ब्लॉग

सांचीचा महाबोधी महोत्सव – दरवर्षी होणाऱ्या महोत्सवाबद्दल तुम्हाला ‘हे’ माहिती आहे का?

मध्य प्रदेश येथे भोपाळ जवळ सांची ठिकाणी इ.स.पूर्व ३ ऱ्या शतकात उभारलेला मोठा स्तूप आहे आणि तो सांचीचा स्तूप म्हणून ओळखला जातो. परंतु त्याच बरोबर तिथे चेतीयागिरी नावाचा विहार श्रीलंकेच्या महाबोधी सोसायटीने बांधलेला आहे याबद्दल बऱ्याच जणांना माहिती नाही. आणि मुख्य म्हणजे या विहाराच्या तळघरात भगवान बुद्धांचे दोन अग्रश्रावक सारिपुत्त आणि महामोग्गलान यांचे अस्थिकलश सुरक्षित ठेवण्यात आले आहेत हे ही बऱ्याच जणांना ज्ञात नाही.

हे अस्थीकलश सांचीजवळील सतधारा येथील स्तूपा मधून सन १८५१ मध्ये प्राप्त झाले होते आणि मायसे नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याने ते लंडन येथील म्युझियमसाठी जहाजाद्वारे पाठविले होते. ते परत घेण्यासाठी महाबोधी सोसायटीने सन १९३२ पासून बरेच प्रयत्न केले परंतु ब्रिटिश म्युझियमने ते देऊ केले नाहीत.मात्र भारतास जेव्हा स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ते महाबोधी सोसायटीच्या ताब्यात आले. तेव्हापासून महाबोधी सोसायटी दरवर्षी नोव्हेंबरमधील शेवटच्या रविवारी ‘महाबोधी महोत्सव’ भरवून ते पवित्र अस्थिकलश दर्शनार्थ ठेवते. यावेळी श्रीलंका, कंबोडिया, व्हिएतनाम, जपान, व भूतान येथून बरेच बौद्ध पर्यटक, अभ्यासक आणि भिक्खूसंघ आले होते. या महाबोधी महोत्सवासाठी सांचीच्या मुख्य रस्त्यापासून ते टेकडीवरील स्तुपापर्यंत व्हिएतनाम मधील पर्यटकांनी रंगीबेरंगी पताका व कमानी उभारून सुशोभीकरण केले होते.

या महोत्सवावेळी अस्थीकलश बाहेर काढून त्यांचे पूजन केले जाते आणि त्यांची छोटीशी मिरवणूक निघते. सारिपुत्त आणि महामोग्गलान यांचे अस्थिकलश डोईवर घेतलेले भिक्खू मुख्य स्तुपाला प्रदक्षिणा घालून तीनदा स्तुपाला वंदन करतात, हे पाहून पाहणारा भावूक होऊन जातो. सम्राट अशोक राजाने उभारलेल्या भगवान बुद्धांच्या मुख्य स्तुपाला त्यांच्या शिष्याच्या अस्थीद्वारे स्तुपाला नमन करणे हे पाहणे मोठे भाग्याचे होते. आणि तो सोहळा ज्यांनी पहिला ते स्वतःला निश्चितच धन्य समजत असतील.

-संजय सावंत, नवी मुंबई, (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)