पाटण येथे नुकताच ‘सम्यक महादान’ हा महोत्सव २६ व २७ फेब्रुवारी रोजी मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला. मात्र हे ‘पाटण’ सातारा जिल्ह्यातील नसून ते नेपाळमधील आहे. त्याला ‘पटण’ असे देखील म्हणतात तसेच त्याचे दुसरे नाव ‘ललितपुर’ असे सुद्धा आहे.
या महोत्सवात दिपंकर बुद्ध यांच्या प्रथम प्रतिमा तयार करून पूजल्या जातात. येथे असे मानले जाते की दिपंकर बुद्ध यांनी भविष्यवाणी केली होती कि ‘पुढील जन्मी शाक्यमुनी बुद्ध यांना ज्ञानप्राप्ती होईल’. काठमांडू मध्ये हा महोत्सव सन १०१५ पासून सुरू झाला आणि तेथे तो दर बारा वर्षांनी भरतो. पाच वर्षांनी पाटण येथे होतो आणि भक्तपूर येथे दरवर्षी होतो. या वर्षी पाटण येथे ४७२ वी महोत्सवाची जयंती पार पडली. लाखो लोकांनी यात भाग घेतला.
या महोत्सवात सर्व समाज, लामा, वादक, कलाकार, शेतकरी एकत्र येतात. लामांचे मंत्रपठण होते. धार्मिक पूजाअर्चा चालू राहते. यावेळी दिपंकर बुद्धांच्या हजारो प्रतिमा तसेच बोधिसत्व, अवलोकितेश्वर आणि आर्य तारा यांच्या प्रतिमा उभ्या करतात. व त्यांना सात्विक भोजनाचा प्रसाद अर्पण केला जातो. धम्मा मधील नवीन पिढीला यामुळे भोजनदानाचे महत्व कळते, धम्मा वरील विश्वास वाढतो. असे तेथील स्थानिक रहिवासी ‘सबिता धकवा’ यांनी सांगितले. हा महोत्सव हिरण्य वर्ण महाविहार यांनी आयोजित केला होता.
संजय सावंत. नवी मुंबई (लेखक- ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)