ब्लॉग

सुत्तनिपात ग्रंथातील पाऊस…

‘सुत्तनिपात’ हा पाली भाषेतील एक सुंदर ग्रंथ आहे. १९७१ साली पाचवीत असल्यापासून प्रा. धर्मानंद कोसंबी यांनी भाषांतरित केलेली या ग्रंथाची प्रत घरात असल्याने अनेकदा पारायणे झाली आहेत. हा एक प्राचीन ग्रंथ तर आहेच. पण या ग्रंथात आढळणारा बुद्धाचा उपदेश हा अतिशय समर्पक गाथेमध्ये ओवला गेला आहे. त्रिपिटकातील हे सर्वात जुने काव्य असून यातील काही गाथेमध्ये पावसाची उपमा वापरण्यात आली आहे. त्या गाथा पुढील प्रमाणे आहेत.

अक्कोधनो विगतखिलो हमस्मि
अनुत्तीरे महियेकर तिव्वासो
विवटा कुटी निंबुतो गिनी
अथ चे पथ्ययस्सी पवस्स देव

अर्थ :- ‘मी अक्रोधन आणि विगतखिल आहे’
( म्हणजे अशा तर्हेचे काठिण्य चित्तात असलेला ) असे भगवान म्हणाले “मही नदीच्या काठी केवळ एका रात्रीचा माझा निवास आहे. माझी कुटी उघडी आहे. अग्नी विझलेला आहे. तर हे मेघराजा, तुझी इच्छा असल्यास खुशाल वर्षाव कर..!”

चित्त मम अस्संव विमुत्त
दिघरत्त परिभावित सुदंत
पाप पन में न विज्जती
अथ चे पथ्ययस्सी पवस्स देव

अर्थ :- ‘माझे चित्त माझ्या ताब्यात आहे व ते विमुक्त आहे’ असे भगवान म्हणाले “ते चिरकाल अभ्यासाने भावित आणि संयमित आहे. माझ्यात पाप नाही. तरी मेघराजा तुझी इच्छा असल्यास खुशाल वर्षाव कर !”

नाह भतकोस्मी कस्सची
निब्बीठेंन चरामी सब्बलोके
अत्थो भतियान विज्जती
अथ चे पथ्ययस्सी पवस्स देव

अर्थ :- ‘मी कुणाचा नोकर नाही’ असे भगवान म्हणाले “मी माझ्या भांडवलावर रहात आहे आणि चाकरीची मला गरजही नाही. तरी मेघराजा, तुझी इच्छा असल्यास खुशाल वर्षाव कर..!”

संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)