इतिहास

आजपर्यंत न पाहिलेल्या सन्नतीच्या महास्तुपावरील सम्राट अशोकाची विविध प्रसंगातील शिल्पे

सम्राट अशोक यांनी कलिंग युद्धानंतर आयुष्यभर भगवान बुद्ध यांची शिकवणूक अनुसरली आणि बौद्ध तत्वज्ञानाचा नुसत्या भारतात नाही तर जगभर प्रसार केला. परंतू त्या सम्राट अशोक यांचे समाधीस्थळ किंवा स्तूप आजपर्यंत भारतात कुठेच आढळले नाही, हे एक मोठे आश्चर्य आहे. यामुळे सद्यस्थितीत सन्नाती येथे २४ एकर जागेत होत असलेले उत्खनन आणि तेथे सापडलेला क्षतीग्रस्त महास्तूप व त्यावर असलेला बौद्ध शिल्पांचा आणि सम्राट अशोक यांच्या शिल्पांचा अमूल्य ठेवा पाहून हे स्थान सम्राट अशोक यांच्याशी अधिक निगडित असल्याचे दिसून येत आहे.

काय कारण असावे की येथेच सम्राट अशोक यांच्या असंख्य प्रतिमा, शिलालेख, ‘राया अशोक’ हे नामनिधान, धम्मचक्र, बोधिवृक्ष, वज्रासन कोरलेले दिसून येते ? कदाचित सम्राट अशोक उतारवयात दक्षिण भारतात आले असावेत व सन्नती येथे मूळ स्तूप उभारण्याचे काम विधिपूर्वक त्यांच्या हातून झाले असावे. त्यामुळे इ.स.दुसऱ्या शतकात या स्तुपाचे नूतनीकरण करताना त्यांच्या असंख्य शिल्प प्रतिमा कोरल्या असाव्यात.

या शिल्प प्रतिमेत सम्राट अशोक हे महाराणी यांच्यासोबत आसनस्थ असून चेहऱ्यावर मंदस्मित विलासत आहे, असे दिसते. एका हात लोडास टेकून दुसरा हात कमरेवर ठेवून बसण्याची त्यांची ढब शिल्पकारांनी येथे बरोबर कोरली आहे.

सन्नाती येथील गोलाकार महास्तुपाचा व्यास २२ मी. व उंची १७ मी.आहे व तो मौर्य आणि सातवाहन राजवटीत बांधला असल्याचे स्पष्ट झाले आहे. येथे जातककथा कोरलेल्या ६० स्लॅब आढळून आल्या आहेत. तसेच इतर ठिकाणी बुद्ध शिल्पे, वज्रासन, बोधीवृक्ष, सम्राट अशोक, महाराणी, सेवक, गजराज, पालखी आणि मिरवणूक यांच्या असंख्य प्रतिमा आढळून आल्या आहेत.

सम्राट अशोक कमरेवर हात ठेवून ऐटीत उभे असल्याची प्रतिमा या सुंदर शिल्पात दिसून येते. नेसलेले वस्त्र आणि त्याचा सोगा, बाजूबंद, कर्णकुंडले, कंकणे, तूर्रेबाज शिरपेच आणि सुवर्णमाला सारे ठळकपणे दिसून येते.

सम्राट अशोक यांच्या शिल्प प्रतिमेवरून त्यांच्या शरीरयष्टी बद्दल निश्चित ठोकताळा बांधता येतो. त्यांची उंची सहा फूट असावी. रुंद बाहू, राकट चेहरा व नाक फुगीर असावे असे दिसते. हातपाय लांब असून त्याची बोटे सरळ दिसतात. दोन्ही कानात कर्णकुंडले असून डोईवर मौल्यवान शिरपेच दिसून येतो. दोन्ही हातात सोन्याची दोनदोन कांकणे आहेत.

या शिल्पात वज्रासन दाखविले असून पाठीमागे बोधीवृक्ष दिसत आहे, आणि सम्राट अशोक त्याला वंदन करत आहेत. सन्नतीच्या या सम्राटांना माझा प्रणाम.

काही शिल्पात गळ्यात सुवर्ण माला दिसते. बुद्ध धातू डोक्यावर घेऊन जात असलेल्या प्रतिमेमध्ये चेहरा अतीव श्रध्दा मुद्रेमध्ये दिसतो. तर जलतीर्थ वाटप करताना भावमय मुद्रा प्रकट झाल्याचे दिसते. काही शिल्पात त्यांच्या मुद्रेवर स्मितहास्य दिसते. सन्नातीच्या या शिल्पांवरून सम्राट अशोकांचे चित्र रेखाटने चित्रकारांना सोपे जाईल असे वाटते.

पुढील काही पोष्टमध्ये आपण आजपर्यंत न पाहिलेल्या सन्नतीच्या महास्तुपावरील सम्राट अशोक यांची विविध प्रसंगातील शिल्पे पाहू या. गजराजावर स्वार झालेले सम्राट तसेच पालखीमध्ये बसलेले सम्राट, बुद्ध धातू डोईवर वाहून नेणारे सम्राट, जलतीर्थ वाटप व अभिषेक करणारे सम्राट यांच्या प्रतिमा आपण पुढे पाहूया.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)