बुद्ध तत्वज्ञान

सम्यक दान : दान पारमितेला बौद्ध धम्मामध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान

त्याग आणि सेवा भावनेने स्वतः जवळची वस्तू किंवा धन दुसऱ्याला देणे यालाच दान म्हणतात. मानवी जीवनात दानाचे फार महत्त्व आहे. शरीर, मन आणि वाणीने दुसऱ्यांच्या सुख-शांती करता केलेला त्याग म्हणजेच दान होय.

दान अनेक प्रकारे दिले जाऊ शकते. आजारी माणसाची मदत करणे, शिकणाऱ्याला पुस्तक देणे, फाटकी वस्त्रे अंगावर घालणार्‍याला वस्त्राचे दान देणे, भुकेल्याला भोजनाचे दान देणे अशा तऱ्हेने अनेक प्रकारे दान करता येते. आपण ज्या समाजात राहतो त्यातील सर्वच माणसे सारखीच सुखी नसतात. अनेक माणसे वेळप्रसंगी सूख-दुःखे भोगत असतात.

संकटात सापडल्यावर शोकाकुल व दुःखमय अवस्था त्यांची सुद्धा होत असते. त्यासाठी प्रत्येकाचे कर्तव्य आहे की आपल्या शक्ती सामर्थ्याने दुसऱ्यांच्या दुःखात आणि संकटात त्यांना मदत करणे. त्यांना दान दिल्याने मानसिक समाधानही लाभते. कुशल कर्म वाढीला लागतात. आणि म्हणून दान प्रवृत्ती वाढविली पाहिजे.

दान कार्याने पुण्य स्वरूपात आपली आध्यात्मिक संपत्ती वाढत असते. दान कर्माचे पुण्य अदृश्य रूपाने आपल्या मनात संग्रहित होत असते व वेळ प्रसंगी आपले संरक्षण करीत असते. संकट प्रसंगी हेच दान कर्म उपयोगी पडते. महामंगल सुत्तामध्ये सुद्धा भगवान बुद्धांनी दान देणे म्हणजे धम्माचे आचरण करणे आणि ते एक उत्तम मंगल आहे, असे सांगितले आहे.

भोजनदान, वस्त्रदान, द्रव्यदान, श्रमदान असे दानाचे विविध प्रकार आहेत. पण या सर्व दानात धम्मदान सर्वश्रेष्ठ आहे. दुःख मुक्ती आणि परम सुख शांती प्राप्तीचे मार्गदर्शन करणे म्हणजेच धम्मदान देणे होय. धम्म मार्गानेच व्यक्ती, कुटुंब आणि समाज सुखी होऊ शकतो. सामान्य माणूस म्हणून आपणास प्रत्यक्ष धम्मदान समाजाला देता येत नसले तरी धम्मदानाच्या कार्यात आपण विविध प्रकारे सहाय्य करू शकतो.

धम्मदान कार्याला प्रेरणा देऊन इतरांना उत्तेजन देऊन अनेक मार्गाने या पवित्र कार्यात आपण मदत करू शकतो. धम्माचे रक्षणाकरिता व त्याच्या वाढीकरिता विविध प्रकारचे योगदान देऊन आपण धर्म सेवेचे भागीदार बनू शकतो. त्यात बुद्धविहाराचे दान, भिक्खूंना चिवरदान, भोजनदान, औषधाचे दान व इतर जीवनावश्यक वस्तूंचे दान, द्रव्यदान तसेच धर्मकार्यात आपल्या शारीरिक व बौद्धिक शक्तीचा काही अंश लावावा या शुद्ध भावनेने केलेले विविध प्रकारचे श्रमदान हे सर्व धम्म वृक्षाला खतपाणी दिल्यासारखेच असते. जो व्यक्ती अशाप्रकारे वृक्षाला खतपाणी घालतो तो महान पुण्याचा अधिकारी होत असतो. धम्माची महान शक्ति पदोपदी त्याचे रक्षण करीत असते.

सद्यस्थितीत कोरोना व्हायरस जगात सगळकडेच पसरलेला आहे. लोक हवालदिल झालेले आहेत. घाबरलेले आहेत. काही मोलमजुरी करणारे लोक आशाळभूतपणे आजूबाजूला पाहत आहेत. अशा वेळी त्यांच्या गरजा जर पूर्ण करता आल्या तर ते फार मोठे दान कर्म केल्यासारखे होईल. दान देऊन आपण दुसऱ्यावर उपकार करतो असे नाही तर खऱ्या अर्थाने आपण आपल्यावर उपकार करीत असतो.

आपण विश्वातील धम्माप्रती आपले कर्तव्य पार पाडून आपल्याच दीर्घ सुखाचे संरक्षण करीत असतो. दान देऊनच आपण निसर्गाचे उपकार फेडू शकतो. निसर्गाचे आभार मानू शकतो. मानवाला त्याच्या जीवनात जे काही मिळत असते जसे धनसंपत्ती, कपडालत्ता, अन्नधान्य, फळे-भाजी, औषधे ही सर्व काही त्याला निसर्गातूनच मिळत असतात. समाजातील काही तळागाळातील लोकांना काही गोष्टी मिळणे अप्राप्त होते, अशावेळी त्यांना आवश्यक वस्तूंचे दान देणे हे निसर्गालाच मदत करण्यासारखे आहे. दान देताना मनाची अवस्था सुखद व आनंददायी असावी. बळजबरीने उपकार केल्यासारखे कधी दुसऱ्याला दान देऊ नये. तसेच दान दिल्यावर त्याचा गाजावाजा सुद्धा करू नये. तरच ते दान चांगले फल प्राप्त करून देते.

दान पारमितेला बौद्ध धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. जीवन समृद्ध करण्यासाठी व्यक्तीला दान पारमिता पुर्ण करणे आवश्यक आहे. यास्तव सद्यस्थितीत समाजाला उपयोगी वस्तूंचे दान जो कुणी देईल तो मोठ्या पुण्यशक्तीचा भागीदार होईल.

-संजय सावंत,नवी मुंबई (लेखक – ज्येष्ट बौद्ध इतिहास अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *