इतिहास

राजगृहच्या वाटेवर सिद्धार्थासोबत हा प्रकार घडला

कपिलवस्तू सोडल्यानंतर सिध्दार्थ मगध राज्याची राजधानी राजगृह येथे जाण्याचा विचार केला. बिंबिसार मगधचा राजा होता. त्यावेळी थोर दार्शनिक, तत्वचिंतक आणि विचारवंत राजगृही वास्तव्याला होते.राजगृही जाण्याच्या विचाराने प्रेरित होऊन तीव्रगामी प्रवाहाची तमा न बाळगता त्याने गंगा पार केली.

राजगृहच्या वाटेवर तो सकी नामक ब्राह्मण तपस्विनीच्या आश्रमात थांबला. तेथून तो पद्मा नावाच्या दुसर्‍या ब्राह्मण तपस्विनीच्या आश्रमात थांबला सर्वांनी त्याचा यथोचित आतिथ्य सत्कार केला.
ज्याला तुलना नाही अशा तेजस्वी रूप, अनुपम सौंदर्य आणि अलौकिक व्यक्तीत्वाच्या स्वामीने संन्याशाची वस्राची धारण केलेली पाहून त्या क्षेत्रातील लोक अश्चर्यचकित झाले.

सिद्धार्थाला पाहून जे बसले होते ते तात्काळ उभे राहिले. जे उभे होते ते त्याच्या पाठोपाठ जाऊ लागले. हळूहळू गंभीरतेने पाऊले उचलणारे द्रुतगतीने चालू लागले आणि जे आपल्या वाटेने जात होते ते वाटेतच थांबले. काहींनी त्याला आदराने दोन्ही हातांनी नमस्कार केला. काहींनी श्रद्धापूर्वक वाकून त्याला प्रणिपात केला. काहींनी त्याला आदराने संबोधिले. तेथे एकही असा नव्हता की त्याने त्याच्याप्रती आदर व्यक्त केला नाही.

सिद्धार्थाला पाहून ज्यांनी विविधरंगी वस्त्रे परिधान केली होती त्यांना आपल्या वस्त्रप्रवरणांची लाज वाटली. जे व्यर्थ वार्तालापत मग्न होते ते स्तब्ध राहिले. त्याला पाहून कोणाच्याही मनात कोणताही अनुचित विचार आला नाही. त्याची भृकटी, त्याचे मस्तक, त्याचे मुख्य, त्याचे बाहू, त्याची पावले, त्याचा देह, त्याच्या देहाच्या कोणत्याही अंगाचे दर्शन होवो ती व्यक्ती मंत्रमुग्ध होऊन पाहतच राहिली. कठीण आणि दिर्घतम प्रवास करून गौतम पाच पर्वतांनी वेष्टित अशा राजगृही पोहचला.

राजगृह पर्वतरांगांनी संरक्षित आणि अलंकृत होते. राजगृहाच्या चोहोबाजूला मंगलमय पवित्र स्थाने होती. राजगृही पोहचल्यावर त्याने पांडव पर्वताच्या पायथ्याशी आपल्याकरिता एक स्थान निवडले अणि काही काळ वास्तव्य करण्याच्या हेतूने तेथे एक लहानशी पर्णकुटी बांधली. कपिलवस्तू ते राजगृह हे अंतर जवळपास ४०० मैल होते. एवढा लांबचा प्रवास गौतमाने पायीच केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *