ब्लॉग

औरंगाबाद येथील जागतिक धम्म परिषदेने धम्मचक्राला गती मिळेल…

ऑल इंडिया भिक्खू संघाच्या वतीने व प्रशासकीय अधिकारी डॉक्टर हर्षदीप कांबळे (आयएएस) आणि उपासिका रोजाना व्हॅनीच कांबळे यांच्या पुढाकाराने जागतिक धम्म परिषदेचे आयोजन औरंगाबाद येथे करण्यात आले आहे. औरंगाबाद येथे पहिल्यांदाच एवढी मोठी धम्मपरिषद होत असल्यामुळे तेथील बौद्ध समाजात उत्साह भरून राहिला आहे. या परिषदेसाठी जगप्रसिद्ध बौद्ध धर्मगुरू दलाई लामा तसेच श्रीलंका येथील पूज्य भन्तेजी डॉ. वारकागोडा गणरत्न महानायक महाथेरो उपस्थित राहणार आहेत. ही परिषद औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयाच्या नागसेनवन येथील शारीरिक शिक्षण विद्यालयाच्या स्पोर्ट्स स्टेडियमवर दिनांक २२/२३/२४ नोव्हेंबर २०१९ रोजी संपन्न होत आहे.

औरंगाबाद येथे येणाऱ्या सर्व बांधवांचे स्वागत!

Posted by महाराष्ट्र : बुद्ध धम्माचा इतिहास on Sunday, November 10, 2019

या परिषदेसाठी अनेक कार्यकर्त्यांचे पाठबळ लाभले असून ही परिषद यशस्वी करण्यासाठी सामान्यजनही झटत आहेत. कारण असे कार्यक्रम वारंवार होत नसतात आणि जेव्हा होत असतात तेव्हा सत्कर्म अर्जित करण्याची फार मोठी संधी प्राप्त होत असते. या परिषदेसाठी अनेक बाहेरून कार्यकर्ते येणार आहेत. परदेशी पाहुणे येणार आहेत. त्यांच्या सर्व निवासस्थानांची आणि भोजनाची सोय करण्यात आलेली आहे. आणि मुख्य म्हणजे औरंगाबाद मधील बौद्ध समाजाने सुद्धा येणाऱ्या कार्यकर्त्यांना आपल्या निवासस्थानी आसरा देण्याचे योजिले आहे ही फार मोठी मोलाची गोष्ट आहे. कारण धम्म हा मूळचा भारतातला आहे आणि तो जगभर पसरलेला आहे. व त्यासाठी या परिषदेसाठी येत असलेले महाराष्ट्रा बाहेरील कार्यकर्ते, पाहुणे यांची सरबराई करणे हे यजमान म्हणून आपले कर्तव्य आहे. तसेच सत्पुरुष आणि प्रज्ञावंत यांचे आदरातिथ्य करण्याची मौल्यवान संधी आहे.

औरंगाबाद शहराला अजंठा, एलोरा, पितळखोरे लेणी, औरंगाबाद लेणी, मिलिंद महाविद्यालय, लोकूत्तरा महाविहार भिक्खू ट्रेनिंग सेंटर असा फार मोठा बौद्ध संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे. त्यामुळे अशा बौद्धांच्या पुण्यक्षेत्री होत असलेली ही धम्म परिषद नक्कीच अनमोल आहे. अशावेळी जगप्रसिद्ध धार्मिक गुरु आणि श्रीलंकेतील भन्तेजी यांचे प्रवचन तसेच अन्य मान्यवर भिक्खूं आणि वक्त्यांकडून सधम्म श्रवण करण्याची प्रत्येकास सुसंधी आहे. या परिषदेने धम्मचक्राला गती मिळून धम्म उत्तरोत्तर या महाराष्ट्र देशी आणि भारत भूमीत बहरत जाईल, फुलत जाईल अशी आशा करू या. सर्व सुर्जनांची ही इच्छा पूर्ण होवो या सदिच्छा.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *