जगभरातील बुद्ध धम्म

१४०० वर्षांच्या या दुर्मिळ झाडाच्या सुवर्ण पानांचा वर्षाव बुद्धमूर्तीवर होतो

चीनच्या शांझी प्रांतातील झोग्नांन पर्वतराजीत निसर्गरम्य परिसरात गौनियन नावाचे बुद्धविहार आहे. याच्या आवारात १४०० वर्षाचा जुना ‘जिंगो’ बिलोबा (Ginkgo Tree) वृक्ष आहे. हिवाळ्यामध्ये या झाडाची हिरवी पाने पिवळीधम्मक सुवर्णा सारखी होतात. आणि मग त्या सुवर्ण पानांचा वर्षाव त्या विहाराच्या आवारातील बुद्धमूर्तीवर दरवर्षी नोव्हेंबरमध्ये होतो.

गौनियन बुद्धविहाराच्या आवारात असा सुवर्ण पानांचा वर्षाव होतो.

हा वृक्ष त्यांग राजवटीतील राजा लि शिमीन (ई.स. ६२६-४९) काळातला आहे. ‘जिंगो’ वृक्ष ही जगातली सर्वात जुनी व दुर्मिळ जात असून या जातीतील फारच थोडे वृक्ष या जगात शिल्लक आहेत. असे म्हणतात की जेव्हा डायनासोर या पृथ्वीवर अस्तित्वात होते तेव्हापासून (म्हणजे २७० मिलियन वर्षांपूर्वीपासून) हे वृक्ष पृथ्वीवर आहेत. यातील काही वृक्ष जवळजवळ पन्नास मीटर उंच वाढतात आणि याचे आयुष्यमान अडीच हजार वर्षे असते. या वृक्षाची फळे काही पारंपारिक औषधे बनवीण्यासाठी तसेच ताकदीसाठी वापरली जातात.हिवाळ्यामध्ये जेव्हा या झाडाची सुवर्णपानें खाली पडतात तेव्हा तिथे एक मोठा उत्सव भरतो. आजूबाजूच्या गावातील-प्रांतातील खुप लोक येऊन दर्शन घेऊन जातात.

तसे बघीतले तर जगातील सर्व बोधिवृक्षांचेही आयुष्यमान जास्त आहे. ज्या वृक्षाखाली सिद्धार्थ गौतमांना ज्ञानप्राप्ती झाली, तो वृक्ष ही अलौकिकच म्हटला पाहिजे. त्याअनुषंगाने खुळ्या व भ्रामक समजुती टाकून देऊन प्रत्येक कुटुंबाने एका तरी बोधिवृक्षाचे (पिंपळाचे) जतन केले पाहिजे.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)

4 Replies to “१४०० वर्षांच्या या दुर्मिळ झाडाच्या सुवर्ण पानांचा वर्षाव बुद्धमूर्तीवर होतो

  1. बेहद ज्ञानवर्धक एवं दिलचस्प जानकारी !

Comments are closed.