बुद्ध तत्वज्ञान

सिद्धार्थ गौतमाला अशी झाली “बुद्धत्वप्राप्ती”

ध्यानसाधनेच्या काळात क्षुधा शांतवनाच्या हेतूने गौतमाने ४० दिवस पुरेल एवढे अन्न संग्रही ठेवले होते.चित्त अमंगल, अशांत करणाऱ्या दुष्ट विचारांना त्याने निपटून काढले. गौतमाने अन्न गृहण केले. तो शक्तीसंपन्न झाला. त्याने बुद्धत्व प्राप्ती हेतू स्वतःला सिद्ध केले. बुद्धत्वप्राप्तीसाठी समाधीस्थ अवस्थेत त्याला चार सप्ताहाचा कालावधी लागला.

बुद्धत्वाची अंतिम स्थिती प्राप्त होण्यासाठी त्याला चार अवस्थातून जावे लागले. प्रथम अवस्था विवेक आणि विश्लेषणाची होती. एकांतवासामुळे त्याला ही अवस्था सहज शक्य झाली. द्वितीय अवस्था चित्ताच्या एकाग्रतेची होती. तृतीय अवस्थेत त्याने मनोनिग्रह आणि समचित्तता यांना आपल्या सहाय्याला घेतले. चतुर्थ आणि अंतिम अवस्थेत त्याने पावित्र्याचा समचित्ततेशी संयोग केला आणि समचित्ततेचा मनोनिग्रहाशी संयोग केला.

अशाप्रकारे त्याचे चित्त एकाग्र झाले. त्याचे चित्त पवित्र झाले. त्याचे चित्त दोषरहित झाले. त्याचे सारे क्लेश लयाला गेले. त्याचे चित्त सुकोमल झाले. तो दक्ष झाला. तो दृढ झाला. तो वासनारहित झाला. तो ध्येयाशी एकरूप झाला. नंतर गौतमाने त्याले निरंतर पीडादायक ठरलेल्या समस्येचे समाधान शोधण्यावर आपले चित्त एकाग्र केले.

चवथ्या सप्ताहाच्या अंतिम दिनी रात्रप्रहरी त्याचे चित्त प्रकाशमान झाले. त्याच्या चित्तात प्रकाशकिरणे प्रस्फुटित झाली. त्याला अनुभूती झाली की या जगात दोन समस्या आहेत. प्रथम समस्या ही की या जगात दुःख आहे. दुसरी समस्या ही की, हे दुःख निवारण करून मानवमात्राला सुखी कसे करता येईल? अंतिमतः चार आठवड्यांच्या चिंतनानंतर अंधःकार लोप पावला. प्रकाश किरणे प्रस्फुटित झाली. अविद्या लोप पावली. ज्ञानाचा उदय झाला. त्याला नूतन मार्ग गवसला.

2 Replies to “सिद्धार्थ गौतमाला अशी झाली “बुद्धत्वप्राप्ती”

  1. धन्यवाद बौद्ध धर्मा बद्दल माहिती मिळाली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *