खालील गाथा म्हटली.
“गामे वा यदी वारज्जे निंने वा यदी वा भले |
यत्तारहणतो विहारांती तं भूमी रामनेयक्क ” ||
अर्थ
“गावात काय की अरण्यात काय, खोलगट प्रदेशात काय की सपाट प्रदेशात काय, जेथे अर्हत राहतात ते स्थळ रमणीय होय.”
जे ध्यान साधनेद्वारे धम्मामध्ये परिपक्व होत जातात ते अर्हत व्यक्तींकडे आपोआप जोडले जातात. हा निसर्गनियम आहे. अदभूत शांती अर्हत व्यक्तीजवळ वास करीत असते. वरील कथा वाचल्यावर मला रामदास स्वामी यांची गोष्ट आठवली. त्यांनी देखील लग्नाच्या बोहल्यावरून पळ काढला होता आणि नंतर मनाचे श्लोक लिहून प्रसिद्ध पावले होते. मनाला ध्यान मार्गाने ताब्यात कसे ठेवावे, विकारांपासून मुक्त कसे व्हावे याचा उपदेश भगवान बुद्धांनी अडीज हजार वर्षांपूर्वी केला होता. १७ व्या शतकात रामदास स्वामी यांनी देखील मनाला प्रमुख मानून त्यास चांगले वळण कसे लावावे याचा श्लोकांतून उहापोह केला आहे. पण तसे आचरणात न आणता फक्त पाठांतर करण्यावर भर दिला जातो हे दुर्दैव आहे. असो, बुद्धांचे अग्रश्रावक सारिपुत्त यांचे लहान बंधू रेवत यांनी बालवयात ज्या निर्धाराने श्रामणेर होण्याचा निर्णय घेतला त्याला माझे त्रिवार वंदन. त्यांची ही स्फूर्ती सर्वांना धम्माचे वाचन आणि आचरण करण्यास प्रेरणादायी ठरो.
-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)