जगभरातील बुद्ध धम्म

सहावी धम्मसंगिती; डॉ.बाबासाहेब आंबेडकर सुद्धा बर्मामध्ये धम्मसंगितीसाठी दोनदा जाऊन आले

भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर पहिली धम्मसंगिती राजा अजातशत्रूच्या काळात राजगृह येथील सप्तपर्णी गुहेजवळ झाली. दुसरी धम्मसंगिती राजा नंदवर्धनच्या काळात वैशाली येथील बालूकराम विहारात झाली. तिसरी धम्मसंगिती सम्राट अशोक राजाच्या कारकीर्दीत पाटलीपुत्र येथील अशोकाराम विहारात झाली. चौथी धम्मसंगिती श्रीलंकेत राजा वट्टगामिनीच्या काळात अनुराधापूर येथील विपासना विहारात झाली. त्यानंतर जवळजवळ दोन हजार वर्षांनी पाचवी धम्मसंगिती बर्मा (म्यानमार) मध्ये मंडाले शहरातील कुथोडा विहारात १८७१ साली मिनदोंन राजाच्या काळात झाली. व सहावी धम्मसंगिती बर्मा देशातच पंतप्रधान ऊं नू यांच्या कारकिर्दीत १९५४ साली रंगून येथे झाली.

ही सहावी धम्मसंगिती बर्मादेशासाठी खूप महत्त्वाची ठरली. ही धम्मसंगिती मिंगला पठारावर आयोजित केली होती. तसेच २५०० वी बुद्ध जयंती जवळ येत असल्याने धम्मसंगिती व बुद्धजयंतीचा सोहळा बर्माने मोठ्या प्रमाणात करण्याचे ठरविले. यासाठी केंद्रीय सोहळा समिती स्थापन करण्यात आली. या सोहळ्यासाठी तात्कालीन अध्यक्ष डॉक्टर बा.यु. तसेच पंतप्रधान यु नू यांनी खूप मेहनत घेतली.

धम्मसंगिती १७ मे १९५४ रोजी बुद्धपौर्णिमेच्या दिवशी सुरू झाली. आणि ती दोन वर्षे चालली. व २४ मे १९५६ला अडीच हजारावी बुद्धजयंती सोहळ्यात समाप्त झाली. जगातील सर्व बौद्ध देशातून अनेक मान्यवर त्यांच्या देशातील त्रिपिटक घेऊन धम्मसंगितीसाठी आले. भारत, थायलंड, सिलोन, कंबोडिया, नेपाळ, मलाया,इंडोनेशिया, पाकिस्तान, जर्मनी आणि कोकोबेटे या देशातील प्रतिनिधी उदघाटन सोहळ्यास उपस्थित राहिले. तसेच भारतातून विजयालक्ष्मी पंडित, संयुक्त राष्ट्राचे अध्यक्ष माल्कम मॅकडोनाल्ड हे उपस्थित होते.

या धम्मसंगितीसाठी सप्तपर्णी गुहेसारखी महापस्सना गुहागृह बांधण्यात आले. १० हजार लोक एकावेळी तेथे बसू शकतील अशी सोय तेथे केली होती. त्यास सहा दरवाजे ठेवण्यात आले. तसेच १००० भिक्खूंसाठी चार हॉस्टेल्स बांधण्यात आली. धम्मसंगितीमध्ये मान्य केलेल्या त्रिपिटकाची पालि व बर्मी भाषेतून छपाई करण्यासाठी छापखाना उभारण्यात आला. धम्मसांगितीचे समापन आणि बुद्धजयंती सोहळा २२ मे १९५६ ते २७ मे १९५६ पर्यंत एकूण सहा दिवस चालला.

या धम्म सोहळ्यासाठी सर्व म्यानमारमध्ये पॅगोडा, मॉनेस्टरी आणि घरांवरती रोषणाई करण्यात आली. कार्यालय, घरे, वाहनांवर धम्मध्वज फडकविण्यात आला. भिक्खुंना भोजनदान व आवश्यक वस्तूंचे दान देण्यात आले. या काळात मद्यपानगृहे, कत्तलखाने, मासेमारी बंद ठेवण्यात आली. बंदिस्त प्राण्यांना सोडून देण्यात आले. विहारांना पांढरा रंग देण्यात आला. जातककथावर आधारित नृत्यनाटिका, गायन, व्याख्यान इत्यादी कार्यक्रम करण्यात आले. तसेच बोधिवृक्षाचे वृक्षारोपण ठिकठिकाणी करण्यात आले.

सर्व विहारांमध्ये लोकांना पंचशिले देण्यात आली. सर्व पॅगोडाच्या ठिकाणी घंटानाद करण्यात आला. तसेच बर्मामधील प्रमुख आठ शहरांवर विमानांनी फुलांचा वर्षाव केला. देशातील सर्व विहारात भिक्खूंचे प्रवचन झाले. असा मोठा नयनरम्य सोहळा बर्मा देशाने आयोजित केला होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा १९५४ साली बर्मामध्ये धम्मसांगितीसाठी दोनदा जाऊन आले. १९ जुलै १९५६ रोजी त्यांनी बुद्ध शासन कौन्सिल, रंगून यांना धम्माच्या प्रसाराच्या निधीबाबत पत्र ही लिहिले आहे.

बुद्धधम्म भारताचा असूनही आताची सामाजिक व राजकीय परिस्थिती पाहता भारतात यापुढे धम्मसांगिती कधी भरेल असे वाटत नाही. पण म्यानमार देशाने जगाला दाखवून दिले आहे की ते धम्मामध्ये किती परिपक्व आहेत. आणि म्हणूनच त्यांच्या गुरुशिष्य परंपरेला नमन करावेसे वाटते. त्यांनी जपणूक केलेली ध्यान साधना जगभर सर्व मानव जातीपर्यत पोहोचावी असे वाटते. अशा या धम्म देशास माझा प्रणाम.!

– संजय सावंत, नवी मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *