इतिहास

सम्राट अशोक आणि अशोक वृक्ष

भारतीय नवीन वर्ष चैत्र महिन्यापासून सुरू होते. चैत्र महिन्यात वृक्षांना, झाडांना नवी पालवी फुटू लागते. झाडे हिरवीगार दिसू लागतात. वसंत ऋतू चालू होतो. आणि याच कालावधीत भारतीय सम्राट अशोक यांची जयंती येते, हे आनंददायक आहे.

देवांनापिय सम्राट अशोक महाराज यांचा जन्म चैत्र शुक्ल अष्टमीला झाला, असे मानण्यात आले आहे. त्यानुसार येत्या १ एप्रिल रोजी सम्राटांची जयंती येत आहे. त्याच प्रमाणे या कालावधीत त्यांच्याच नावाशी निगडित असलेला एक वृक्ष भारतीय खंडात आहे. त्याला देखील याच मोसमात फुले येतात आणि तो अधिक बहरतो. त्या वृक्षाचे नाव ‘अशोक वृक्ष’ होय.

अशा या अशोक वृक्षाला भारतीय खंडामध्ये सांस्कृतिक दृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशोक वृक्ष हा पावसाळी जंगली म्हणजेच रेन फॉरेस्ट वृक्ष असून तो मध्य दख्खन पठारावर आढळतो, तसेच पश्चिम घाट प्रदेश मध्ये दिसून येतो. त्याला भगवी, पिवळी फुले फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात येतात.

हिमालयाच्या पायथ्याशी देखील हा वृक्ष आढळतो. भारत,नेपाळ, सिरिलंका येथे सुद्धा तो आढळतो. मोठमोठी उद्याने, राजवाडे, बागबगीचे येथे तो जास्त दिसतो. त्याच्या पासून ‘अशोकारिष्ट’ नावाचे औषध सुद्धा तयार केले जाते.

अशोकाचा वृक्ष हा यक्षाचे स्थान म्हणून अनेक शिल्पांमध्ये कोरलेला आढळतो. हा वृक्ष बुद्धांशी जास्त निगडीत असून त्याच्या घराजवळील अस्तित्वाने अरिष्ट दूर जाते, भाग्योदय होतो, मान-सन्मान, प्रतिष्ठा, संपत्ती प्राप्त होते असे म्हटले गेले आहे. म्हणून त्याचे प्रतीक हे अनेक ठिकाणी भारतीय चित्रकलेत आढळते. मोठमोठ्या वास्तू, सोसायटी, बंगले यांच्या आवारात हा वृक्ष हमखास लावला जातो. हिंदूमध्ये चैत्र महिन्यात या अशोक वृक्षाचे पूजन केले जाते.

असा हा अशोक वृक्ष १५ ते २० फूट उंच वाढतो. त्याला हिंदू, जैन आणि बौद्ध हे तिन्ही धर्म मानतात. सिरिलंकेतील ‘अशोक वंदना’ या ग्रंथात देखील या वृक्षाचा उल्लेख आहे असे समजते. जगातील काही देशांच्या बौद्ध साहित्यात भगवान बुद्धांचा जन्म अशोक वृक्षाखाली झाल्याचे म्हटले आहे. तसेच ज्ञानप्राप्ती पिंपळवृक्षाखाली आणि महापरिनिर्वाण शाल वृक्षाखाली झाल्याचे म्हटले आहे.

Ashoka tree also called Saraca asoca and is rain forest tree. It is sacred and pure tree. It’s leaves are used to make toran in home and temple. This tree is residence of Yaksha. This tree takes away the griefs of persons and bring prosperity, name, fame in life.

अशोक वृक्षात दोन प्रकार असून एक डेरेदार वृक्षासारखा असतो. तो सरकोसा जातीचा व खरा वृक्ष. व एक सरळसोट उंच वाढतो तो नकली शोभेचा अशोक वृक्ष.

सम्राट अशोक राजे यांची कीर्ती जशी कायम भारतीय खंडात दुमदुमत आहे, तसाच अशोक हा मध्यम उंचीचा वृक्ष देखील कायम हिरवागार असतो. त्याची डेरेदार उंच आकृती भरपूर फांद्यामुळे तयार होते. त्याची पाने ताम्रवर्णी आणि लुसलुशीत पोताची असतात. अजिंठ्याच्या भित्तिचित्रांमधून सुद्धा त्याचे दर्शन घडते.

सिद्धार्थ गौतम यांच्या आयुष्यात अश्वत्थाला म्हणजेच पिंपळ वृक्षाला बोधीवृक्ष-ज्ञानवृक्ष म्हणून मानाचे स्थान आहे, तसेच जांभूळ, अशोक, आम्र, कदंब, सोनचाफा आणि शाल वृक्षांना देखील आहे. सम्राट अशोक राजांचे नाव या अशोक वृक्षावरून तर पडले नसावे?

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *