इतिहास

सम्राट कनिष्काच्या काळातील ‘हा’ स्तूप पंजाबमधील बुद्ध धम्माची साक्ष देतो

पंजाबच्या फतेहगड साहिब जवळ संघोल एक छोटे गाव आहे. चंदीगड पासून ४० किमी अंतरावरील लुधियाना कडे जाणाऱ्या मार्गावर आणि ढोलेवाड या गावापासून १० किमी आत २०० किलोमीटर परिघात पसरलेल्या जागेला स्थानिक लोक उचा पिंड (उंच गाव) असेही म्हणतात कारण ते टेकडीवर आहे.

संघोल गावात १९६८ साली पुरातत्व खात्याच्या उत्खनात सम्राट कनिष्काचा स्तूप आणि मध्य आशियातील तोरमान आणि मिहिरकुल यांच्याशी संबंधित नाणी आणि मुद्रा सापडले आहेत. या स्तूपात सापडलेल्या वस्तू संघोल वस्तूसंग्रहालयात ठेवण्यात आलेल्या आहेत. या वस्तू पंजाबमधील बुद्ध धम्माची साक्ष देतात.

१९८५ साली पुन्हा याच ठिकाणी उत्खनन करण्यात आले, या मध्ये बौद्ध इतिहासाचा खजिनाच सापडला. त्यात सुंदर शिल्प कोरलेले ६९ प्रस्तर स्तंभ, ३५ तुला आणि छोट्या मोठ्या मुर्त्या मिळाल्या. हा बौद्ध स्तूप कुषाणांच्या काळातला म्हणजेच पहिल्या किंवा दुसऱ्या शतकात म्हणजेच कनिष्काच्या काळात उभारला गेला असला पाहिजे, स्तूपाच्या परिसरात सापडलेल्या शिल्पांची शैली मथुरा शिल्प पद्धतीचे आहे. मथुरा शिल्प शैली ही सम्राट कनिष्काच्या काळातच सुरु झाली होती.

चीनी प्रवासी ह्यूएन त्सांग यांनी सातव्या शतकात भारत प्रवास केला होता. त्यावेळी ह्यूएन त्सांग यांनी लिहलेल्या लेखात संघोलचा उल्लेख आढळतो. संघोल येथे सापडलेल्या बौद्ध स्तूपामुळे प्राचीन काळात पंजाबमधील एक वेगळ्या कलाशास्त्राचे अस्तित्व प्रस्थापित करण्यास मदत झाली तसेच पंजाब प्रदेशात अस्तित्त्वात असलेल्या समृद्ध बौद्ध वस्तींवर प्रकाश पडला.

One Reply to “सम्राट कनिष्काच्या काळातील ‘हा’ स्तूप पंजाबमधील बुद्ध धम्माची साक्ष देतो

  1. खूप चांगली माहिती मिळाली………. असाच काम करा आणि सगळा देश बौद्ध मय होता हे सगळ्यांना कालू द्या …………… जय मुळं निवशी ………. जय भारत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *