बातम्या

महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यात सम्राट अशोक कालीन 2300 वर्ष जुना बौद्ध स्तूप सापडला

बुलढाणा जिल्ह्यात प्राचीन भारतीय संस्कृतीचा तब्बल 2300 वर्ष जुना इतिहास सांगणारा भला मोठा ऐतिहासिक ठेवा सापडला आहे. यामध्ये सम्राट अशोक कालीन एक बुद्ध स्तूप आढळून आला आहे. त्यामुळे आता बुलडाणा जिल्ह्याचे नाव जागतिक पटलावर उमटले जाणार आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील भोन गावात 2002 साली पुणे येथील डेक्कन महाविद्यालयाच्या डॉ.भास्कर देवतारे यांच्या नेतृत्वात पुर्णा नदीलगत असलेल्या काही अवशेषांचे उत्खनन केले. झालेल्या उत्खननात बुद्ध स्तूप आढळून आला होता. उत्खननादरम्यान त्यांनी प्राप्त केलेल्या वस्तुंचे कार्बन टेरींगव्दारे कालमापन केले आहे. त्यानुसार हा कालखंड इ.स. पूर्व ३०० चा आहे. यावरून भोनचा स्तूप हा सम्राट अशोकाच्या कालखंडात बांधण्यात आला आहे.

इतिहासाची साक्ष देणारे अनेक पुरावे देखील आढळून आले आहेत. यामध्ये तत्कालीन अनेक विहिरी, नाणी, मृण्मयी अलंकार, धान्य इत्यादी सारख्या महत्वपूर्ण बाबी आढळल्या आहेत. 2002 साली सुरू झालेल्या प्राथमिक पाच वर्षातील उत्खननात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.

सरकारी अनास्थेमुळे स्तूप पुन्हा एकदा जमिनीखाली दडवून ठेवण्याची दुर्दैवी वेळ या डेक्कन कॉलेजच्या संशोधकांवर आली. त्यामुळे ज्यांच्या शेतात हा स्तुप आहे. हे अजूनही या जागेवर पीक घेत आहेत. गेल्या 20 वर्षांपासून या स्तुपाबाबत शासन स्तरावर हालचाली झाल्या नव्हत्या. मात्र आता स्थानिक विविध संघटनांच्या मागण्या लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने स्तुपाचे उत्खनन करण्याचे ठरवले आहे.

या ठिकाणी होत असलेल्या जिगाव प्रकल्प क्षेत्रात भोन हे गाव बुडीत क्षेत्रात जात असल्याने तब्बल 135 हेक्टर जमीन संरक्षित भिंत बांधून या स्तुपाचे जतन करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. त्यासाठी 1 ऑक्टोबर रोजी जलसंपदा विभागाने नाशिक पुरातत्व विभागाची तत्त्वता मान्यता मिळवली आहे.

चीनी प्रवासी हुएत्संगच्या नोंदीनुसार या ठिकाणी पाच स्तूप

चीनी प्रवासी हुएत्संग याने बुद्धिष्ट रेकॉर्ड आॅफ वेस्टर्न वर्ल्ड या प्रवासवर्णनाच्या सी- यू- की मधील नोंदीनुसार वर्णन केलेले संदर्भ भोनशी जुळतात. हुएत्संगने या ठिकाणी पाच स्तूप व अनेक संघाराम असल्याचे म्हटले आहे. पुरातत्व खात्याने केलेल्या उत्खननात एक स्तूप निर्दशनास आला आहे. त्यामुळे येथे आणखी उत्खनन करून इतिहास समोर आणण्याची गरज आहे.

ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना – डॉ.भास्कर देवतारे

‘भोन’ आडवळणाच्या गावी 2010 साली झालेल्या उत्खननात सातवाहनपूर्व काळातील ई. स. पूर्व 300 ते इ. स. पूर्व 100 वर्षांपूर्वीच्या बुद्ध स्तूपाचे अवशेष आढळून आले आहेत. लोकवस्ती व स्तूप यांचे एकाच ठिकाणी अवशेष आढळून येणे, ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना असल्याचे संशोधक डॉक्टर भास्कर देवतारे यांनी सांगितले होते. पुणे येथील डेक्कन कॉलेज पदव्युत्तर संशोधन संस्थेच्या पुरातत्व विभागामार्फत येथे सन 2010 मध्ये उत्खनन करण्यात आले, डॉक्टर भास्कर देवतारे यांच्या नेतृत्वात संशोधन चमू व विद्यार्थी यांनी उत्खननाचे काम पाहिले.

सुरुवातीच्या उत्खननात सापडलेल्या अवशेषांवरून या चमूने भोन हे सातवाहन काळातील प्रगतशील व्यापार केंद्र असल्याचा निष्कर्ष काढला होता. मात्र पुढे झालेल्या उत्खननात या ठिकाणी स्तूप असल्याचे अवशेष आढळून आले असल्याने या गावाचा ऐतिहासिक संबंध सातवाहन पूर्व म्हणजे इसवी सन पूर्व 300 ते इसवी सन पूर्व 100 वर्षा पर्यंत असल्याची शक्यता डॉक्टर देवतारे यांनी व्यक्त केली होती. सातवाहन पूर्व कालखंडात ‘स्तूप’ केवळ मौर्य काळात त्याहीपलीकडे सम्राट अशोकाच्या काळात असण्याची शक्यता आहे.

भोन स्तूप परिसरात सापडले प्राचीन अवशेष

भोन स्तूपाच्या परिसरात काय  सापडले?

भोन येथे आढळलेल्या स्तूपाच्या अवशेषांमध्ये प्रदक्षिणामार्ग आढळून आला आहे. संपूर्ण गोलाकार भाग जरी उत्खननात उघडा केला नसला, तरी ज्या चार ठिकाणी उत्खनन केले आहे. या वरून स्तुपाचे अस्तित्व स्पष्टपणे जाणवते. ‘भोन’ येथे उत्कृष्ट बनावटीच्या मृदूमातीचे विशेषता उत्तर भागातील भांडयाचे एन. बी. पी या प्रकारातली अवशेष आढळले आहेत. तसेच तांब्याची एकाच प्रकारातली नाणी सुद्धा आढळून आली आहेत. ही नाणी सातवाहन काळाच्या पूर्वीची असल्याचा अंदाज डॉक्टर भास्कर देवतारे यांनी व्यक्त केला होता.

या ठिकाणी जळालेले धान्‍य, दागिने, पदके, मणी, शौचपीठ, जळालेली कवले, विटा यांचे अवशेष आढळून आले होते. जी नाणी सापडली त्यापैकी काही नाण्यांवर वृक्ष व त्यांच्या बुंदयाला असलेला पार यांचे चित्र आढळले आहेत. त्यामुळे ही नाणी सातवाहन पूर्वीची असावी असा अंदाज आहे. शिवाय सातवाहन कालखंडातील नाण्यांवर ‘श्रीसत’ असे आढळून येते, मात्र नेमकी ही बाब भोन येथे आढळलेल्या नाण्यांवर नसल्याचे स्पष्ट होते. भोन येथे स्तूपाच्या आढळलेल्या अवशेषांमुळे डॉ. देवतारे यांच्या उत्खननाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

हा पण व्हिडिओ पाहा :

आता पूर्व कालखंड डोळ्यासमोर ठेवून संशोधकांनी या ठिकाणी तात्काळ उत्खनन करून हा सातवाहन पूर्व काळातील संपूर्ण 2300 वर्षांपूर्वीचा इतिहास उलगडण्याची गरज निर्माण झाली आहे. भोन स्तूप अवशेषाजवळ मराठी चार संख्येच्या आकारात असलेल्या ‘नंदीपाद’ या नावाने ओळखल्या जाणारी पदके आढळून आली आहेत. तत्कालीन बौद्ध काळात हे ‘नंदीपाद’ पवित्र चिन्ह म्हणून ओळखल्या जात असे, उत्तर व दक्षिण या दोन्ही प्रदेशांचे व्यापार केंद्र असणारे ‘भोन’ येथे स्तुपाचे अवशेष आढळल्याने या स्थानाचे ऐतिहासिक महत्त्व वाढले आहे.

डॉ. देवतारे यांच्या नेतृत्वात गुरुदास शेटे, रेश्मा सावंत, वैशाली कथले, सतीश नाईक, सुनील रोकडे, विजय ओंबळे चंद्रकांत शेंडगे यांनी बारा विद्यार्थ्यांचा सहकार्य घेऊन संशोधन केले आहे. विशेष म्हणजे इराण मधील दोन विद्यार्थिनींचाही यामध्ये समावेश होता. त्यामुळे 11 वर्षापूर्वी भोनची ऐतिहासिक ओळख नव्याने जगासमोर आली असल्याने, त्याचे पुरातत्व दृष्ट्या महत्त्व फार वाढले आहे.