ब्लॉग

बौद्ध भिक्खूंना लेण्यां दाखवा; त्यांनी पुढे येऊन लेण्यांबाबत मार्गदर्शन केले पाहिजे

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महास्थविर संघरक्षित यांना ३ जुलै १९५० रोजी एक पत्र लिहिले आहे. त्या पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटले आहे की ‘बौद्ध धम्माच्या पुनरुज्जीवनाचा प्रयत्न यशस्वी व्हायचा असेल तर त्याची मोठी जबाबदारी भिक्खुंच्या खांद्यावर पडते. यापुर्वी होते त्यापेक्षाही त्यांना अधिक कार्यरत बनले पाहिजे. त्यांनी आपल्या गुहेतून बाहेर पडलेच पाहिजे आणि लढणाऱ्या शक्तींच्या आघाडीवर राहिले पाहिजे’.

‘Great responsibility lies on the shoulders of the Bikkus if this attempt at the revival of the Buddhism is to be a success. They must be more active than they have been. They must come out of their shell and be in the first rank of the fighting forces.’

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे मत अगदी तंतोतंत आजही लागू पडते. सगळीकडे धम्म चळवळ वाढत आहे. पण अभ्यासू आणि विनयशील भिक्खूच कुठे दिसत नाहीत. सर्व बौद्ध लेण्या हा त्यांचा राखीव प्रांत आहे. त्यांनी पुढे येऊन लेण्यांबाबत मार्गदर्शन केले पाहिजे. तेथील चैत्यगृह, स्तुप यांची पूजाअर्चा केली पाहिजे. तर बौद्ध व इतर समाज ही जागृत होऊन लेण्यांच्या वाटेवर चालू लागेल. यासाठी लेण्यांजवळच्या वस्तीमध्ये, गावामध्ये बौद्ध भिक्खूंना कायम निवासस्थान दिले गेले पाहिजे. जेणे करून दररोज ते लेण्यांमध्ये जाऊन बुद्ध वंदना घेऊ शकतील. तेथे भेट देणाऱ्यांना धम्माचा उपदेश करतील.

शहरात राहणारे तुम्ही आम्ही फक्त सुट्टीच्या दिवशी लेण्यात जाऊन लेण्यांच्या इतिहासाबाबतचा अभ्यास करतो. तेथील शिल्पांची माहिती घेतो. व्याख्यान ऐकतो. आणि लेण्यांची काळजीही घेतो. पण लेण्यांमध्ये ज्यांचे अस्तित्व अगोदर पाहिजे, ते भिक्खुंच तेथे नसल्याने धम्म प्रगती कशी करणार याचा विचार कोणीच करीत नाही. पुरातत्व खात्याच्या ताब्यात असलेल्या बौद्ध लेण्यांमध्ये इतर धर्मीय जाऊन पूजाअर्चा करतात, अतिक्रमण करतात तर मग आपला हेतू तर स्वच्छ आहे. त्याला रोखणे ASIला शक्य नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्व आणि आग्नेय कडील बौद्ध राष्ट्रांमध्ये जाऊन आलेले होते. तेथील भिक्खूं धम्माची धुरा कशी सांभाळतात हे त्यांनी पाहिले होते. त्यामुळे भारतातही धम्माची धुरा सांभाळण्यासाठी भिक्खूंनी पुढे यावे असे त्यांना वाटत होते. यास्तव आपणही लेण्यांना भेट देताना शक्य झाल्यास किमान एकातरी भिक्खूंना घेऊन गेले पाहिजे. त्यांचा तेथे जाण्याचा आणि असण्याचा अगोदर हक्क आहे. त्यांना माहीत नसल्यास लेण्यांची माहिती द्यावी.

इतिहास सांगावा. शिल्प आणि शिलालेख मधील बारकावे सांगावे. मग भिक्खूंनी तेथे बुद्धवंदना घ्यावी. धम्म उपदेश करावा. अशी सुरवात हळूहळू झाली तरच धम्माचे महत्व अधोरेखित होत जाऊन तो प्रत्येकाच्या जीवनात उतरेल. लेण्यांचे मूळ वावरकर्ते अस्तित्वात येतील. आणि त्यांना सर्वोतोपरी सहाय्य केल्यास जुन्नर लेणी(लेण्याद्री), तुळजा लेणी यासारखे इतर लेण्यांत होत असलेले अतिक्रमण थोपविता येईल.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)