बातम्या

श्रीलंकेतून बुद्धअस्थीचे भारतात आगमन; पण हा अस्थिकलश श्रीलंकेत कसा पोहचला?

श्रीलंकेहून तथागतांच्या अस्थीकलशाचे नुकतेच भारतात आगमन झाले. पवित्र बौद्धस्थळांवर जनतेच्या दर्शनार्थ ठेवण्यात आला. यावेळी लाखो लोकांनी त्याचे दर्शन घेत भावपूर्ण सुमनांजली वाहिली. बुद्धांच्या पवित्र अस्थिकलशाने भारताची भूमी कृतार्थ झाली, धन्य झाली. अभिमानाची गोष्ट म्हणजे बुद्धाचा अस्थिकलश भारतातूनच श्रीलंकेला गेला होता…

महाकारुणिक बुद्धांच्या पवित्र अस्थींचे भारतात श्रीलंका एअरलाइन्सच्या खास विमानाने 20 ऑक्टोबरला आगमन झाले. लखनऊ विमानतळावर आगमन होताच जसराजपूरच्या प्रतिनिधी मंडळाने बुद्ध अस्थिकलशासोबत वाईबीएसएचे पूज्य भन्ते उपनंद थेरो यांचे शानदार स्वागत केले. विमानात वेगळ्या सीटवर ठेवून पूज्य भिक्खूंनी अस्थिकलश सुरक्षितपणे भारतात आणला त्यामुळे ते अभिनंदनास पात्र आहेत.

या बुद्ध धातू अवशेषाचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर सारनाथच्या मूलगंध कुटी विहारासह इतर पवित्र स्थळी बुद्धअस्थी जनतेच्या दर्शनासाठी ठेवण्यात आल्या. यावेळी सर्वत्र उत्साहाचे मंगलमय वातावरण पसरले होते. जणू बुद्धाचे भारतभूमीवर पुनश्च आगमन झाल्यासारखे त्या दिवशी भासत होते. लाखो लोकांनी बुद्धचरणी लीन होऊन भावपूर्ण सुमनांजली वाहिली. पवित्र अस्थिकलशाने भारताची भूमी कृतार्थ झाली, धन्य झाली. विशेष अभिमानाची गोष्ट म्हणजे बुद्धाचा अस्थिकलश भारतातूनच श्रीलंकेला गेला होता.

बुद्ध धातू अवशेषाचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

बुद्धांच्या पवित्र अस्थी श्रीलंकेत कोणत्या प्रसंगी नेण्यात आल्या याचे वेगवेगळे विचारप्रवाह बौद्ध साहित्यात वाचावयास मिळतात. काही अभ्यासकांच्या मते, भारतातून श्रीलंकेला बुद्धअस्थी १८८० साली नेण्यात आल्या. दुसरा विचारप्रवाह असा आहे की, सारनाथच्या मूलगंध कुटी महाविहारात प्रतिष्ठित असलेला बुद्धांचा अस्थीकलश ८० वर्षापूर्वी पहिल्यांदा १९३१ साली श्रीलंकेला पाठविण्यात आला. बुद्धअस्थींचा स्पर्श श्रीलंकेत व्हावा अशी त्या सरकारची भारत सरकारकडे सातत्याने मागणी होती.

श्रीलंकेच्या राष्ट्रपती भवनात तो तीन दिवस मोठ्या आदर – सत्कारपूर्वक ठेवण्यात आला होता. त्यानंतर १९४७ साली भगवंताचे अग्रशिष्य सारिपुत्र आणि मौद्गल्यायनाच्या अस्थी श्रीलंकेला आणण्यात आल्या तेव्हाही लंकावासीयांचे हृदयविहार अपार श्रद्धेने भारावले होते.

महाबोधी विहाराच्या माहितीनुसार बुद्धाचा अस्थीकलश आंध्र प्रदेशात नागार्जुन कोंडा येथे १९२८ साली झालेल्या उत्खननात सापडला होता. २०१३ पर्यंत तो खुला होता. त्यावर प्रत्येक दिवशी सुवासिक फुलाचा स्पर्श केला जायचा. अस्थीचे लागोपाठ क्षरण रोखण्यासाठी खास ‘बुद्ध अस्थीकलश’ श्रीलंकेतच तयार आला. विशेष प्रकारच्या काचेत सुवर्ण आणि हिरे मोती कलात्मक रीतीने अंकुरित करून कलशाचे रूप बहाल करण्यात आले. या कलशाचे वजन जवळपास एक हजार ग्राम असून त्यावर लागलेला आरसा प्रकाशज्योती देण्याचे काम करतो. अनेक प्रकारच्या तपासणीनंतर तत्कालीन ब्रिटिश सरकारने त्याला ‘बुद्ध अस्थी अवशेष’ म्हणून मान्यता दिली.

 

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाचे तत्कालीन महानिदेशक दयाराम साहनी यांनी १९३१ साली महाबोधी सोसायटीला हा कलश दान दिला. त्याच वर्षी मूलगंध कुटी विहाराचा पाया रचण्यात आला. १९३६ साली महाबोधी विहार बनून तयार झाले . देवमित्त अनागारिक धम्मपाल यांच्या मार्गदर्शनाखाली विहाराची निर्मिती करण्यात आली. ते स्वतः विद्वान बौद्ध भिक्खू होते. जन्माने ते श्रीलंकन असले तरी त्यांची कर्मभूमी बुद्धाची मायभूमी अर्थात भारत होती. चाळीस वर्षे भारतातून जगभर त्यांनी बौद्ध धम्माचा प्रचार – प्रसार केला.

तिसरा विचारप्रवाह असा आहे की, भारतीय पुरातत्त्व विभागाने १९७१ ते १९७३ च्या दरम्यान कपिलवस्तू येथे उत्खनन केले. त्यावेळी इतर अवशेषांसोबत सर्वात महत्त्वपूर्ण बुद्धाचा अस्थिकलश सापडला. या कलशाला दिल्लीच्या एएसआई संग्रहालयात ठेवण्यात आले. तेथून तो श्रीलंकेला रवाना करण्यात आला.

बौद्ध तत्त्वज्ञानात पवित्र अस्थींचे अनन्यसाधारण महत्व आहे. बौद्ध धम्मानुसार बुद्ध , प्रत्येक बुद्ध , अर्हत आणि चक्रवर्ती राजा . या चार महानुभावांच्या अस्थीच परम पवित्र व वंदनीय मानल्या जाव्यात असे स्वतः बुद्धांनीच कुशीनगरात महापरिनिर्वाण मंचावरून प्रिय शिष्य आनंदाला सांगितले होते. त्यामुळे या चारच व्यक्तींच्या अस्थीधातूवर स्तूप निर्माणाची त्यांनी आज्ञा दिली. एवढेच नव्हे तर ‘आपल्या अस्थी स्तूपामध्ये ठेवाव्या’ ,अशीही बुद्धांची उत्कट इच्छा होती. बुद्धांनी स्वतः आपल्या करकमलाने अर्हत सारिपुत्र आणि अर्हत मौद्गल्यायनसारख्या पुण्यशील महामानवांच्या अस्थीवर स्तूप निर्माण केला होता. बुद्धांनी औपचारिक मूर्तिपूजेपेक्षा श्रद्धा, विश्वासपूर्ण आचरणाला मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व दिले. त्यामुळेच बुद्ध प्रतीकात्मक चिन्हांची म्हणजे प्रतिमा, धातुस्तूप , बोधीवृक्षाची विहाराविहारातून श्रद्धायुक्त ‘बुद्ध वंदना’ करण्याचा प्रघात प्रचलित झाला.

बुद्धांचे महापरिनिर्वाण होऊन सुमारे २५०० वर्षांहून अधिक काळ लोटला. मात्र त्यांचा करुणामयी हृदयस्पर्शी संदेश आजही मानवाला जीवन सुखशांतीने जगण्याची प्रेरणा देतो. तथागतांचे वैशाख पौर्णिमेच्या तिसऱ्या प्रहरी (इ.स. पूर्व ४८३) वयाच्या ८० व्या वर्षी शालवृक्षाच्या शीतल छायेखाली महापरिनिर्वाण झाले. एका आठवड्यानंतर अग्निसंस्कार करून अस्थी गोळा करण्यात आल्या. अस्थीचे सारखे आठ भाग करण्यात आले आणि अवघ्या तीन – चार महिन्यातच संपूर्ण उत्तर भारतात आठ स्तूप उभारण्यात आले. सम्राट अशोकाच्या काळात त्याचा विस्तार झाला. तर सम्राट कनिष्काच्या काळात स्तुपांचे महत्त्व खूपच वाढले.

अस्थी मिळणे दुर्मिळ झाले तेव्हा प्रतीकात्मक मूर्ती , धार्मिक ग्रंथ ठेवून स्तूप उभारण्यात आले. बुद्ध शरीररूपाने या भूतलावर नाहीत. मात्र अस्थीरूपाने त्यांचे अद्भुत चैतन्य आसमंतात व्यापले आहे. उदात्त मानवी जीवनाचा व सुखशांतीचा हृदयस्पर्शी संदेश अनुयायांना देत आहेत. सुखी जीवनाचा मंत्र देणाऱ्या बुद्धांच्या अस्थी दर्शनीय नसून पूजनीय आहेत. बौद्ध संघटनांनी पुढाकार घेऊन ‘बुद्ध अस्थीकलश’ नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर आणला पाहिजे हीच मंगलकामना.

मिलिंद मानकर, नागपूर