इतिहास

सम्राट अशोकाच्या कार्यकाळात बुद्ध धम्माला अमर्याद उत्तेजन मिळाले…!

सर्व भारत खंड आणि वायव्यकडील काबूल- कंदाहार पलीकडील बराच प्रदेश सम्राट अशोकाच्या साम्राज्यात मोडत होता. महाराष्ट्राचा समावेश निश्चितच अशोकाच्या साम्राज्यात होत होता. ठाणे जिल्ह्यातील सोपारा येथे आणि चंद्रपूर जिल्ह्य़ातील देवटेक येथे अशोकाच्या शिलालेखांचे भग्नावस्थेतले काही तुकडे सापडले आहेत.

अशोकाच्या शिलालेखात महाराष्ट्रातील रथीक, पेटनिक आणि भोज लोकात नीतिमत्ता आणि शील चांगले आहे असे म्हटले आहे. या वरून असे वाटते की रथीक, पेटनिक आणि भोज लोकात बुद्ध धम्माचे पालन चांगले केले जात होते.

अशोकाच्या शिलालेखात अशोकाने लोकांना नीतीने वागण्याचा, धम्माविषयी आस्था बाळगण्याचा आणि दया, मैत्री, पावित्र्य, दान इ. गुणांचा विकास करण्याचा उपदेश केला आहे. प्रत्येकाने आत्मपरिक्षण करून पापवृत्ती टाळावी, हिंसा करू नये व सर्वांशी मैत्रीभाव बाळगावा, असा उपदेश करून, आपली प्रजा त्याप्रमाणे वागते की नाही हे पाहण्यासाठी व लोकांना धम्माचे व नीतीचे शिक्षण देण्यासाठी धम्माधिकारी नेमले आहेत, असे नमूद केले आहे.

सहसराम आणि रूपनाथ येथील आदेशात अशोकाने निरनिराळ्या देशात मिळून २५६ धम्म प्रचारक पाठविल्याविषयी लिहिले आहे. बैराट येथील आदेशात बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नांचे ठायीची आपली श्रध्दा अशोकाने प्रदर्शित केली आहे. सारनाथ येथे जो शिलास्तंभ सापडला आहे, त्यावरील लेखावरून असे सिध्द होते की, त्यावेळची धम्मसंस्था फारच सुव्यवस्थित असून सम्राट अशोक स्वतः त्या संस्थेचा अध्यक्ष होता.

सम्राट अशोकाने वाटसरूंचे हाल कमी करण्यासाठी रस्तोरस्ती छायेचे वृक्ष लावले होते; मैला मैलाच्या अंतरावर विहिरी खणल्या होत्या; धर्मशाळा बांधल्या होत्या; आणि ठराविक अंतरावर दगड रोवण्याची व्यवस्था केली होती. माणसाप्रमाणेच जनावरांसाठीही त्यांनी ठिकठिकाणी दवाखाने स्थापले होते व पाणपोया घातल्या होत्या. इतकेच नाही तर औषधी वनस्पतींच्या बागा लोकांना औषधोपचाराची सोय व्हावी म्हणून मुद्दाम लावल्या होत्या.

धम्माची पवित्रता राखण्यासाठी, लोकांना न्यायाने व धर्माने विगविण्यात येते की नाही हे पाहण्यासाठी व एकंदर लोकांच्या धार्मिक वर्तनावर देखरेख करण्यासाठी, सम्राट अशोकाने “धम्ममहामात्र” नावाचे बडे अधिकारी नेमले होते. सम्राट अशोकाच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्रात धम्माची ज्योत अधिक प्रज्वलित झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *