बातम्या

विशाखापट्टणमच्या स्तुपाचे झाले नूतनीकरण; महाराष्ट्रात सरकारचे बौद्ध स्थळांकडे दुर्लक्ष

सन २०१९ मध्ये झालेल्या तुफानी वादळामुळे विशाखापट्टणमजवळील थोतलाकोंडा येथे दोन हजार वर्षापूर्वीचा बौद्ध महास्तूप ढासळला होता. गेल्या दोन वर्षापासून त्याच्या दुरुस्तीचे काम चालू होते. या कामासाठी ४२ लाखांचा निधी विशाखापटनम महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (VMRDA) यांनी दिला होता. पर्यटन मंत्री एम श्रीनिवास राव यांनी नुकतेच या नूतनीकरण केलेल्या स्तूपाचे उदघाटन १५ सप्टेंबर २०२१ रोजी केले. पर्यटन मंत्री यांनी सांगितले की येथे आता पर्यटकांची संख्या वाढत असल्याने देखभाल दुरुस्तीसाठी निधीची पूर्तता करण्यात येत आहे. त्यामुळे पर्यटकांसाठी अधिक सुखसुविधा पुरवीता येतील.

आंध्रप्रदेशचे पर्यटन मंत्री यांनी नूतनीकरण केलेल्या स्तुपाचे उदघाटन १५ सप्टेंबर २०२१ रोजी केले.

महाराष्ट्र राज्यापेक्षा आंध्रप्रदेश राज्य मला जास्त आधुनिक विचारांचे (पुरोगामी) वाटते. प्राचीन वारसा असलेल्या बौद्ध संस्कृतीच्या अवशेषांची ते देखभाल दुरुस्ती करतात. त्यांचे नूतनीकरण करतात. पर्यटकांना सोयीसुविधा पुरवितात. पण आपल्या महाराष्ट्रात एवढ्या प्राचीन बौद्धलेण्या असून देखील शासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. येणाऱ्या पर्यटकांसाठी लागणाऱ्या अनेक सुख सुविधांचा अभाव तेथे आहे. अतिक्रमणे वाढत आहेत. नालासोपाऱ्याचा अशोकस्तुप किती वर्षे असाच ढासळलेला राहणार आहे ? MMRDA ने रस्ते सोडून कुठल्याही ऐतिहासिक स्थळाची डागडुजी केल्याचे ऐकिवात नाही. पण विशाखापट्टणमच्या प्राधिकरणाने पुढाकार घेऊन स्तूप दुरुस्त केल्याने ते निश्चितच कौतुकास पात्र ठरतात.

२०१९ च्या वादळात हा दोन हजार वर्षांपूर्वीचा स्तुप ढासळला होता. विशाखापट्टणम महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने नूतनीकरणासाठी निधी दिल्याने ते कौतुकास पात्र आहेत.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – ज्येष्ठ बौद्ध इतिहास अभ्यासक)

‘विशाखा’ हे नावच मुळी बौद्ध संस्कृतीचे आहे. अशा या विशाखापट्टणम जवळील थोतलाकोंडा स्तुपाला अनेक पर्यटक भेट देत असतात.