इतिहास

बौद्ध संस्कृतीमधून झाला नाट्यशास्त्राचा उदय

अनेक जेष्ठ संशोधक नाट्यशास्त्राचा आद्य ग्रंथ हा संस्कृत भाषेत असल्याचे मोठ्या तावातावाने लिहितात. त्याच बरोबर संस्कृतचा भाष्यकार ‘पाणिनी’ याचा उदोउदो करतात. पाणिनीच्या व्याकरणाचे गोडवे गातात. आणि प्राचीन भारताचा सर्व वैभवशाली इतिहास हा संस्कृत ग्रंथात असल्याचे नमुद करतात. त्यामुळे संस्कृत ग्रंथांना प्रमाण मानून संशोधन केले जाते. पण भारतात जनसामान्यांची भाषा संस्कृत कधीच नव्हती, हे सत्य सोयीस्कर विसरतात. दोन हजार वर्षापूर्वी प्राकृत होती, पालि होती. संस्कृत सोडून इतर बोलीभाषा रुढ होत्या. त्याकाळी संस्कृत नाटकाला प्रेक्षक तरी होता काय ? आजही संस्कृत भाषेतील नाटक बघायला कोण जाईल काय?

जातककथा आणि नितीपर बोधकथा यांचे नाट्यरूपांतर सम्राट अशोक यांचे काळापासून भारतात होत होते. नाट्यशास्त्राचा उदय तिसऱ्या शतकात संस्कृत मधून ग्रंथ लिहिल्याने झाला नाही.

अडीज हजार वर्षांपासून बुद्धांचा उपदेश हा सामान्य लोकांना आकलन होण्यासाठी प्राकृत, मागधी आणि पालि भाषेतून नटांच्या संवादातून आणि प्रश्नोत्तराच्या माध्यमातून व्यक्त होत होता. मुख्य नट अनेक सुत्रांचे (सुत्तांचे) सवांदाच्या व गायनाच्या माध्यमातून विश्लेषण करीत असत. वग (वग्ग) म्हणत असत. त्यातुन कालांतराने सूत्रधार निर्माण झाला व नाटयतंत्राचा उदय झाला. थोडक्यात नाट्यशास्त्राचा विकास हा बौद्ध संस्कृतीमधून झाला आहे. नाटयशास्त्रावर संशोधन करताना पालि साहित्याचा देखील अभ्यास करणे आवश्यक आहे याचे आकलन अनेक ब्राम्हणी विद्वान व विचारवंतांना होत नाही. जी भाषा जनसामान्यांना माहीत नव्हती, ज्याचा एकही शिलालेख आढळत नाही त्या भाषेतील ‘नाट्यशास्त्र’ हा संस्कृत मधील ग्रंथ प्रमाण संहिता म्हणून मानायचा हे हास्यास्पद नव्हे काय ?

त्यामुळे संस्कृत मधील ग्रंथांना प्रमाण मानून संशोधन करणे हे कितपत योग्य आहे ? हा प्रश्न उभा राहतो. संस्कृत उदयापूर्वी अस्तित्वात असलेल्या प्राकृत, मागधी, पाली भाषेचा अनेक विचारवंत आणि संशोधक यांना गंध देखील नसतो. दीड-दोन हजार वर्षापूर्वीची भारतातील बौद्ध संस्कृती ह्यांच्या गावीच नसते. त्या संस्कृतीतील अफाट साहित्याचा अभ्यास हे ब्राह्मणी संशोधक करीतच नाहीत. त्रिपिटक यांना माहीत नसते. शिलालेख, अशोकस्तंभ यांना माहीत नसतो. संस्कृत भाषेचा ३ऱ्या शतकानंतर उदय झाला हे त्यांना पटतच नाही. ( पाणिनी हा चौथ्या शतकात होऊन गेला.) बरे ती भाषा जुनी असल्याचे पुरावे दाखवा म्हटले तर मूग गिळून बसतात. लहानपणापासून संस्कृत भाषा ही देववाणी म्हणून मनावर बिंबवले गेले असल्याने तीच भाषा प्राचीन दिसते. त्यामुळे त्यातील ग्रंथांना प्रमाण मानून संशोधन केले जाते ते पूर्णपणे चुकीचे आहे. असल्या एकांगी संशोधनाला काडीची ही किंमत रहात नाही. असले संशोधन अर्धवट समजून कचऱ्याच्या डब्यात टाकावे.

कोरिया देशातील नृत्यानाट्यातील गिगाकू मास्क. सिल्करोड द्वारे धम्माचा प्रसार अनेक देशांत झाला, तेव्हा ही प्राचीन नाट्यकला सुद्धा चीन, जपान, तैवान, तिबेट मध्ये गेली.

महाराष्ट्रात करमणुकीच्या प्रकारांची प्रथा इ.स.१ल्या शतकात होऊन गेलेल्या सातवाहन राजवटीतील हल राजाच्या काळापासून सापडते. पैठण ही त्यांची राजधानी होती. नाट्य शास्त्रातील विस्मयकारक बारकावे हे बौद्ध नाट्य प्रणाली मधून आलेले आहेत. अभिनय, कटाक्ष, स्वरउच्चारण, केशभूषा, वेशभूषा हे सर्व तपशील बौद्ध संस्कृतीतून झिरपत आले आणि संस्कृत ग्रंथकारांनी ते वेचले. भारतीय नाट्यशास्त्राचा आरंभकर्ता भरतमुनी आहे आणि त्याच्या नाट्यशास्त्रानुसार कोणत्याही नाटकाचा शेवट भरत वाक्याने होतो, असे विद्वान ठासून म्हणतात. पण या भरतमुनींचा काहीच इतिहास उपलब्ध नाही. नाट्यशास्त्र ग्रंथाचे लिखित पुरावे देखील आढळत नाहीत. खरे म्हणजे बुद्ध उपदेशांचा प्रसार करताना प्रश्नोत्तरे असलेल्या सवांदाचे नाटय रूपांतर हे संमेलन, यात्रा, परिषद अशा ठिकाणी केले जात असे. जातक कथा, नितिबोध कथा यांच्या नाट्यातून बुद्ध उपदेशांचे सार सांगितले जाई. त्यालाच भरतवाक्य हे संस्कृत ग्रंथकारांनी म्हटले. म्हणजे थोडक्यात आयत्या कलाकृतीवर त्यांनी संस्कृतचा लेप लावला असेच म्हणावे लागेल.

1) विविध भावमुद्रेतून नृत्यनाट्य सादर करण्याची कला स्त्रियांनी जोपासली होती. सुत्तांचे विश्लेषण करणारा पुढे सूत्रधार झाला. त्रिपिटकातील विविध वग्ग याचेच पुढे वग झाले. 2) ओरिसातील पारंपरिक नृत्यनाट्यात बुद्धिझमचा प्रभाव आहे.

दुसरा महत्त्वाचा फरक म्हणजे संस्कृत नाट्य साहित्यात दुःखद प्रसंग येत नाहीत. तळागाळातील लोकांचे चित्रण त्यात नसते. सुखवस्तू लोक, राजेरजवाडे, सुंदर मादक स्त्रियां, पुरोहितशाही, चंगळवाद याचेच दर्शन त्यात घडते. सामान्यजणांचे प्रश्न, दुःख, वेदना त्यात बिलकुल नसतात. तसेच भारतभर एकेकाळी पसरलेल्या बौद्ध संस्कृतीचा ऊहापोह न करता तिच्यावर झाकोळलेल्या फक्त ब्राम्हणी संस्कृतीचा कालखंड या सर्व संशोधकांना दिसतो. ‘मिलिंदप्रश्न’ हा सवांद असलेला पालि ग्रंथ नाटयशास्त्र ग्रंथापेक्षा जुना आहे हे यांना केंव्हा कळणार ? प्राकृत-पालि मधील सर्व साहित्याचे पुरावे अनेक बौद्ध देशांत व ब्रिटिश लायब्ररीत आहेत. त्यातील विविध साहित्यप्रकार पाहून आजही संशोधक अचंबीत होतो. तरी मूळ भारतीय बौद्ध संस्कृतीतून उचलेल्या रत्नांवर संस्कृत नाटयशास्त्राची रचना करून त्याचा उदोउदो करणे हे कृत्य सराईत दरोडेखोराचेच मानले पाहिजे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने ‘नाटक आणि रंगभूमी परिभाषा संग्रह’ हा ग्रंथ नुकताच प्रसिद्ध केला आहे. यात लेखकाला त्रिपिटक साहित्याची बिलकुल माहिती नसल्याचे दिसून आले. म्हणूनच सत्य काय आहे हे सर्वांना कळावे यासाठी ही पोष्ट लिहावी लागली.

-संजय सावंत, नवी मुंबई, (लेखक- ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)